डेक्कन कॉलेजकडून होळकर पुलाकडे जाताना पूल सुरु व्हायच्या आधी बॉम्बे सॅपर्सच्या भिंतीशेजारून डाव्या हाताला एक छोटा रस्ता जातो. त्या रस्त्यावर समोरच देवी अहिल्याबाई होळकर ट्रस्टची पाटी दिसते. त्या जागेत #होळकर_छत्री आहे. हि जागा खाजगी मालमत्ता असल्यामुळे इथे मुक्त प्रवेश नाही. माळव्यातील रूढीनुसार समाधीस छत्री म्हणण्याचा प्रघात आहे.
इ.स. १७९५ मध्ये तुकोजीराव होळकरांचा मृत्यू झाला. तुकोजीरावांना मल्हारराव, विठोजी व यशवंतराव हे पुत्र होते. होळकरांची दौलत हडपण्याच्या उद्देशाने दुसऱ्या बाजीरावाने तुकोजीराव होळकरांचा मनोरुग्ण मुलगा काशिराव यास सरदारकी दिली. इ.स. १७९४ मध्ये महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर शिंदेशाहीची वस्त्रे दौलतराव शिंदे यास मिळाली. शिंदे-होळकर यांच्या वैमनस्यामुळे काशिरावाला सरदारकी मिळाल्यानंतर दौलतराव शिंद्यांनी होळकरांचा मुलूख ताब्यात घेण्यास सुरुवात केली. दौलतरावाच्या या कृत्यामुळे चिडून मल्हारराव होळकर फौज जमवून शिंदे व पेशव्यांच्या प्रदेशावर हल्ले करू लागला. १४ सप्टेंबर १७९७ मध्ये होळकरांच्या फौजेचा तळ पुण्यात भांबुर्ड्यात म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर परिसरात पडला होता. दौलतराव शिंद्यांनी या तळावर हल्ला करून मल्हारराव होळकरास ठार मारले. या हल्ल्याच्या प्रसंगी विठोजी व यशवंतराव होळकर निसटून पळून गेले. दुसऱ्या बाजीरावाने मल्हाररावाची पत्नी जईबाई व अल्पवयीन मुलगा खंडेराव यांना कैदेत टाकले. विठोजी होळकराने पेशव्यांचे बंधू अमृतराव यांच्यासमवेत बंडाचे निशाण उभारले व तो पेशव्यांच्या मुलखात छापे घालून लूटमार करू लागला. पेशव्यांनी विठोजीला पकडून अत्यंत निर्घृणपणे शनिवारवाड्यासमोरील पटांगणात हत्तीच्या पायी दिले. होळकरांनी मल्हाररावाची समाधी होळकर पुलाच्या पलीकडे बांधून तेथे एक शिवमंदिरही उभारले. या समाधीचे बांधकाम कधी झाले या संदर्भात ऐतिहासिक साधनांमध्ये उल्लेख आढळत नाही. इम्पिरियल गॅझेटियर व गायकवाडकृत पुणे वर्णनात ही छत्री विठोजी होळकर व त्यांच्या पत्नीची असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. परंतु दुसऱ्या पंतप्रधान शकावलीत या समाधीबाबत पुढील टिपण आढळते भाद्रपद वद्य ८, दौलतरावाकडील मुझफरखान याने तुकोजीचा पुत्र मल्हारराव यास मारले. त्याची छत्री खडकी पुलाजवळ आहे. पेशवाईची अखेर या ग्रंथावरून व होळकरांच्या ऐतिहासिक साधनांवरून ही छत्री मल्हाररावाची असल्याची पुष्टी मिळते.
पूर्वी या छत्रीभोवती नऊ फूट उंचीची तटबंदी होती, कालौघात बऱ्याच तटबंदीची पडझड झालेली आहे.तटबंदीच्या आत चिरेबंदी दगडाचे शिवमंदिर आहे. मंदिरात मागच्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाजातून आत जावे लागते. मंदिराच्या समोर लाकडी खांबांवर उभा केलेला सभामंडप आहे. सभामंडपात काचेची हंड्या झुंबरे टांगलेली आहेत. सभामंडपात नंदी असून त्यापुढे भांबुर्ड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला, मल्हारराव होळकरांचा अंगरक्षक लाख्या बारगिर (लाख रुपये पगारदार) याची पादुकासदृशः समाधी आहे. सभामंडपाच्या उजव्या बाजूस तुळशीवृंदावन असून त्या वृंदावनाच्या कोनाड्यात हनुमानाची दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या बाहेरीच्या बाजूस दगडी महिरप असून दोन्ही बाजूस कोनाडे आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग असून त्यावर एक स्फटिकाचा आणि एक दगडाचा बाण आहे. हे शिवलिंग आयताकृती काळ्या दगडाचे असून या शिवलिंगाचा आकार उजव्या बाजूस त्रिकोणाकृती निमुळता आहे. शिवलिंगाच्या मागच्या बाजूस मोठा कोनाडा असून तेथे पूर्वी होळकरांच्या तख्ताची जागा होती. त्यात अलीकडील काळातील साधाराण तीन फूट उंचीची रेखीव शिवमूर्ती आहे.
येथील शिवमंदिराचे शिखर तत्कालीन मराठा शैलीतील असून त्यावर नक्षीकाम केलेले आहे. या समाधीच्या परिसरात कालांतराने गोसावी लोकांनी वस्ती केली होती. या समाधीच्या वास्तूची वरीच पडझड झाली, तसेच येथे झाडे-झुडपे, गवत वाढले होते. इ.स. १९९५ मध्ये हा परिसर ग्वाल्हेरच्या भोसले कुटुंबियांनी भाड्याने घेतला. इ.स. १९९८ मध्ये या कुटुंबियांनी शिवमंदिराचा जीर्णोद्धार केला. मूळ ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता अत्यंत काळजीपूर्वक शिवमंदिराची रंगरंगोटी व डागडुजी करण्यात आलेली आहे.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
तुम्हाला आमचा हा #आठवणी_इतिहासाच्या प्रकल्प कसा वाटत आहे हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल माहिती असेल ज्या भूतकाळात गेल्या आहेत, तर आम्हाला तिथे भेट द्यायला आणि त्याची माहिती गोळा करून तुमच्यासमोर आणायला नक्कीच आवडेल.
like करा, share करा आणि follow करा.
No comments:
Post a Comment