अंतिम हिंदू सम्राट #थोरले_शाहू_महाराज स्मृतिदिन ..!!!
(आंग्ल तारखेनुसार,जन्म १८ मे १६८२ मृत्यू १५ डिसेंम्बर १७४९) हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू,आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र
छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे घोडे नर्मदेच्या पार पोहोचले होते. माळवा,गुजरात,कर्नाटक, अगदी दिल्ली पर्यंतचे मुलुख घोड्यांच्या टापाखाली आले होते..! पण शिवरायांची राजधानी आणि मराठ्यांच तख्त असलेला #रायगड' आणि #जिजाऊ राहत होत्या ते पाचाड १६८९ पासून ४४ वर्षे पारतंत्र्यात होते,हि सल शाहूंच्या मनात होती आणि मोठ्या मोहिमेचे नियोजन करून रायगड स्वराज्यात आणण्याचे मनसुबे होते. रायगड त्यावेळी जंजिऱ्याच्या इस्लामी सुलतान सिद्दीच्या ताब्यात होता. रायगड जिंकणे हा शाहू छत्रपतींनी प्रतिष्ठतेचा मुद्दा केला होता. १७३३ साली मोहिमेला सुरुवात झाली, या मोहिमेची आखणी त्यांनी स्वतः केली. मराठेशाहीची संपूर्ण ताकद त्यांनी रायगड जिंकण्यासाठी लावली, रायगड मोहिमेव्यतिरिक्त फक्त पानिपतातच एवढे सरदार मोहिमेत उतरले असावेत...!
राजपुत्र फत्तेसिंह भोसले,पेशवे बाजीराव,छत्रपतींची हुजुरातीची फौज,पिलाजी जाधवराव,सरखेल सेखोजी आंग्रे,सरलष्कर दावलजी सोमवंशी,सेनापती दाभाडे,येसाजी गायकवाड,हिम्मतबहादूर उदाजी चव्हाण,श्रीपतराव पंतप्रतिनिधी, चिमाजी अप्पा, भुइंजकर जाधवराव,कृष्णाजी खटावकर,उदाजी पवार,महाडिक,घोरपडे असे दिग्गज सेनानी कोकणात उतरल्याने रायगड परिसराला रणांगणाचे स्वरूप प्राप्त झाले, १५-२० आघाड्यावर युद्ध सुरू झाले.
मे महिन्याच्या आतच मोठे यश मराठ्यांना प्राप्त झाले बिरवाडी,अवचितगड,घोसाळगड,सुरगड, मदनगड,मंडनगड,विजयगड,बाणकोट हे किल्ले ताब्यात आले. फत्तेसिंह भोसले आणि पंतप्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले,मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता,त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते. प्रयत्नास यश येऊन ६ जून १७३३ रोजी रायगड वर भगवा फडकला..! गड मराठ्यांनी जिंकल्याने सिद्दी चवताळला सिद्दी अंबर ने रायगड परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली, अनेक महिने चकमक्के चालली शेवटी १० जानेवारी ला निर्णायक युद्ध झाले आणि छत्री निजामपूर,पाचाड येथून रेटत मराठयांनी सिद्दीला रायगड जवळ आणले, गडावरून खाशा फौज आली आणि दोघांच्या मध्ये सापडून सिद्दी आणि त्याचे हजार भर सैनिक कापल्या गेले.!
शाहू छत्रपतींनी #सिद्दीचे_शीर साताऱ्याला मागवून घेतले! आणि दिसेल त्या सिद्दी सैनिकांचे मस्तक मारावे, रायगड पाचाड परिसरातील सिद्दीने बांधलेले वाडे तोफांनी उध्वस्त करावेत असे आदेश दिले! सरदार कृष्णाजी खटावकर, किल्लेदार जिवाजी लाड ह्यांच्या सह अनेक मावळ्यांनी रक्ताचा अभिषेक करून रायगड पुन्हा स्वतंत्र केला.
शाहू महाराजांनी फत्तेसिंह,बाजीराव,आणि प्रतिनिधी ह्यांना मानाची वस्त्रे,बक्षिसे देऊन मोठा सन्मान केला. अनेक सरदार पहिल्यांदाच एकत्र मोहीम करत होते,त्यामुळे चुरस निर्माण झाली, आणि प्रत्येकाने पराक्रमाची शर्थ केली..! सिद्दीने अनेक जाचक कर प्रजेवर लावले होते,तिथल्या #हिंदूंची_मंदिरे तोडून टाकली होती, हिंदू स्त्रिया गुलामाच्या बाजारात विकण्यात येत होत्या, या छळातून प्रजेची मुक्तता झाली,श्री रायगडचे हिंदवी तख्त पुन्हा ताब्यात आले होते, जिजाऊ माँसाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पाचाडची माती, भूलोकीचे श्री शिव शंकर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हिंदवी स्वराज्यात आल्याचे अतीव समाधान त्यांचे नातू शाहू महाराजांना झाला,आणि रायगडाचा सुवर्णकाळ पुन्हा सुरु झाला होता..!
थोरले शाहू महाराजांना स्मृतिदिननिमित्त विनम्र अभिवादन! पराक्रमाच्या अखंड परंपरेला त्रिवार मानाचा मुजरा...!
चित्र :- १) थोरले शाहू महाराज
२) शाहू छत्रपती-बाजीराव पेशवे-पंतप्रतिनिधी
(बाजीराव मस्तानी चित्रपट)
३) दुर्गराज श्रीमान रायगड
No comments:
Post a Comment