विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 3 September 2023

शाहूनिष्ठ नागपूरकर भोसले घराणे


 शाहूनिष्ठ नागपूरकर भोसले घराणे

राज्याचा अधिपती जितका धैर्यवान आणि मुत्सद्दी तितकेचं त्याचे राज्यांग विस्तारलेले., मध्ययुगीन इतिहासातल्या राजे राजवाड्यांचे, विविध शाह्यांना एकाच फुटपट्टीत तोलता येण्याजोगे सूत्र म्हणता येईल., कारभारात जितकी डोकी अफाट चालली तितक्याच वेगाने त्या-त्या राज्याचा विस्तार देखील झाला असे म्हणावे लागेल. छत्रपतींवर निष्ठा असणाऱ्या घराण्यांची कमी तेव्हा हि नव्हती आणि आत्ता देखील नाहीच., छत्रपतींच्या स्मरणाचे आमच्या बापजाद्यांचे गुण आमच्यात अवतरले तसेच., छत्रपती घराण्याची मनोभावे सेवा करण्याची अनुवंशिकता सगळ्यांमध्ये रुजली.....! शिवछत्रपतींप्रमाणेचं त्यांच्या पुढल्या पिढ्यांवर इमान बहाल करणाऱ्या मंडळीमध्ये एक अग्रगण्य नाव म्हणजे नागपूरकर भोसले घराणे......!

मराठा राजघराण्यात यशस्वीते बाबतीत सर्वात उजवे ठरलेल्या शाहूंच्या कार्कीर्दीची सुरवात झाली., तीच मुळात नागपूरकर भोसले यांच्या पाठींब्यावर.
स्वामी परमुलखातून आले आणि त्यांचे काही दिवस वास्तव्य लांबकानी येथे झाले, यावेळी शाहूंच्या दिमतीस पहिले हुजूरदाखल झाले ते परसोजी भोसले., साधारण महिनाभर शाहू राजांचा मुक्काम इथेचं होता. यादरम्यान त्यांचे बंधू साबाजी हे देखील आपल्या फौजेनिशी शाहूंना मिळाले. परसोजी यांनीचं शाहू हे राज्याचे खरे वारस अशी खातरजमा झाल्यावर हैबतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे, वगैरे बागलाणमध्ये ठाण मांडून असणारी मंडळी शाहूंना मिळाली. १२ जानेवारी १७०८ रोजी शाहू छत्रपती जाहले या समयी परसोजी भोसले यांना सेनासाहेब सुभा हे पद व वऱ्हाड गोंडवन प्रांताचा अंमल करून दिला., सनद प्राप्त झाल्यावर परसोजींनी वऱ्हाडमध्ये येऊन काही दिवस मुक्काम केला., त्यानंतर ते शाहू दर्शनास सातारला गेले., तिथून परतत असताना., कृष्णा-वेण्णा संगमावर त्यांचा मृत्यू झाला., या नद्यांच्या संगमावर खेड, माहुलीजवळ यांची समाधी देखील आहे.

परसोजी यांना असणारे दोन भाऊ म्हणजे साबाजी आणि बापुजी., हे परसोजी एवढे प्रसिद्धी पावले नाहीत. साबाजी, बापुजी दोहोंचा मृत्यू लगेचचं झाल्याने साबाजी, त्यांची बायको रामाऊ यांच्या नावे सनदा दिलेल्या आढळतात. साताऱ्यात रामाऊ यांच्या नावे एक गोट म्हणून पेठ वसलेली आहे.

यापुढे शाहू सेवेत नागपूरकरांच्या सेवेत रुजू झाले ते परसोजी यांचे पुतणे संताजी व राणोजी. परसोजीचा मुलगा कान्होजी हा जरा स्वतंत्र आणि वेगळ्या स्वभावाचा निघाला. सय्यद हुसेन यांच्यासोबत दिल्लीहून मराठ्यांना सनदा आणण्यासाठी गेलेल्या सेनापती दाभाडे, बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याबरोबर संताजी आणि राणोजी हे देखील गेले होते. याच मराठ्यांनी सय्यदबंधूंचा अंमल दिल्लीवर बसवून दिला. दिल्लीच्या या स्वारीतून परतात असताना संताजींचा मृत्यू ओढवला., तर दक्षिणेत आल्यावर राणोजी यांनी मराठा स्वराज्यापायी खरी तलवार गाजविली., चिमाजी अप्पा ज्या वसई मोहिमेने आज सर्वश्रुत आहेत त्या मोहिमेत राणोजी देखील सहभागी होते. उमरावतीकर भोसल्यांचे राणोजी हे मूळ पुरुष.

याच चुलत्याच्या तालमीत अजून एक वीर छत्रपती घराण्याची निष्ठेने सेवा करण्यासाठी घडत होता तो म्हणजे पहिला रघुजी. जन्मानंतर आईवडील अल्पावधीतच कालवश झाल्याने रघुजी आपल्या चुलत भावकीतच वाढले, त्यांच्या लहानपणा विषयी किंवा वडिल बिम्बाजी यांविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. रघुजी मोठे झाल्यावर त्यांनी आपला चुलता राणोजी यांच्या हाताखाली लष्करात राहिले. आपला दुसरा चुलता कान्होजी (स्वतंत्र स्वभावाचा), देवगडचा चांदसुलतान, एलीचपूरचा इस्माईलखान नबाब असा प्रवास करत रघुजी सातारा दरबारी आली आणि त्यांना येथेचं स्थैर्य प्राप्त जाहले. आणि राघुजींना शाहुंकरवी बंगाल, छत्तीसगड, मक्सुदाबाद, पाटणा भागापर्यंत मराठ्यांच्या चौथाईचे प्रदेश वाढविण्याचे फर्मान मिळाले.

आणि यानंतर रघुजींनी मागे वळून बघितलेचं नाही. रघुजी औरंगाबादेत उतरले आणि त्यांनी खंडण्या घेण्यास सुरवात केली. अकोल्यात त्यावेळी एलीचपूरच्या नवाबाच्या वतीने सुजायतखां नावाचा पठाण होता. राघुजींनी त्याचा मोड करून पुढे उमरावतीकडे प्रयाण केले., माळव्याच्या राजकारणात पेशवे आणि बरेच मराठा सरदार असल्याने रघुजींनी पुन्हा आपला पाय तिथे ठेवलाच नाही., पुढे ते देवगडास गेले. चांदसुलतान याच्या घराण्यातील मध्यस्थीसाठी (सेटलमेंट, मांडवली)साठी राघुजींना बोलवले., या संधीचे रघुजींनी सोनेचं केले. पुढे राघुजींनी भंडारा गाजविला., सोनिबरडी, रामटेक, देवगड सारं सारं धुवून काढले., याचं दरम्यान तिसरे सेनासाहेब सुभा हे पद देखील राघुजींना मिळाले. १९३८ साली शाहुंकरवी नव्या सनदा आल्या आणि नवीन प्रदेशावर मराठ्यांचा अंमल चालविण्याचे त्यांना अधिकार प्राप्त झाले. त्यात 1 लखनौ, मकसूदाबाद, बेदर, बितीया, बुंदेलखंड, इलाहबाद, हाजीपुर पाटणा, गढा, भवरगढ या प्रांताची चौथाई व मोकासा हे हक्क वसूल करण्याचा अधिकार दिला गेला.
छत्रपतींची त्यांवर विशेष मर्जी संपादित झाली होती., पण राज्याचे पेशवे आणि भोसले यांचे सुत कधीच जुळले नाही. रघुजी – पहिल्या बाजीरावांपासून सुरु झालेला हा तिढा त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालला., भोपाळजवळील वेढ्यात बाजीरावांना मदत हवी असताना रघुजी अलाहाबादेत मुलूखगिरी करत होते., हे त्यामागचे कारण. दुसरे कारण म्हणजे बाजीराव आणि प्रतिनिधी यांचे वाकडे होते तर रघुजी आणि प्रतिनिधी यांचे सख्य होते., आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मराठेशाहीत रुजू असले तरी रघुजी हा स्वतंत्र झेंड्याचा माणूस होता.

मराठे उत्तरेत तलवार गाजवत होते तेव्हा दक्षिणेत अर्काटचा नवाब दोस्तअली त्याचा जावाई चंदासाहेब व फ्रेंच गव्हर्नर ड्युमास यांनी मानावर केल्या होत्या आणि त्याचं मुंड्या पिरगाळून टाकण्यासाठी फत्तेसिंगास कर्नाटक मोहीम बजाविलली यात देखील रघुजी आपल्या विशेष कर्तुत्वाने चमकलेचं चमकले. तेथील यश संपादन करून झाल्यावर राघुजीनी पुन्हा आपले लक्ष बंगाल प्रांताकडे वळविले. कर्तुत्वाच्या जोरावर, शाहू छत्रपतींच्या आशीर्वादात मराठे असे काही चमकले कि छत्तीसगड, ओरिसा प्रांतातील घनदाट जंगलं, वर्षभर टवटवीत असणाऱ्या दलदली यांची हि तमा बाळगली नाही.

बंगालमध्ये जर मूल रडायला लागले तर रडणाऱ्या मुलाला आजही त्याची आई म्हणते चुप हो जा नहीं तो "भास्कर पंडित" आ जायेगा......!

हे भास्कर पंडित म्हणजे नागपुरकर भोसल्यांचे दीवाण भास्करराम कोल्हटकर ज्यांनी 1742-44 या दरम्यान कलकत्ता ओरिसा, बिहार या ठिकाणी चार छापे मारून आपला वचक बसवला, त्यांच्या नावाचा वापार अगदी कालपरवा पर्यंत सुद्धा एक दहशत निर्माण व्हावी म्हणूनच होतो. बंगाली इतिहासकार मराठी स्वाऱ्यांचे वास्तविक रहस्य न ओळखता, या बारगी लोकांनी आपल्या वंगभूमीत अनर्थ घडविला, अशी हाकोटी उठविताना दिसतात. बंगाली इतिहासकारांनी असे कितीही केलेतरी त्यांनी हे विसरू नये की, जो बंगाल रघुजी भोसल्यांच्या, भास्कर राम कोल्ह्टकरांच्या ताब्यात होता. बारगीर शिलेदारांनी जो लुटला, तेवढाच आज स्वतंत्र भारतात सामील झाला आहे.! याची जाणीव ज्ञानलवदुर्वीदग्ध लेखकांना नसला तरी पूर्व बंगालमधून पळून आलेल्या (बांगलादेश) त्यांच्या दुर्दैवी बांधवांना आज तीव्रतेने भासते...........!.

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...