बडोदा संस्थानचे सेनापती भाऊ शिंदे यांचा मुळगाव देवरगांव ता. चांदवड येथील जहागिरदार वाडा
नाशिक जिल्ह्यातील राजधानी असलेले होळकरांचे चांदवड एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर.... चांदवड हे नाशिक धुळे महामार्गावरील नाशिक पासून ६० कि.मी. अंतरावर आहे व चांदवड पासून देवरगांव साधारणपणे १४ कि.मी. असेल... या गावाला अध्यात्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड सरकार यांचे दरबारी भाऊ शिंदे मोठे लष्करी अधिकारी होते. एके दिवशी सकाळी सकाळी ते आपल्या वाड्यातनं लगबगीने दरबारी निघालेच होते तो दारावर एक साधू भिक्षा मागण्यासाठी आले. भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना भिक्षा देत दरबारी आले. आज दरबारात महत्त्वाचा निर्णय होणार होता. सरसेनापतींची नियुक्ती होणार होती. महाराजांच्या खास व्यक्ती म्हणून भाऊ शिंदे यांना पदोन्नती थेट सरसेनापती पदी झाली. सकाळी आलेल्या संताच्या आशीर्वादामुळेच आपणांस पदोन्नती मिळाल्याची भावना त्यांच्या मनात प्रकटताच भाऊंनी त्या साधूचा शोध घेतला त्यांना आपले गुरू केले. त्यांचे नाव विंचू बाबा...
चांदवड तालुक्याच्या देवरगाव ची शिंदेंना जहागिरी मिळाली त्यामुळे या त्यांच्या मुळगावी शिंदेंनी भव्य जहागिरदार वाडा बांधला. या वाड्यात विंचूबाबांचे वास्तव्य काही दिवस होते... हा परिसर सोडून जाते वेळी त्यांनी आपले शिष्य हरेकृष्ण बाबा यांना कराड तालुक्याच्या म्हसूर गावाहून बोलावून घेतले.... व याच वाड्यात त्यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. ते सद्गुरू साई बाबांचे समकालीन संत होते. त्यांनी देवरगावातच संजीवन समाधी घेतली.
हा जहागिरदार वाडा साधारणतः २०० वर्ष जुना वाडा आहे. आज वाड्यात त्यांची चौथी पिढी वास्तव्याला आहे. केशव ऊर्फ भाऊसाहेब शिंदे ( पप्पा ) यांना दत्तक घेतले असल्याने त्यांची ही चौथी पिढी आहे. काही वर्षापूर्वी बडोद्याचे सत्यजीत राजे गायकवाड यांनीही या भव्य वाड्याला भेट दिली आहे.
जाहगिरदार वाडा भव्य आहे संपूर्ण बांधकाम दगडी घडीव चिरे व सागवानी लाकडांचा वापर करून बांधले आहे. वाड्यातील दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अरूंद दगडी जीना आहे. वरच्या दलनात सुंदर भित्तीचित्रे रेखाटली आहे. सद्गुरू हरेकृष्ण बाबा यांची ध्यानाला बसण्याची खोली आहे. एव्हढा भव्य वाडा जिर्ण होतोय त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हा आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे सोपविलेला दिव्य वारसा जोपासने व जतन करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. वाड्यातील अनेक खोल्या बंद स्वरूपात आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सेनापतींच्या या वाड्याला एकवेळ अवश्य भेट द्या...
लेखन ::संजय पाडवी , चांदवड
No comments:
Post a Comment