बरीच वर्षे या वाड्यात नानांचे दप्तर व सरकारी दप्तर होते. इ.स. १८८५ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हा वाडा शाळेसाठी मागितला. इ.स. १८९० मध्ये तो त्यांना मिळाला, दर्शनी भाग तसाच ठेऊन आतील वाडा पाडून शाळेची इमारत बांधली गेली. त्यानंतर इ.स. १९५३ मध्ये सोसायटीने ती जागा महापालिकेला विकली. नाना फडणिसांच्या वाड्याशेजारी अंताजी माणकेश्वरांचा वाडा होता. इ. स. १९०८ मध्ये हा वाडा विकत घेऊन तेथे किर्लोस्कर थिएटर केल्याचा उल्लेख आठळतो. परंतु दोन्ही वाडे इतके लागून असतील, असे वाटत नाही. कारण आजचे वसंत चित्रपटगृह (पूर्वीचे किर्लोस्कर थिएटर) व नानावाड्याची भिंत यातील खांब व सलगता पाहता तोही या वाड्याचाच भाग असावा. नानांनी या वाड्यातच अखेरचा श्वास घेतला.
देवस्थान व पुष्पवाटिका तयार करण्यासाठी त्या वेळची बुधवारातील मानाजीबाईंची जागा नानांनी बाईंच्या संमतीने मिळविली. हे समजताच श्रीमंत माधवराव म्हणाले, "त्याजागी पागा करण्याचा आमचा विचार होता, पण तुम्ही देऊळ य पुष्पवाटिका करता हे उत्तम." देवळाचे काम इ.स. १७६९ मध पूर्ण झाले. हीच ती बेलबाग, या देवस्थानच्या खर्चासाठी दोन-तीन गावे इनाम मिळाली होती. पण शेवटच्या बाजीरावाने तीही जप्त केली. बेलबागेचा दिंडीदरवाजा भव्य असून, पूर्वाभिमुख आहे. तो शिवाजी रस्त्याच्या बाजूने आहे. या दरवाजातून पालखी थेट आत येई. येथे नानांची गुप्त खलबते चालत, आजच्या लक्ष्मीरस्त्याने बेलबागेसमोर नगर वाचन मंदिराची नवीन इमारत दिसते. या इमारतीमागे बोळ असून, तेथे बखळ होती. बेलबागेची जागा तेथपर्यंत होती. तेथे सातखणी दोन मजले होते. पुढे बखळ होती. तेथे नोकर-चाकर, पहारेकरी, बेलबागेचे कारभारी, पुजारी यांची राहण्याची जागा होती. आता लक्ष्मीरस्त्यावर (नगर वाचन मंदिरासमोर) जी इमारत बांधली आहे तेथे काही खोल्या बांधलेल्या होत्या. ही जागा इ.स. १९२० मध्ये ब्रिटीश सरकारने ताब्यात घेऊन ग्रंथालयाला दिली. याआधी ते बुधवारवाडयात होते. पुढे चौक होता व बाग होती, तेथे मध्यावर विष्णूचे देऊळ आहे. नाना शंकराचे व विष्णूचे भक्त, बेलबागेतील गणपती व विष्णू या दोन मूर्तीबद्दल सेनापती हरिपंत फड़के नाना फडणविसाना लिहितात, "बैरागी हिंदुस्थानातून विष्णू य गणपतीची मूर्ती घेऊन आले. मूर्ती फार चांगल्या याजकरता घेतल्या. गणपतीस तुमच्या नावची अक्षत लावली, विष्णुमूर्ती फार चांगली. त्यास लहानसे देऊळ बांधून पुष्पवाटिका करावी असे मानस. " याप्रमाणे नानांनी देऊ बांधून पुष्पवाटिका केली. त्यात मोर ठेवले. त्या वेळेपासून येथे मोर आहेत. त्यावेळी ते बागेत सुटे असत. आता त्यांच्यासाठी पिंजरा केला आहे. सारसबाग झाली त्या वेळी प्रथम येथूनच या मोरांमधील मोर तेथे नेला. (वैभव पेशवेकालीन वाड्यांचे - डाॕ. मंदा खांडगे १९९२ )
#फोटो -नाना वाडा
-विकास चौधरी
No comments:
Post a Comment