१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - ४
संजय सोनावणे
अब्दालीच्या फौजा मुख्य छावणीतून साधारणतः सात - आठच्या दरम्यान आघाडीकडे रवाना झाल्या असाव्यात. अफगाण लष्कराची उजवी बाजू सांभाळणाऱ्या रोहिल्यांच्या सैन्यात मुख्यतः घोडेस्वारांचा भरणा अधिक होता. त्याशिवाय काही प्रमाणात पायदळ देखील होते. रोहिल्यांच्या या फौजेचे नेतृत्व हाफिज रहमत खान, दुंदेखान, फैजुल्लाखान इ. सरदार करत होते. रहमत खान आजारी असल्याने पालखीत बसला होता तर त्याचा मुलगा इनायतखान व चुलत भाऊ दुंदेखान हे रहमत खानाच्या सैन्याचे नेतृत्व करीत होते. रोहिल्यांची मुख्य शस्त्रे तलवार, ढाल, धनुष्य - बाण, भाले, कट्यारी इ. असून बंदुका फार क्वचित लोकांकडे असाव्यात. या सैन्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या कि नाही याची माहिती मिळत नाही. कदाचित असाव्यात अथवा असल्यास त्यांचे प्रमाण नगण्य असेच असावे. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला अमीरबेग, बरकुरदारखान यांची अफगाण पथके होती. यात सर्व घोडेस्वार असून यांच्याकडे देखील तलवारी, कट्यारी अशीचं शस्त्रे होती. या अफगाण पथकासोबत बहुतेक हलक्या अशा तोफा असव्यात अथवा नसाव्यात.
अब्दालीच्या उजव्या आघाडीवर असलेली फौज पानिपतच्या रोखाने म्हणजे वायव्येकडे न वळता काहीशी उत्तर - ईशान्य दिशेने पुढे सरकत गेली. यामागील कारण काय असावे ? या सैन्याचा रोख सरळ उत्तरेस असायला हवा होता पण यांचा मोहरा ईशान्य दिशेकडे वळत गेला. यामागील कारण माझ्या मते असे आहे कि, मराठी सैन्य गनिमी काव्याने हल्ला करणार हे निश्चित होते. अशा स्थितीत त्यांचा अब्दालीच्या छावणीवर हल्ला आलाचं तर त्यांची एक तुकडी छावणीच्या उजव्या बाजूवर येऊन आदळणार, म्हणजे ती थेट उत्तरेकडून न येता ईशान्येकडून येणार हे निश्चित ! अर्थात, दिशांचे हे भान त्याकाळी लोकांना फारसे नव्हते. परंतु रोहिला सैन्य व त्यांच्या डावीकडे असलेले अफगाण वजीराचे सैन्य, यांमध्ये दीड ते दोन किलोमीटर्सचे अंतर असावे. किंवा याहून कमी. हे जर लक्षात घेतले तर रोहिला सैन्याचा रोख ईशान्येकडे का वळला असावा याचे उत्तर मिळते. आपल्या व वजीराच्या तुकडीत फार कमी अंतर आहे, याचा अर्थ मराठी सैन्य आपल्या दोघांच्या मधून लढाई न देता तरी जाऊ शकत नाही पण उजव्या बगलेवरून निसटून गेले तर ? बहुतेक याच भयाने, रोहिल्यांची फौज काहीशी ईशान्येकडे सरकली. नऊ - साडेनऊच्या सुमारास हि फौज, मराठी सैन्याच्या गोलाच्या आघाडीवर असलेल्या गारदी पथकांच्या नजीक जाऊन पोहोचली. माझ्या मते या दोन सैन्यांच्या दरम्यान कमीतकमी एक ते दीड किलोमीटर्सचे अंतर असावे. अब्दालीच्या छावणीचा पसारा पूर्व - पश्चिम असा चार - सहा किलोमीटर्स अंतरावर पसरला होता असे जर गृहीत धरले तर, छावणीच्या उजव्या अंगाला असलेल्या या रोहिला फौजेला, गारदी सैन्याच्या अंगावर चालून जाण्यासाठी कमीतकमी तीन - साडेतीन किलोमीटर्सचे अंतर तुडवावे लागले असावे. रोहिला सैन्याने सात - आठच्या दरम्यान मुख्य छावणी सोडली असे जर गृहीत धरले तर तीन - साडेतीन किलोमीटर्सचे अंतर कापायला त्यांना सुमारे दीड - दोन तासांचा अवधी लागला असावा. सकाळी नऊ - साडेनऊच्या सुमारास गारदी सैन्याच्या उजव्या हाताला, सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर शत्रू सैन्याची निशाणे दिसू लागली. बहुतेक याच वेळेस अफगाण वजीर हुजुरातीच्या उजव्या बाजूनजीक येऊन पोहोचला असावा. त्यामुळेचं मराठी सैन्यात चौघडा - नौबत वाजवण्यास सुरवात झाली असावी
No comments:
Post a Comment