विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 27 January 2023

छत्रपती शिवरायांचे पत्ररूपी स्वभावातील दोन पैलु

 

छत्रपती शिवरायांचे पत्ररूपी स्वभावातील दोन पैलु

पोस्तसांभार ::नागेश सावंत 

छत्रपती शिवाजी महाराजांची दोन पत्रे व त्याद्वारे होणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावातील दोन वेगवेगळ्या पैलुंचे दर्शन आपणास त्याद्वारे घडते . तत्कालीन सामाजिक रूढी प्रमाणे ब्राम्हणास मान दिला जात होता ब्राम्हणहत्या पाप आहे असे त्यांच्या पहिल्या पत्रातून जाणवते " मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली त्याचा नतीजा तोच पावला" तर दुसऱ्या पत्राद्वारे स्वराज्यातील कामात कामचुकार करणाऱ्या ब्राम्हणास ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो . अश्या कडक शब्दात कानउघाडणी करून ब्राम्हण असलात तरी तुमची गय केली जाणार नाही अशी तंबी दिली जाते.
  • पत्र १ ( दीनांक ८ सप्टेंबर १६७१ , शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ , पत्र क. १४०८ )
पत्रातील मायना :- तुकोराम सुभेदार व कारकून सुबे मामले प्रभावळी , प्रती राजश्री शिवाजीराजे दंडवत , उपरी सबनीस सुबे मजकूर यावरी याद तगारा नाईकवाडी बापूजी नलवडा याने कल्हावती करून तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटांत सुरी मारून जीव दिल्हा . हे वर्तमान होऊन गेले. तुम्ही कांही हुजूर लिहिले नाही . मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली , त्याचा नतीजा तोच पावला . हाली बापूजी नलवडा व कोंडाजी चांदरा व संताजी जामदार हरबकसा करून सबनिसास दटावितात कि होते तेच तुमचे उपरी उचलो वर्तमान कळो आले. तरी ब्राह्मणास तील त्याची खबर घेणे जरुरी आहे. तुम्हीं घेत नाहीत . इतकियाउपरी त्यास ताकीद करून हालखुद ठेवणे की सबनिसाचे वाटे नच जात . जरी कांही सबनिसासी कथळा करयावरी ख ल हालखुद माकुलपणे असतील तरी हुजूर लिहिणे. म्हणजे तहकीक आहे कीं सबनीस मायावारी आले होते . याबद्दल साहेब त्यास दस्त करून हुजूर आणवितील आणि खबर घेतील . तुम्ही ऐसे बेकैद लोकास होऊ न देणे . हालखुद ठेवून रवेशवार चाकरी घेत जाणे . कि कोण्ही बेढंग न वर्ते . मुलाहिजा न धरणें . .
बापूजी नलावडे यांच्या मुलाने एका ब्राम्हण सबनिसावर तलवार चालवली सदर घटनेत ब्राम्हण सबनीस वाचला . नंतर काही वेळाने घाबरून जाऊन स्वतःच्या पोटात स्वतःहून सुरी खुपसून स्वतःचा जीव घेतला. झालेली सदर घटना प्रभानवळीच्या सुभेदाराने शिवाजी महाराजांस कळवली नाही त्यामुळे महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार तुकाराम यास ताकीद देणारे पत्र लिहिले . मराठा असून ब्राम्ह्नावर तरवार चालवली , त्याची शिक्षा त्याने स्वतःहून घेतली . हे प्रकरण होऊन गेले तरी बापूजी नलावडा व त्यांचे साथीदार कोंडाजी चांदरा व संताजी जामदार त्या ब्राम्हण सबनिसास दमदाटी करून धमकावत होते. महाराजांना ह्या घटना कळल्या असून ब्राम्हण सबनिसाची भेट घेणे जरुरी असताना तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत आहात . कोणाचाही मुलाहिजा न बाळगता योग्य कारवाई करण्याची ताकीद शिवाजी महाराज प्रभानवळीच्या सुभेदारास देत आहेत .
शिवाजी महाराजांच्या स्वभावातील पहिला पैलु :- तत्कालीन समाजातील रुढीप्रमाणे ब्राम्हणहत्या करणे किंवा त्याच्यावर वार करणे म्हणजे पाप असल्याचे शिवाजी महाराज मानत होते. असे आपणास या पत्राद्वारे आपणास दिसून येते.
  • पत्र २ ( दीनांक १८ जानेवारी १६७५ ,शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ , पत्र क. १७१८ )
पत्रातील मायना :- मशहुरल राजश्री जिवाजी विनायक सुबेदार व कारकून , सुबे मामले प्रभावळी , प्रती राजश्री शिवाजीराजे दंडवत , . दौलतखान व दरियासारंग यांसी ऐवज व गला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुबे मजकुरावरी दिधल्या . त्यांस तुम्ही कांही पावले नाही , म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की , ऐसे नादान थोडे असतील ! तुम्हास समजले असेल कि त्याला ऐवज कोठे तरी ऐवज खजाना रसद पाठविलिया मजरा होईल , म्हणत असाल . तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे . त्याची मदत व्हावी , पाणी फाटी आदी करून समान पावावे , या कामास आरमार बेगीने पावावे ते नाही , पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जर करीत असतील , आणि तुम्ही ऐवज न पाववून, आरमार खोळंबून पाडल ! एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल , त्यावरी साहेब रिझतील कि काय ? हे गोष्ट घडायची तरी होय , न कळे की हबशीयांनी काही देवून आपले चाकर तुम्हाला केले असतील ! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल ! तरी ऐशा चाकरांस ठीकेठीक केले पाहिजेत ! ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो .याउपरी तऱ्ही त्यांला ऐवज व गला राजश्री मोरोपंती देवीला असेल तो देवितील. तो खजाना रसद पावलीयाहून अधिक जाणून तेणेप्रमाणे आदा करणे की ते तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावोन आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे. याउपरी बोभाट आलियावरी तुमचा मुलाहिजा करणार नाही . गनिमाचे चाकर , गनीम जलेस , ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल . ताकीद असे .
जंजिराच्या सिद्धीस शह देण्यासाठी जंजिरा किल्याच्या वायव्येस सुमारे ५ की.मी. वर असलेल्या कांसा नावाच्या लहानश्या बेटावर पद्मदुर्ग किल्ला बांधण्याचे काम शिवाजी महाराजांच्या आज्ञेने चालू होते . जंजिराच्या सिद्धी कडून हल्ले होत होते त्यामुळे या कामात अडथळा येत होता अश्या युद्धजन्य परिस्थितीत दर्यासारंग व दौलतखान शत्रूशी लढत ह्या कामावर लक्ष ठेऊन होते. प्रभानवळ्ळीचा सुभेदार जिवाजी विनायक या मोहिमेसाठी रसद व पैश्याचा पुरवठा करत न्हवता . त्याबद्दलची तक्रार दर्यासारंगने शिवाजी महाराजांकडे केली . महाराजांनी प्रभानवळ्ळीच्या सुभेदाराच्या कामातील हलगर्जीपणावर संतापून कडक शब्दात ताकीद देणारे पत्र लिहिले. शिवाजी महाराजांनी सदर पत्राद्वारे प्रभानवळ्ळीचा सुभेदार जिवाजी विनायक यास सक्त ताकीद देत यापुढे तुमच्याकडून कामात अशी हलगर्जी झाल्यास तुमचा मुलाहिजा न करता तुम्हास योग्य शासन केले जाईल . तुमच्या कामातील हलगर्जीमुळे आम्ही तुमच्यावर खुश होऊ असे वाटले काय ? पद्मदुर्ग किल्ला बांधण्याचे कामात पाणी , धान्य व इतर रसदेची मदत तुमच्याकडून अपेशीत होती परंतु तुम्ही मदत केली नाही त्यामुळे आरमार खोळंबले . सिद्धीने तुम्हास लाच दिली असेल त्यामुळे तुम्हाला अशी बुद्धी झाली . तरी यापुढे अशी तक्रार आल्यास तुमची गय केली जाणार नाही . ब्राम्हण असलात तरी तुमचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही .
शिवाजी महाराजांच्या स्वभावातील दुसरा पैलु :- तत्कालीन समजुती प्रमाणे ब्राम्ह्नास मान दिला जात होता . शिवाजी महाराज तत्कालीन रूढी मानणारे असेले तरी स्वराज्याच्या कामात हलगर्जीपणा शिवाजी महाराजांना खपत न्हवता . त्यामुळे अश्या कामचुकार व्यक्तीच्या पदाचा व जातीचा विचार ना करता महाराज त्याची कडक शब्दात कानउघाडणी करत होते.
नागेश सावंत

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...