विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 February 2023

शूरवीर दत्ताजी शिंदे

 



शूरवीर दत्ताजी शिंदे
ग्वाल्हेरचे शिंदे घराणे हे मराठी स्वराज्यातील अत्यंत शूर व पराक्रमी घराणे होय. सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेडची पाटीलकी या घराण्याकडे होती. शिंदे घराण्यात राणोजी, दत्ताजी, जनकोजी, जयाप्पा यांसारखे पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले. कुकडीच्या लढाईत निजामाच्या हत्तीची अंबारी खाली पाडणाऱ्यांत दत्ताजी शिंदे प्रमुख होते.
दत्ताजी शिंदे हे अत्यंत शूर व पराक्रमी होते. उत्तरेत लाहोरचा बंदोबस्त दत्ताजी शिंदे यांनीच केला होता. त्या वेळी उत्तरेतील तीर्थक्षेत्रे मुक्त करून आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी दत्ताजी शिंदे यांनी पैसा उभा केला होता. मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे फार मोठे योगदान आहे. या घराण्यातील राणोजी, महादजी या कर्तृत्ववान पुरुषांमुळेच पानिपतचे अपयश धुवून निघाले होते व उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या घराण्याला दौलतीचे, स्वराज्याचे आधारस्तंभ म्हणण्यात आले.
सन १७५८मध्ये दत्ताजींचे लग्न भागीरथीबाई यांच्याशी झाले होते. भागीरथीबाई या अत्यंत सालस, हुशार व धोरणी होत्या. लग्न झाल्यावर दत्ताजी उज्जैनला आले. दत्ताजींचा शूर व पराक्रमी स्वभाव पाहता, मल्हारराव होळकरांनी त्यांना नजीबाचे पारिपत्य करण्यास १० जानेवारी १७६० रोजी पानिपतला पाठवले. दत्ताजींनी नजीबावर हल्ला केला. अफगाणी सैन्य बंदुका घेऊन तयार होते. मराठी सैन्याची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी आणि भाले. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला दत्ताजी आणि जनकोजीला समर्थपणे तोंड देता आले नाही.
बुरांडी घाटावर रोहिल्यांच्या गोळीबारात दत्ताजी शिंदे घोड्यावरून खाली आले. सुडाने फुरफुरलेले दत्ताजी रोहिल्यांकडे झेपावले. त्यातच समोरच्या गर्दीत त्यांना नजिबाचे तोंड दिसले, तसे ते बेफान होऊन एकेकाला कंठस्नान घालीत वादळासारखे घोंगावत पुढे जात होते. तोच समोरून कुतुबशहा व नजीर, दत्ताजी शिंदे यांच्यावर झेपावले. दत्ताजी जखमी होऊन पडले होते. अंगात थोडी धुगधुगी दिसत होती.
कुतुबशहाने ‘दत्ताऽऽ’ म्हणून हाक दिली तसे दत्ताजी यांनी त्यांच्यावर डोळे रोखले.
कुतुबशहा म्हणाला ‘क्यूं पाटील, और लढोगेऽऽ?’ कुतुबशहा व नजीब चिडून दत्ताजींच्या उरावर जाऊन बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकऱ्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामान एकत्र केलं. यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपाऱ्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजलं. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वाऱ्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीला माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता. हा भयंकर प्रसंग पाहून झाडावरची पाखरेसुद्धा थबकली. यमुनेचा प्रवाहसुद्धा स्तब्ध झाला, इतका भयंकर प्रसंग होता तो.
जनकोजींचा जखमी देह घेऊन मराठा सैन्य तळावर आले. त्यांच्या तोंडावरची घोंगडी पत्नी काशिबाई यांनी बाजूला केली. त्यांच्या सर्वांगावर जखमांचे वार दिसत होते. ‘पाणीऽ पाणीऽऽ’ असे जनकोजी क्षीण आवाजात पुटपुटत होते. जनकोजींच्या पत्नी काशीबाई गलबलून गेल्या. आणि ओरडू लागल्या ‘माझ्या दौलतीचा राजाऽ शिपीभर पाण्याला तू महाग झालास का?’ जनकोजी विचारू लागले, ‘माझे काकासाहेब कुठे आहेत? कुठे आहेत काका?’
साऱ्यांनी माना खाली घातल्या. भागीरथीबाई कावऱ्याबावऱ्या होऊन मुक्या हरिणीसारख्या साऱ्यांकडे बघू लागल्या होत्या. झाला प्रकार त्यांच्या ध्यानात आला आणि त्या धाय मोकलून रडू लागल्या. तोंडात मारून घेऊ लागल्या. जमिनीवर हात आपटू लागल्या. त्यांच्यासाठी धरती फाटली आणि आभाळपण फुटलं. टाका कसा घालायचा? त्या जोरजोरात किंचाळून रडू लागल्या. ‘माझ्या चांदसूर्याऽऽ कुठे गेलास रे? कुणाची ही दौलत, कुणाचे वाडे आणि राजवाडे? माझ्या चांदाचा मुखडाही बघायला मिळाला नाही, मला एकटीला टाकून कुठे गेलास रे माझ्या बाजींद्या सरदाराऽ?’
भागीरथीबाईंच्या शोकाने सारे व्याकुळ झाले होते. परंतु पुढे भागीरथीबाईंनी आपला शोक आवरला. त्या जनकोजीना म्हणतात, ‘बाबा, तुम्ही बायकांसारखे का रडता? आपण सारेच असे बसलो तर वैरी सारी उरलीसुरली माणसं घशात घालेल. चला उठाऽ. भराभरा निघू या’ जिच्यावर आभाळ कोसळले, तिचे धीराचे बोल ऐकून साऱ्यांच्या उरात उभारी आली.
मोडकी -तोडकी, अर्धमेली फौज तशीच वाट तुडवत पुढे निघाली. भागीरथीच्या भाग्याचा गोळा ढगाआड गेला होता. आता पोटातला गोळा जगविण्यासाठी त्या जिवाच्या आकांताने पळत सुटल्या होत्या. नऊ महिने भरलेल्या भागीरथीबाई घोड्यावर बसून निघाल्या. पुढे भागीरथीबाई शिंदे बुरांडी घाटातून निसटून कोटपुतली या भुईकोटामध्ये आल्या. तेथे त्या प्रसूत झाल्या. धावपळ व संकटामुळे मुलगा जगला नाही. या युद्धात कोवळी, निष्पाप लेकरंसुद्धा बळी पडली. हे मूल गेले आणि दत्ताजी शिंदे यांचा वंशच समाप्त झाला. निखळलेल्या गोंड्याचा साधा धागाही शिल्लक राहिला नाही.
दत्ताजी शिंदे म्हणजे मराठ्यांच्या पालखीचा गोंडा होता. काळाने हा गोंडा खुडून नेला होता. अहिल्याबाई होळकर या तेथेच तळावर होत्या. भागीरथीबाई यांची त्या समजूत काढतात. म्हणतात, ‘बाई रडू नका. आपण मराठी सरदारांच्या बायका. आपलं लगीन सरदारांशी नव्हे तर तलवारीशी लागतं. तलवार गळाली की आपण कोसळतो.’
यावर भागिरथीबाई म्हणतात, ‘बाईसाहेब, खंडेराव गेले तेव्हा त्यांचे तुम्ही अंत्यदर्शन तरी घेतले असेल. तिरडीवर चुडा तरी फोडला असेल. त्यांच्या अंत्यदर्शनाचे भाग्यसुद्धा मला लाभले नाही.’
१० जानेवारी १७६० रोजी दत्ताजी शिंदे यांचा पानिपताच्या रणांगणावर मृत्यू झाला. मराठ्यांच्या इतिहासात अशा किती तरी समंजस, धाडसी, पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या.
असे हे थोर दत्ताजी शिंदे आणि भागीरथीबाई शिंदे यांना मानाचा मुजरा.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)
(संदर्भ : मराठी विश्वकोश, पानिपत - विश्वास पाटील, मराठी रियासत - गो. स. सरदेसाई)
(टीप : या लढाईनंतर एका वर्षाने, १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या रणक्षेत्रावर सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव पेशवे, अहमदशहा अब्दाली यांच्यात शेवटचा निकाली रणसंग्राम झाला.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...