भाग १२
उन्हाळाही वाढू लागला होता. यमुनेचे पाणी आटू लागले होते. जेवढे पाणी शिल्लक होते ते कत्तली आणि रोगराई मुळे दुषित झाले. अब्दालीच्या सैन्यात महामारी पसरू लागली. दिवसेंदिवस गोसाव्यांचा जोर वाढत होता, मराठे एकेक नदी ओलांडत आता उत्तरेकडे ससैन्य सरकत होते. तेव्हा त्याने आता काढता पाय घेतला. आतापावेतो त्याने १२ करोडची लूट केली होती. तो झपाट्याने दिल्लीकडे निघाला. १ एप्रिल रोजी त्याने दिल्लीतूनही स्वारी माघार फिरवली. दिल्ली सोडताना त्याने माजी वजीर इंतीजाम-उद-दौला याकडून ४ करोड, गाजीउद्दिन वाजीराकडून १ करोड व इतर सावकारांकडून ७ करोड असे एकूण १२ करोड आणखी जमविले. २४ करोडची संपत्ती घेवून अब्दाली त्वरेने निघाला. बादशाही जनान्यातील स्त्रियांचीही त्याने विल्हेवाट लावली. माजी बादशाह महम्मदशाहच्या मुलीशी त्याने स्वतः निकाह केला.
इतर १६ राजघराण्यातील बायका व ४०० मोलकरणी त्याने आपल्या सोबत घेतल्या व विद्युतवेगाने काबुलास निघाला. जाताना परतीच्या वाटेवर त्याने अमृतसरचे पवित्र मंदिर फोडले. त्यापाठोपाठ त्याचा पुत्र तैमुरशाह व जहानखान हे ही निघाले. सद्य बादशाह आलमगीर यास पुन्हा बादशाही देवून त्याची मुलगी मुहम्मदी बेगम हीचा निकाह तैमुरशाहशी करवला. तैमुरला लाहोरचा बंदोबस्त करण्याकरिता त्याने ठेवले आणि इथे घोटाळा झाला. लाहोर मुलुख मन्नूचा आणि तो मिळावा म्हणून मुघलांनी बेगमेने अब्दालीला पाचारण केले होते. तो गेल्यावर जम्मू व जालंधर चे लोक तिला थोडेच राज्य करू देणार होते. तिला लाहोर पुन्हा हवे होते. परंतु पुन्हा भारतात शिरण्याकरिता त्याला लाहोरचा मुलुख दरवाजा म्हणून हवा होता आणि म्हणून त्याने मुघलानी बेग्मेचा तिरस्कार करून तिला उडवून लावले. तिने लाहोर मिळावे यासाठी याचना करीत चिनाबपर्यंत अब्दालीच्या सैन्याचा पाठपुरावा केला. तिचे लटांबर अधिकच मागे येवू लागले तेव्हातर शाहवलीखानाने काठीने झोडपून तिला सैन्यातून हाकलून लावले. ज्या लाहोरात तिने एकतंत्री राज्य केले होते तिथेच तिजवर भिक्षा मागून खाण्याची पाळी आली. तिचे चरित्र पुढे तिच्या व मन्नुच्या पदरी असणारया त्यांच्या एका सेवकाने लिहून ठेवलेले आहे. ते वाचण्याजोगे आहे. त्याचे नाव आहे तहमासखान उर्फ मिस्कीन.
No comments:
Post a Comment