अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
या प्रदेशाचे वर्णन करताना शेजवलकर काहीसे भावुक झाले ः ""सिंधू नदी या भागात अटकेपासून दक्षिणेकडे व नैऋत्येकडे शुद्ध खडकातून बहू युगांच्या वाहण्याने मार्ग खोदून एकाकी काळाबादपर्यंत बिनवाळवंटी पाणातून शंभर मैल वाहत जाते. अटकेच्या दक्षिणेकडील हा भाग नदी ओलांडण्यास अत्यंत दुष्कर असा आहे. पश्चिम बाजूस उंच डोंगरांच्या ओळी असून अटकेहून पलीकडे पाहिले, म्हणजे त्यांच्या दूरवर काळ्याकभिन्न दिसणाऱ्या रांगा मनात भय उत्पन्न करतात. मी गेलो त्या दिवशी आकाश बहुतेक ढगांनी व्याप्त होते. वर विचित्र आकाराचे दाट ढग, पलीकडे राक्षसाकृती डोंगर, नदीकाठचा काळा खडक, किल्ल्याच्या तशाच भिंती, मागेही तसाच डोंगर, असे हे एकंदर दृश्य मन चरकेल असेच होते; पण याच वाटेने प्राचीन काळापासून अनेक जेते भारतवर्षात आले होते. त्यांना भय वाटलेले दिसत नाही किंवा खोल खळखळाटी नदीच्या प्रवासाने अटकही झाली नाही आणि याच दुर्लघ्य मार्गाने काही धाडसी मराठे-आपले ऐतिहासिक पूर्वज, दोनशे वर्षांपूर्वी दक्षिणेतून पंधराशे मैल घोडदौड करून, न भीता, पलीकडे वाघाच्या गुहेत त्याच्या मिशा उपटण्यास व दात मोजण्यास शिरले होते. अशी गोष्ट त्यापूर्वी अनेक शतके कोणी स्वतंत्र हिंदू जमातीने करून दाखविली नव्हती. त्यांच्या घोड्यांनी तुडविलेल्या नदीच्या खडकावर मी त्याचे चित्र आठवीत आता उभा होतो.''
अटकेपार झेंडे लावणे, ही मराठ्यांच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. मराठ्यांच्या पराक्रमावर व कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या या घटनेला दुसऱ्याही एका दृष्टीने महत्त्व आहे. धर्मशास्त्राने निर्बंध घालून निर्माण केलेल्या काही चमत्कारिक रूढींपैकी "अटक' ओलांडायची नाही, ही एक होती. मराठ्यांनी अधिकृतपणे ती झुगारून लावली. विशेष म्हणजे मराठ्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा नावाचा ब्राह्मण सेनानी करीत होता. हिंदूंमध्ये ब्राह्मण जात ही अधिक रूढीप्रिय असल्याचा समजही या कृतीमुळे मोडीत निघाला. मराठ्यांची घोडी यावेळी केवळ गंगेतच नाही, तर सिंधूत न्हाऊन निघाली.
No comments:
Post a Comment