विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 29 May 2023

'फडणवीस’ आडनावाचा इतिहास

 


'फडणवीस’
आडनावाचा इतिहास
लेखन :सतीश राजगुरे
'फडणवीस’ हे मुळात आडनाव नाही. मूळचा फारसी भाषेतील शब्द ‘फर्द-नवीस’ असा आहे. ‘फर्द’ म्हणजे कागद आणि ‘नवीस’ म्हणजे लिहिणारा. पुढे ‘फर्द' पासून 'फड' शब्द तयार झाला आणि 'नवीस' प्रत्ययाचे 'नीस' झाले.
मुघल राजवटीत राज्यव्यवहार बाबींशी निगडित जे काही शब्द मराठीत आलेत त्यापैकी 'फड' हा एक शब्द आहे. 'फड' म्हणजे फडणीवीसाकडील कारकुनी खाते किंवा कचेरी. त्यात शेकडो कारकून/दिवाणजी/हिशेब लिहिणारे असत. एकप्रकारे ते त्या काळचे सचिवालयच होते.
फडणवीस (फड + नवीस)= फडाचे किंवा फडावरील लिहिणे करणारा. विशेषतः राज्यातील महसुलाचे जमाखर्च आणि हिशेब यांची नोंद करणारा कारकून. अशा सर्व कारकूनांवरील अधिकारी या अर्थाने हे पद पूर्वी अस्तित्वात होते.
पेशव्यांच्या दरबारी असणारे प्रसिद्ध नाना फडणवीस यांचे आडनाव 'भानू' (बाळाजी जनार्दन भानू) होते. नाना सुरुवातीला कारकुनाचे काम करीत. म्हणून ते 'फडणवीस'/'फडणीस' या नावानेच ओळखले जात. 'फडणवीस'चे अपभ्रंशित रूप म्हणजे 'फडणीस' होय.
माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळामध्ये नाना फडणवीसांकडे 'फडणीशी' बरोबरच अनेक जबाबदाऱ्याही आल्या होत्या, असं 'नाना फडणवीस अँड द एक्स्टर्नल अफेअर्स ऑफ द मराठा एंपायर' या पुस्तकाचे लेखक वाय. एन. देवधर यांनी लिहून ठेवलं आहे. 'फडणीशी' म्हणजे बजेटची आखणी करणे, राज्याचे हिशेब-लेखे ठेवणे आणि पेशव्यांच्या राजधानीची जबाबदारी पाहाणे, हे काम नानांकडे आलं. त्याचप्रमाणे मोहिमांच्या वेळेचीही व्यवस्था त्यांच्याकडे आली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...