- सुरक्षा घोंगडे, वारणानगर
भारतातील बहुतांश राजघराण्यातील स्त्रियांचे आयुष्य राजवाड्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. या बाबीला अत्यंत कमी अपवाद आपल्याला आढळतात. बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसऱ्या पत्नी महाराणी चिमणाबाई गायकवाड या अशाच दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांपैकी एक आहेत. सामाजिक सुधारणा, स्त्रियांची उन्नती आणि राष्ट्रवाद याबाबतच्या आपले पती महाराजा सयाजीरावांच्या आंतरिक तळमळीला तितक्याच खंबीरपणे साथ देणाऱ्या महाराणी चिमणाबाईंचे स्त्रीउद्धाराचे कार्य आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जाणून घेणे प्रेरणादायी ठरेल.
सयाजीराव महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी चिमणाबाईंचा ७ मे १८८५ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे इंदोरजवळील देवास येथे परंपरावादी कुटुंबात जन्मलेल्या गजराबाईंशी (दुसऱ्या महाराणी चिमणाबाई) महाराजांचा दुसरा विवाह २८ डिसेंबर १८८५ रोजी झाला. लग्नावेळी निरक्षर असणाऱ्या चिमनाबाईंच्या व्यक्तिमत्वामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यात महाराजांचा मोठा वाटा होता. विवाहानंतर चिमणाबाईंनी घेतलेल्या शिक्षणामागे सयाजीराव महाराजांची प्रेरणा होती. परंपरावादी कुटुंबात वाढलेल्या चिमणाबाई विवाहानंतर आधुनिक जीवनप्रणालीचा स्वीकार करण्यास सुरुवातीला तयार नव्हत्या. परंतु महाराजांमुळे शक्य झालेले युरोपियन देशांचे दौरे व पाश्चात्य राजघराण्यातील जोडप्यांशी झालेले वैचारिक आदान-प्रदानामुळे चिमणाबाईंना स्त्रीशिक्षणाचे महत्व पटले.
स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी आपल्या शारीरिक विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे याबाबत महाराजांप्रमाणेच त्या आग्रही होत्या. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी चिमणाबाई रोज ७५ मिनिटे चालण्याबरोबरच घोडेस्वारीसुद्धा करत. टेबल टेनिसची आवड असल्याने चिमणाबाई रोज संध्याकाळी टेनिसचे ४ सेट खेळत. चिमणाबाईंबरोबर टेनिस खेळताना बडोदा लष्करात जनरलपदी कार्यरत असणाऱ्या नानासाहेब शिंदेंची दमछाक होत असे. यावरून चिमणाबाईंच्या टेनिस खेळातील कौशल्य व शारीरिक क्षमता यांची आपल्याला प्रचिती येते. महाराजांबरोबर अनेक शिकारी दौऱ्यात उत्साहाने सहभागी होणाऱ्या चिमणाबाईंनी स्वतंत्रपणे वाघ, चित्ता यांसारख्या जंगली जनावरांची शिकार केली होती.
नवनवीन बाबी शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या चिमणाबाईंनी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानातील अनेक कल्याणकारी योजनांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. महाराजांच्या प्रेरणेने विवाहानंतर शिक्षण घेतलेल्या चिमणाबाईंनी स्त्रीशिक्षण प्रसाराचे कार्य करणाऱ्या विविध संस्थांना वेळोवेळी उदारहस्ते आर्थिक साहाय्य केले. मुलींच्या शिक्षणासाठी चिमणाबाईंनी स्वतःच्या खानगी खर्चातून दरमहा २०० रु. ची तरतूद केली होती. त्याचप्रमाणे बॉम्बे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यासाठी महाराणी चिमणाबाईंनी स्वतंत्रपणे १,००,००० रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती.
स्त्रियांबद्दलच्या पारंपारिक धारणा आणि कल्पना दृढमूल असणाऱ्या काळात महाराणी चिमणाबाईंनी पडदा पद्धतीचा त्याग केला. चिमणाबाई पडदा पद्धतीचा त्याग करणाऱ्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. मुलींसाठी प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या चिमणाबाईंनी बालविवाहाची रूढी बंद करण्याची मागणी केली होती.
महाराजांबरोबर वेळोवेळी भारताबरोबरच युरोप, अमेरिकेसारख्या पाश्चात्य आणि जपानसारख्या पौर्वात्य देशांमध्ये केलेल्या प्रवासात महाराणी चिमणाबाईंना पाश्चात्य स्त्रियांनी उभारलेल्या संस्थांचे अवलोकन करता आले. भारतीय स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्त्रियांना शिक्षण देतानाच त्यांच्या कौशल्यांना वाव देणाऱ्या विविध संस्थांची उभारणी करणे आवश्यक असल्याचे चिमणाबाईंचे मत होते. परदेशातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण करत महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात उभारलेल्या विविध संस्था आणि राबवलेल्या योजनांचा आदर्श चिमणाबाईंसमोर होता.
या आदर्शाचे अनुकरण करत महाराणी चिमणाबाईंनी महाराणी चिमणाबाई लेडीज क्लब (१९०३), श्री चिमणाबाई स्त्रीउद्योगालय (१९१०), महाराणी चिमणाबाई स्त्री समाज (१९१५), कन्या आरोग्य मंदिर (१९१५), मुलींचे महाराणी हायस्कूल (१९०७), भगिनी समाज (१९२१), महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळा (१९२३), महाराणी चिमणाबाई प्रसूतिगृह आणि शिशूकल्याण संस्था (१९२३), महिला क्रीडा मंडळ (१९३७) या संस्थांच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावत स्त्रियांना स्वतःच्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रे खुली करून दिली. संस्थेची स्थापना करण्याबरोबरच तिच्या वाढीसाठी आवश्यक सोई-सुविधा काटेकोरपणे पुरवण्याची महाराजांची पद्धत महाराणी चिमणाबाईंनीदेखील अवलंबली. महाराणी चिमणाबाई महिला पाठशाळेस चिमणाबाईंकडून ६,००० रु. वार्षिक अनुदानाची तरतूद करण्यात आली होती.
स्त्री-उन्नतीसाठीच्या विविध प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या महाराणी चिमणाबाई स्त्री-पुरुष समानतेसाठी विशेष आग्रही होत्या. सैनिकी खात्याच्या ‘कवायती फौजे’संदर्भातील सेक्शन ९५ नियमामध्ये राजघराण्यातील व्यक्ती व इतर सन्माननीय व्यक्तींना त्यांच्या श्रेणीनुसार विविध समारंभप्रसंगी द्यावयाच्या अंगरक्षकांची संख्या निर्धारित करण्यात आली होती. त्यानुसार महाराणी व युवराज यांना ३२ स्वारांचा मान देण्यात आला होता. परंतु समानतेच्या तत्वानुसार विविध समारंभांप्रसंगी महाराजांइतकेच अंगरक्षक आपल्याला मिळावेत अशी मागणी करतानाच चिमणाबाईंनी अंगरक्षकांची ही संख्या कशाच्या आधारावर निश्चित करण्यात आली याचीदेखील माहिती मागवली. १९०४ मध्ये बडोद्याच्या दिवाणांनी मंजूरी दिलेल्या सैनिकी खात्याच्या टिपणात सर्वप्रथम अंगरक्षकांची ही संख्या निर्धारित करण्यात आली होती. पुढे महाराजांच्या आदेशानुसार प्रकाशित झालेल्या ‘कवायती नियमां’त हीच संख्या कायम ठेवण्यात आली. महाराणी चिमणाबाईंची समान अंगरक्षकांची ही मागणी अमान्य करण्यात आली असली तरी यातून चिमणाबाईंचा स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह यातून स्पष्ट होतो. महाराजांच्या मृत्युनंतर ब्रिटीश सरकारने पत्रात केलेल्या Dowager (विधवा) महाराणी या उल्लेखावर आक्षेप नोंदवत असा उल्लेख न करण्याची विनंती चिमणाबाईंनी केली होती. त्यांची ही मागणी ब्रिटीश सरकारकडून मान्य करण्यात आली.
१९११ मध्ये भारतीय स्त्रियांच्या स्थितीचे जगातील ७ खंडातील २९ देशांमधील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करणारा महाराणी चिमणाबाई लिखित ‘The Position of Women in Indian Life’ हा भारतीय स्त्रियांना अर्पण केलेला ग्रंथ लंडनमधून प्रकाशित झाला होता. हा ग्रंथ म्हणजे सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने विकसित झालेल्या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्वाचा परमोच्च बिंदू होता. स्त्रियांना आत्मसन्मानासह सक्रिय सामाजिक सहभागासाठी काय करायला हवे याचा जागतिक परिप्रेक्ष्यात विचार करणारा जगातील हा एकमेव ग्रंथ आहे. तर जगातील स्त्रियांच्या स्थितीशी भारतीय स्त्रियांच्या स्थितीची तुलना करून लिहिलेला हा आजखेरचा एकमेव ग्रंथ आहे. या ग्रंथाचे लेखन चिमणाबाईंनी एस.एम.मित्रा या विद्वानाच्या सहकार्याने केले होते.
सार्वजनिक जीवनातून स्त्रियांना वगळले जाण्याची कारणमीमांसा करतानाच त्यावरील उपाययोजना कशा प्रकारे लागू करता येतील याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न चिमणाबाईंनी या ग्रंथात केला आहे. भारतातील अनेक प्रगतशील योजनांच्या अपयशाचे मुख्य कारण या योजनांमधील स्त्रियांचा अत्यल्प सहभाग हे असल्याचे प्रतिपादन चिमणाबाईंनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होवून कल्याणकारी सामाजिक कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या स्त्रियांना उपयुक्त अनेक व्यावहारिक सूचना चिमणाबाईंनी या ग्रंथात केल्या आहेत. पडदा पद्धतीच्या परंपरावादी काळात स्त्रियांनी कृषी, कला, कारागिरी, लोकोपयोगी सेवाकामे, हॉटेल व्यवसाय इ. आर्थिक व्यवसायांशी परिचित होवून त्यांचा स्वीकार करतानाच बौद्धिक क्षेत्रसुद्धा स्त्रियांनी आपलेसे केले पाहिजे अशी इच्छा या ग्रंथाच्या माध्यमातून त्या व्यक्त करतात. जगातील ७ खंडातील २९ देशांतील स्त्रियांच्या स्थितीशी तुलना करत स्वातंत्र्याप्राप्तीच्या आधी ३७ वर्षे भारतीय स्त्रियांच्या उत्कर्षाचा ‘मार्ग’ आखून देणाऱ्या या एकमेव ग्रंथाचा वाड्मय कोशामध्ये साधा उल्लेखसुद्धा नसणे ही मराठी साहित्य क्षेत्रासाठी लाजिरवाणी बाब आहे.
१८८२ साली ताराबाईंनी ‘स्त्रीपुरुषतुलना’ हा स्फोटक निबंध लिहून स्त्री शोषणाचा अध्याय लिहिला. त्यानंतर २७ वर्षानी या ग्रंथाद्वारे चिमणाबाईंनी स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा महामार्ग आखला होता. आजच्या स्त्रीवादी साहित्याला आत्मचिंतनाकडून आत्मटीकेकडे घेऊन जात असताना पुरुष द्वेषाची बाधा होऊ न देता समतावादी आणि प्रत्येक कालखंडात सुसंगत असा कृतिकार्यक्रम म्हणजे हा महाग्रंथ आहे. हे पुस्तक स्त्रियांसाठी बायबल समान आहे. परंतु दुर्दैवाने स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासाने, इतिहास अभ्यासकांनी आणि महाराष्ट्राने आजअखेर महाराणी चिमणाबाईंची व त्यांच्या या ग्रंथाची दखल घेतली नाही.
सयाजीराव महाराजांच्या ‘वाटेने’ मार्गक्रमण करत स्त्री-उन्नतीसाठी कार्यरत राहिलेल्या महाराणी चिमणाबाईंना ३ ऑगस्ट १८९२ रोजी ब्रिटीश महाराणींनी ‘Emperial Order of the Crown of India’ या किताबाने सन्मानित केले. १९०६ मध्ये कलकत्ता येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या दुसऱ्या हिंदी औद्योगिक परिषदेतील महिला विभागाच्या अध्यक्षा म्हणून चिमणाबाईंची निवड करण्यात आली होती. तर १९२७ मध्ये पुण्यात भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आले.
१९२९ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे ‘तौलनिक भाषाशास्त्र’ या विषयावरील भाषण बडोद्यातील सहविचारिणी सभेने आयोजित केले होते. या भाषणाचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचून महाराणी चिमणाबाईंनी विठ्ठल रामजी शिंदे यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी चिमणाबाईंनी रशियातील कम्युनिझम या विषयावर आपल्याशी चर्चा केल्याचा संदर्भ शिंदे यांनी त्यांच्या ‘माझ्या आठवणी व अनुभव’ या आत्मचरित्रात नोंदवला आहे. ज्या काळात भारतात कम्युनिझम हा विषय नुकताच चर्चेत आला होता त्या काळात एक मराठी राणी कम्युनिझमसारख्या गंभीर विषयांत रुची ठेवते यातच महाराणी चिमणाबाई यांचे बौद्धिक क्षेत्रातील अनन्य स्थान स्पष्ट होते.
फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला भूषण असणाऱ्या या महान परंतु अज्ञात राणीचे निधन २३ ऑगस्ट १९५८ रोजी पुणे येथे झाले.
No comments:
Post a Comment