विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 2 August 2023

#बारा_मोटेची_विहीर

 










#बारा_मोटेची_विहीर
पुणे सातारा महामार्गावर सातारा शहराच्या अंदाजे १४/१५ कि.मी अलीकडे लिंब गावाचा फाटा आहे. तो ओलांडून थोड पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक रस्ता लागतो. तिथून आत गेल्यावर गावात शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही #बारा_मोटेची_विहीर आहे. खर तर या विहिरीवर १५ मोटांच्या जागा आहेत, पण १२ मोटाच प्रत्यक्षात सुरू होत्या. यावरून या विहिरीला #बारा_मोटेची_विहीर हे नाव पडले असावे.
औरंगजेबाच्या कैदेत असताना औरंगजेबाने इ.स. १७०३ मध्ये शाहूराजांची दोन लग्ने रुस्तुमराव जाधवांचा नातू मानसिंग याची मुलगी राजसबाई व कण्हेरखेड शिंदे यांची मुलगी अंबिकाबाई या दोघींशी मोठ्या थाटामाटात लावून दिली. घरात लग्न होऊन आलेल्या नव्या नवरीला मांडीवर घेऊन खुद्द बादशहाच्या तोंडातील विड्याचा काही भाग बादशहाने नव्या नवरीच्या मुखात द्यायचा, हा रिवाज होता. शाहूराजे बंदिवासात असले, तरी ते छत्रपतीपदाचे मानकरी होते. त्यांच्या पत्नीने परमर्धीय बादशहाचा उष्टा विडा कसा खायचा, या प्रश्नावर येसूबाईंनी एक तोडगा काढला. आयत्यावेळी नववधूच्याच वयाची, अंगचणीची एक दुसरीच वीरुबाई नावाची मुलगी आणली. बादशहाने वीरूबाई आणि शाहूं राजांना आशीर्वाद दिला. यानंतर वीरूबाईस मोठ्या इतमामाने आपल्याजवळ ठेवले. मोगलांच्या कैदेतून सुटका होऊन महाराष्ट्रात परत आल्यावर बाळाजी विश्वनाथ भटांच्या मदतीने शाहूराजांना छत्रपतीपद मिळवणे ते सांभाळणे व जनमानसात स्थान मिळवणे सोपे गेले. शाहूराजांचा मानलेला मुलगा फत्तेसिंग भोसले यांचाही वीरूबाईने उत्तम प्रतिपाळ केला. दि. २४ डिसेंबर १७४० रोजी साताऱ्यात वीरूबाईंचे देहावसान झाले. पत्नीचा अधिकृत दर्जा नसला तरी शाहूराजांच्या कौटुंबिक जीवनात वीरूबाईंना महत्त्वाचे स्थान होते.
या विहिरीचे बांधकाम इ.स. १७१९ ते १७२४ च्या दरम्यान शाहू राजे यांच्या पत्नी वीरुबाई यांच्या देखरेखीखाली झाले. या विहिरीवरील शिलालेखात, श्रीमंत सौभाग्यवती वीरूबाईसाहेब व श्रीभवानीशंकर प्रसन्न असे कोरलेले आहे. विहीर अंदाजे ११० फूट खोल आणि ५० फूट रुंद असून शिवपिंडीच्या आकाराची असून अष्टकोनी आहे. विहिरीकडे उतरणाऱ्या पायऱ्यांवरील दारावर गणपती कोरलेला आहे. मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे एक भला मोठा आणि देखणा महाल आहे. या विहिरीत उतरताना आकर्षक पण भक्कम कमान दिसते. विहिरीत उतरायला दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरच कमानदार पूल आहे. कमानीतून उतरल्यानंतर आपण छोट्या विहिरीत जातो. छोट्याशाच असणाऱ्या या एका विहिरीला तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या असून, नितळ पाण्यात त्या आजही दिसतात. त्यानंतर पुढे मुख्य विहीर आहे. या विहिरीच्या वर राजमहाल बांधलेला आहे. या विहिरीतूनच चोरवाटेने या महालाकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या आहेत. या छोटेखानी राजमहालाला मध्यभागी चार खांब आहेत. त्यातील खांबांवर मोर, फुले, गणपती, घोडेस्वार, कुस्ती करणारे पैलवान, चक्रे अशा गोष्टी कोरलेल्या आहेत. विहिरीच्या वरील भागात व्याल शिल्प कोरलेली आहेत. विहिरीत आंघोळ केल्यावर कपडे बदलायला एक स्वतंत्र खोलीही बांधलेली आहे. या राजमहालाच्या पायऱ्या चढून आल्यास महालावर राज सिंहासन दिसते.
संदर्भ:
सहली एक दिवसाच्या,परिसरात पुण्याच्या...... - प्र. के. घाणेकर
तुम्हाला आमचा हा #आठवणी_इतिहासाच्या प्रकल्प कसा वाटत आहे हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल माहिती असेल ज्या भूतकाळात गेल्या आहेत, तर आम्हाला तिथे भेट द्यायला आणि त्याची माहिती गोळा करून तुमच्यासमोर आणायला नक्कीच आवडेल.
like करा, share करा आणि follow करा.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...