विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 August 2023

मुलुखावेगळा राजा

 


मुलुखावेगळा राजा
छत्रपती शाहू महाराजांना थाटामाटात राहणे आवडायचे नाही. दरबारी कामकाज अथवा शाही समारंभ वगळता महाराज नेहमी साध्या पेहरावातच असायचे , तशीच महाराजांची जेवणाची पद्धतही अगदी साधीच होती. नवीन अथवा जुन्या राजवाड्यात जेवणाची पंगत असायची. प्रत्येक वेळी महाराजांबरोबर पन्नास ते शंभर लोक पंगतीमध्ये असायचे. पंगतीमध्ये सर्व लोक मांडी घालून बसायचे मात्र महाराजांना मांडी घालून बसता येत नसल्याने महाराजांसाठी लाकडी टेबल खुर्चीची सोय असायची. आठवड्यातील बहुतांश दिवस मांसाहारी जेवण असायचे मात्र ते सुद्धा मसाले न वापरता अत्यंत साध्या पद्धतीने केलेले असायचे. याबरोबर चार ते पाच भाकऱ्या असायच्या. जे जेवण महाराजांना तेच पंगतीमधील इतरांनाही असायचे. पंगतीमध्ये जेवण वाढण्यासाठी सोन्याची ट्रेन, चांदीची भांडी ताटाखाली मखमली कापड असा इतर राजांसारखा भपकेबाजपणा महाराजांना आवडायचा नाही.
हैद्राबादच्या निझामाने महाराजांना भेट म्हणून त्याचा शाही आचारी पाठवून दिला होता. महाराजांनी त्याला पदरी ठेवून घेतले मात्र हा आचारी निझामाच्या दरबारात असल्यासारखे जेवणामध्ये भरपूर प्रकारचे मसाले, काजू बदाम असा वेगवेगळ्या प्रकारचा मेवा घालून जेवण बनवू लागला. काही दिवसांनी महाराजांनी त्याला बोलावून घेतले व म्हणाले, " तु जेवण अत्यंत स्वादीष्ठ बनवतोस यात काही वाद नाही. पण मला इतक्या महागड्या जेवणाची सवय नाही शिवाय माझ्या रयतेचा पैसा मी माझ्या चैनीसाठी खर्च करावा हे छत्रपती म्हणून मला शोभणारेही नाही त्यामुळे तु तुझ्या धन्याकडे परत गेलेले बरे ! " निझामाचा शाही आचारी निझामाकडे परत गेला व पुन्हा एकदा राजाधिराज छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये कोल्हापुरी जेवणाचा तडका सुरु झाला....
महाराजांना तो आचारी ठेवणे व दररोज चमचमीत भोजनाचा आस्वाद घेणे परवडणार नव्हते अशातला काही भाग नव्हता मात्र रयतेचा पैसा स्वतःसाठी वापरण्याची महाराजांची मानसिकता नव्हती. इतर राजा महाराजांच्या राजवाड्यात त्याकाळी व आजही शाही मेजवान्या असतात ज्याला Banquet म्हटले जाते. या मेजवान्यांसाठी खास भली मोठी दालने असायची. आजही आहेत! महागडे अन्नपदार्थ तर असायचेच मात्र जेवण वाढण्यासाठी सोन्या चांदीची भांडी वापरली जायची. अशा भपकेबाज थाटामाटाला महाराजांनी कधी थारा दिला नाही. आजपर्यंत छत्रपतींच्या दोन्ही राजवाड्यांमध्ये अशाप्रकारच्या खर्चिक शाही मेजवान्या झाल्या नाहीत. आजही छत्रपतींकडे कुणी खास पाहुणा आला तरी त्याच्यासाठीही अत्यंत साधे अस्सल कोल्हापूरी जेवणच बनविले जाते. स्वतःचे पुरेसे उत्पन्न असूनही जनतेच्या पैशांवर मिजास मारणाऱ्या आजच्या राज्यकर्त्यांनी महाराजांचा हा धडा गिरवणे खरंच खूप गरजेचे आहे.
Publish by -Kolhapur State

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...