विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 February 2023

रावरंभा निंबाळकर

 

रावरंभा निंबाळकर
फलटणचे बजाजी नाईक-निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर. यांचा कार्यकाळ मोठा असून, इतिहासकालीन अनेक घटनांत त्यांचा मोठा वाटा आहे. २२ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.......
फलटणचे बजाजी नाईक-निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे पुत्र म्हणजे रावरंभा निंबाळकर. यांचा कार्यकाळ मोठा असून, इतिहासकालीन अनेक घटनांत त्यांचा मोठा वाटा आहे. १७०७ ते १९४२ अशी जवळजवळ २२३ वर्षे रावरंभा निंबाळकर यांच्या वंशजांकडे जहागिरी होती. ती त्यांना निजामाकडून मिळाली होती. निजामाच्या वतीने त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग, तुळजापूर, भूम, सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, शेंद्री, रोपळे, दहीगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी, लातूर जिल्ह्यातील राजुरी, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे आणि २२ हजारांची मनसब मिळाली होती. रावरंभा यांना पालखी आणि मशालीचा मान होता.
निंबाळकर घराण्यातील सात वारसदारांनी ती जहागिरी सांभाळली होती. या गावांतील वास्तू अजूनही आपल्या इतिहासाची साक्ष देतात. माढा शहरात त्यांनी बांधलेला किल्ला, येडेश्वरीचे मंदिर त्यांच्या कार्याची साक्ष देतात.
अठराव्या शतकात रंभाजीराव निंबाळकर यांचे घराणे मराठ्यांच्या इतिहासात एक पराक्रमी घराणे म्हणून चांगलेच नावाजलेले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांचा दक्षिणेतील सुभेदार मीर कमरुद्दीन खानाने इसवी सन १७२४मध्ये दक्षिणेत स्वतःचे राज्य निर्माण केले. याला हैदराबादची निजामशाही म्हटले जाते. ही निजामशाही स्थापन करण्यात रंभाजींची मोठी भूमिका होती. त्यामुळे निजामाने रंभाजींना ‘रावरंभा’ ही पदवी दिली. तेव्हापासून रंभाजी हे रावरंभा या नावाने ओळखले जाऊ लागले. रावरंभा या शब्दाचा अर्थ होतो जेता किंवा सतत जिंकणारा. रावरंभा हे कोण्या व्यक्तीचे नाव नसून, ती एक पदवी आहे.
रावरंभा निंबाळकर यांनी आपल्या हयातीत उत्तुंग पराक्रम करून निंबाळकर हे नाव अजरामर केले. छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून १७०७मध्ये महाराष्ट्रात परत आले. त्या वेळी रंभाजीराव निंबाळकर हे पुणे प्रांताचे सुभेदार होते. औरंगजेबाने आपला उत्तराधिकारी म्हणून आजम याला घोषित केले. दक्षिणेचा सुभेदार म्हणून मुघलांचा प्रसिद्ध सेनानी झुल्फिकारखान यास तेथे नियुक्त केले होते.
पुणे, सुपे, सासवड, इंदापूर या भागाचे बारामती येथे ठाणे असल्याने या भागाचा कारभार बारामती येथून चालत होता. मराठ्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठाणे होते. मराठ्यांना आम्ही चौथाई देणार नाही असा पवित्रा मुघलांनी घेतला होता. पुणे प्रांताची वसुली करण्यासाठी रंभाजी निंबाळकर यांना पाठवले होते. नंतर रंभाजी निंबाळकर चंद्रसेन जाधव यांच्याबरोबर निजामाकडे ओढले गेले
त्याअगोदर शाहू छत्रपती यांनी रंभाजी नाईक-निंबाळकर यांना स्वराज्याच्या सेवेत घेण्याचा प्रयत्न केला.
स्वराज्याच्या गादीवर हक्क कोणाचा यावरून छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्यामध्ये वाद झाले आणि शाहू महाराजांचा सातारा व ताराराणींचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. १७०७मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा संपुष्टात आला व मराठी स्वराज्यातच मालकी हक्कासाठी अंतर्गत लढा सुरू झाला. या काळात मराठी सरदारांची अवस्था बिकट झाली होती. छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाई या दोघांनाही न जुमानता बंडखोर वृत्तीने वर्तन करण्याची परंपरा याच काळात वाढीस लागली. वाटेल त्या वेळेस वाटेल त्याचा पक्ष धरावा, मुलुख मारावा व पैसा मिळवावा अशा प्रवृत्तीने मराठे सरदार वागत होते. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती.
मराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या वादात विभागले गेले. काही अंतर्गत वादाला कंटाळून हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले. यात रंभाजी नाईक-निंबाळकर हे निजामाकडे गेले. हैदराबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे निंबाळकर घराणे. हे घराणे अतिशय शौर्यशाली म्हणून त्या काळीही प्रसिद्ध होते. रंभाजी निंबाळकर यांच्या पराक्रमावर खूश होऊन निजामाने त्यांना रावरंभा ही पदवी आणि सात हजारी स्वार अशी मनसब दिली. करमाळा, भूम, बारामती, तुळजापूर इथली जहागिरी दिली.
रावरंभा घराण्यातले रंभाजी, जानोजी, आनंदराव, रावरंभा दुसरे, खंडेराव यांच्यासारखे पराक्रमी पुरुष शेवटपर्यंत निजामशाहीत राहिले. या घराण्यात युद्धकलेबरोबर साहित्यकला, सौंदर्यदृष्टी यांचेही वरदान होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आई भवानी. रंभाजी नाईक-निंबाळकर हे बरीच वर्षे तुळजापूर येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाजूच्या ओवऱ्या आणि जवळपास बारा ते पंधरा फूट रुंदीची भिंत आणि पूर्व-पश्चिमेला दोन भव्य दरवाजे बांधले. त्यामुळेच भवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सरदार निंबाळकर’ हे नाव देण्यात आलेले आहे. आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात.
निंबाळकर हे तुळजाभवानी देवीचे उपासक बनले. औरंगाबाद येथील आजची कोटला कॉलनी म्हणजेच पूर्वीचे रंभापूर असून, तेथे त्यांची फार मोठी हवेली होती. हैदराबाद येथे चारमिनारच्या बाजूला रावरंभाकी देवडी नावाने त्यांचे निवासस्थान प्रसिद्ध होते.
रंभाजी निंबाळकर आयुष्यभर हातातली समशेर खाली न ठेवता बंडखोर प्रवृत्तीने वागले. रंभाजी उर्फ रावरंभा यांच्या अंगी साहित्यिकाचे गुणही होते, हे कोणाला सांगूनदेखील खरे वाटणार नाही. उत्तरायुष्यात रंभाजी यांनी पराक्रमाची समशेर खाली ठेवून लेखणी हातात घेतली होती. रावरंभा हे सौंदर्याचे पूजक व शक्तीचे उपासक होते. आयुष्याचा अखेरचा काळ रावरंभा निंबाळकर कमलालय निवासी म्हणजेच कमलादेवीच्या सान्निध्यात करमाळा शहरातच राहायला गेले. २२ नोव्हेंबर १७३६ रोजी शूर रंभाजी निंबाळकर यांचा मृत्यू झाला.
अशा या शौर्यशाली रावरंभा निंबाळकर यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा.
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर, पुणे
(लेखिका इतिहास अभ्यासक आहेत.)
(टीप : करमाळा येथील कमलादेवी मंदिराचे बांधकाम रावरंभा यांचे पुत्र जानोजी निंबाळकर यांनी १७४०मध्ये केलेले आहे. हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय असून, दाक्षिणात्य वास्तुशास्त्राचा अत्यंत उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिरात नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ या चित्रपटाचे शूटिंग केले होते.)


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...