विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 February 2023

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग ३

 
सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग ३
प्रजाहितदक्षतेची उदाहरणे :
महेश्वरच्या रयतेकडून राघोबादादा पेशव्यांनी एकदा आठ बैल नेले. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या रयतेला प्रत्येकी आठ रुपये या प्रमाणे 64 रुपये स्वतःच्या तिजोरीतून भरपाई दिली.
कल्लू हवालदार या शिपायाची मोठी रक्कम भिकनगावी चोरी गेली होती. इतक्या छोट्या गोष्टीतही त्यांनी स्वतः लक्ष घातले आणि कल्लू हवालदाराला न्याय मिळवून दिला.
चांदवडच्या मामलेदाराने रयतेला त्रास दिल्याची अहिल्याबाईंकडे तक्रार आली. त्यांनी मामलेदाराला कडक शब्दांत ताकीद दिली. “कै. सुभेदार रयतेचे उत्तम संगोपन करीत होते. रयतेला तुम्ही कोणत्याही प्रकारे त्रास देता कामा नये. त्यांची मने सांभाळून त्यांच्याकडे लक्ष देणे. फिरून जर बोभाट कानावर आला तर, परिणाम फार वाईट होतील, हे समजावे.” यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रसंगी फटकारण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट व्हावी. राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई यशस्वी होत्या. पेशव्यांच्या दरबारात त्यांना सर्वोच्च मान होता. बाईंचा सगळ्या कारभाऱ्यांवर वचक होता. प्रशासनावर घट्ट मांड होती.
मकाजी गीते हे मराठ्यांचे मेवाडमधील वसुली अधिकारी होते. तेथील जनता त्यांना वसूल द्यायला तयार नव्हती. जनतेने लेखी मागणी केली की, “दख्खन्यांमध्ये आम्ही फक्त मातोश्री अहिल्याबाईंच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यांच्याकडून आम्हाला पत्र आल्यास आम्ही तुमचा भरवसा धरू.”

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...