'नागपूरकर भोसले'
भाग २
जॉर्ज
फॉस्टर या इंग्रज वकिलाने भोसल्यांच्या राज्याचे सविस्तर वर्णन केले आहे.
दुर्दैवाने मराठ्यांनी अशी माहिती कुठे लिहून ठेवल्याचे दिसत नाही. फॉस्टर
म्हणतो-
"भोसल्यांचे मुलुखाची उत्तरेकडील सरहद लखनादौनच्या उत्तरेस चार कोसांवर शेरनदी ही आहे. पलिकडेस काल्पीचे बाळाजीचा म्हणजे गोविंदपंत बुंदेल्याचा मुलगा बाबाजी गोविंद खेर याचा मुलूख आहे. पूर्वेस रतनपूरच्या प्रदेशापर्यंत तसेच संबलपूर व इतर संस्थाने धरून कटकपर्यंत त्यांचा अंमल आहे. दक्षिणेस गोदावरीच्या उत्तरेस दहा कोसापर्यंत भोसल्यांचा अंमल चालतो. पश्चिमेस सर्व वऱ्हाड प्रांत भोसल्यांच्या अंमलाखाली आहे. एकंदरीत दक्षिणेस गोदावरीपासून उत्तरेस नर्मदेपर्यंत त्यांचा अंमल आहे."
इ.स. १८०० हा नागपूरकर भोसल्यांच्या वैभवाचा अत्युच्च काळ समजला जातो. याकाळात
नागपूरच्या भोसल्यांची सत्ता उत्तरेस नर्मदेपासून ते दक्षिणेस गोदावरी
पर्यंत आणि पश्चिमेस वऱ्हाडपासून ते पूर्व दिशेला पूर्व समुद्र
किनाऱ्यापर्यंत कायम झाली.
भोसल्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्र इ.स.१८००
दुसऱ्या
रघुजीच्या काळात झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात भोसल्यांनी १७ डिसेंबर
१८०३ चा 'देवगावचा तह' स्वीकारला. या तहानंतर मात्र कंपनीने भोसल्यांच्या
मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळवले होते. यात नर्मदेच्या उत्तरेकडील जबलपूर,
धामोनी दक्षिणेकडील मंडला, शिवनी, होशंगाबाद, बैतुल, मूलताई तसेच
विदर्भातील गाविलगड, नरनाळा तर पूर्वेस संबळपूर, सिरगुजा या भागांचा समावेश
होता. भोसल्यांच्या अखत्यारीत फक्त नागपूर, चंद्रपूर, छत्तीसगड व
वैनगंगेचा प्रदेश हा भूभाग राहिला.
त्याकाळातील रघुजी भोसल्यांचे राज्य आणि उत्पन्न असे होते.
१. देवगड प्रांत (नागपूरसह) - ३० लक्ष
२. गढा मंडला - १४ लक्ष
३. होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड - ७ लक्ष
४. मुलताई - २ लक्ष
५. वऱ्हाडचे निम्मे उत्पन्न, गाविलगड, नरनाळा - ३० लक्ष
६. ओरिसा व मांडलिक संस्थाने - १७ लक्ष
७. चंद्रपूर - ५ लक्ष
८. छत्तीसगड व मांडलिक संस्थाने - ६ लक्ष
◆ देवगड-
यामध्ये छिंदवाडा, बालाघाट हे घाटावरील मुलुख तसेच नागपूर, भंडारा वगैरे
घाटाखालचा मुलुख यांचा समावेश होता. हा सर्व प्रदेश देवगडच्या 'बख्तबुलंद'
या गोंड राजाचा होता. तो पहिल्या रघुजीने मिळवला होता. या सुभ्यात
शिवनीचा पठाण जहागीरदार व खैरागड, राजनांदगाव, छुईखदान वगैरे मांडलिक येत
होते.
◆ गढा मंडला-
हे गोंडांचे सर्वात जुने असलेले राज्य तेव्हा सागरच्या मराठ्यांच्या
ताब्यात होते. या मुलुखाकरिता भोसल्यांचा आणि पेशव्यांचा अनेक दिवस झगडा
सुरू होता. परंतु खर्ड्याच्या लढाईनंतर हा मुलूख भोसल्यांच्या ताब्यात आला.
◆ होशंगाबाद, शिवनी, माळवा, चौरागड-
होशंगाबाद हे नर्मदेच्या उतारास असलेले मोक्याचे ठाणे होते. ते भोपाळच्या
नबाबाच्या मूळ पुरुषाने देवगडच्या राजापासून लष्करी मदत देण्याचे कबूल
करून मिळवले होते. १७९६ मध्ये दुसरा रघुजी भोसले याने तेथील किल्ला लढून
मिळवला होता. १७९९ मध्ये नर्मदा ही भोसल्यांची सरहद्द ठरली. इंग्रजांकडे
आल्यानंतर मात्र तेथे लष्कराची छावणी कायमचीच झाली.
◆ मुलताई, बैतुल, बदनूर -
हा भाग मूळ 'देवगड' राजाचा भाग होता. मुलताई येथे भोसल्यांनी एक सुभेदार
नेमला होता. या भागांत सावळीगड, भवरगड, खेरडा इत्यादी डोंगरी किल्ल्यांचा
समावेश होता.
◆ गाविलगड व नरनाळा-
हे दोन्ही किल्ले पहिल्या रघुजीने १७५१ मध्ये जिंकून घेतले होते. याचे
सर्व उत्पन्न भोसल्यांना मिळत असे. त्यावेळी साठ-चाळीस असा उत्पन्नाचा
प्रकार नव्हता. नरनाळ्याचा किल्लेदार अकोट येथे राहत होता. १७७५ मध्ये
निजामाने हे किल्ले मुधोजीकडून घेतले होते. पण मुधोजी एलिचपूरला गेल्यावर
त्याने ते किल्ले परत मिळवले. गाविलगड येथे अडचणीच्या वेळी भोसले आपला
खजिना ठेवत असत. १८०३ च्या तहाने बाकीचा वऱ्हाड निजामाच्या ताब्यात आला, पण
गाविलगड भोसल्यांकडेच होता. पुढे १८१८ मध्ये झालेल्या तहानुसार तो
आप्पासाहेबांकडून इंग्रजांकडे आला.
No comments:
Post a Comment