विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग १५

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १५
डभईची लढाई हे बाजीरावाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे प्रकरण असल्याने याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे येथे भाग आहे. सेनापती खंडेराव दाभाड्यास मुलूखगिरीसाठी गुजरात प्रांत नेमून देण्यात आला होता, त्याचप्रमाणे माळवा प्रांत पेशव्यास मिळाला होता. अर्थात हि वाटणी स्वतः छत्रपती शाहूने केली होती. पण पुढे शाहूने गुजरात प्रांतातील निम्मा मोकासा चिमाजीच्या नावे करून निम्मा त्रिंबकराव दाभाड्यास दिला. त्रिंबकरावास शाहूचा निर्णय मंजूर नसल्याने त्याने आपली नाराजी छत्रपतीकडे दर्शवली. इकडे बाजीरावाने त्रिंबकरावची समजूत काढण्यासाठी त्यास, आपण माळवा प्रांती निम्मी वाटणी देतो असे सांगितले. परंतु त्रिंबकराव यास राजी झाला नाही. सेनापतीस नाराज करणे शाहूस योग्य वाटले नाही आणि त्याने चिमाजीला दिलेला निम्मा मोकासा रद्द केला. परंतु, तरीही बाजीराव गुजरातमधील वाटणीसाठी आग्रही राहिला.
वास्तविक, बाजीरावास जसा स्वतःच्या पराक्रमाचा, कर्तबगारीचा आत्मप्रत्यय आला होता ; त्याचप्रमाणे आपल्या छत्रपतीचा दुबळेपणा देखील हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागला होता. त्याशिवाय त्याच्या पूर्वसुरींची परंपरा व समकालीन लोकांच्या वर्तनाचाही त्याच्या मनावर थोडाफार परिणाम झाला होता. बलवान छत्रपतींची परंपरा शिवाजी महाराजांपासून सुरु होऊन तिचा शेवट संभाजीसोबत झाला होता. राजारामास संताजी व धनाजीने कित्येकदा रडवले होते. शाहू राजारामाइतका दुबळा नसला तरी संभाजीसारखा प्रखरही नव्हता. त्यामुळे धनाजी - चंद्रसेन या पितापुत्रांनी त्यास बरेच हैराण केले होते. शाहूचे वर्तन पाहता दरबारातील कोणताही मातबर मानकरी पुढेमागे त्यास बगलेत मारणार याचा अंदाज बाजीरावास आला होता. मग हे कार्य आपणचं हाती घेतले तर काय फरक पडतो अशी त्याची भावना बनल्यास नवल नाही. त्याशिवाय त्याच्या समकालीन पवार, आंग्रे होळकर, भोसले इ. सरदारांचे स्वतंत्र वर्तन त्याच्या नजरेसमोर होते. शाहूची नाममात्र ताबेदारी स्वीकारून ते आपापली स्वतंत्र संस्थाने उभारत असल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नाही. आपणही यांसारखा एखादा प्रयत्न करावा अशी इच्छा त्याच्या मनी उत्पन्न झाली.त्यानुसार त्याने बुंदेलखंडात एक प्रयत्न करून पाहिला. छत्रसालच्या मदतीस बाजीराव गेला आणि जहागीर मिळवून आला पण ती जहागीर त्याने स्वतःच्या खाजगी दौलतीमध्ये जमा धरली. मराठी राज्यात तिचा अंतर्भाव केला नाही. यावरून त्याचे विचार कोणत्या दिशेने चालले होते याची कल्पना येते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...