कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी राजे यांच्या कारकिर्दीत ज्या वीर पुरुषांनी महत्वाची कामगिरी बजावली आणि कोल्हापूरचे राज्य सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले त्यात प्रामुख्याने प्रीतीराव चव्हाण व उदाजीराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल.छत्रपती शिवाजीराजे यांच्या कारकिर्दीची शेवटची पंचवीस-तीस वर्ष याच दोघांच्या कर्तबगारीने आणि पराक्रमाने गाजली. त्यांची राजनिष्ठा कधीही विचलीत झाली नाही. त्या काळात मोठ्या सरदारांनी अनेकदा आपल्या निष्ठा बदलल्या .कोल्हापूर पेशवे ,निजाम , इंग्रज यांच्याकडे आळीपाळीने सेवाचाकरी करून आपले पराक्रमी आयुष्य घालविणारे काही सरदार मंडळी ही त्याकाळी अस्तित्वात होती.
परंतु उदाजीराव चव्हाण ,प्रीतीराव चव्हाण ,रत्नाकर राजाज्ञा यांनी असा प्रसंग आपल्यावर कधीही ओढवून घेतला नाही .आणि शेवटपर्यंत कोल्हापूरच्या राज्याशी एकनिष्ठ राहिले .याच सरदारांचा ओढा प्रामुख्याने कोल्हापूरच्या छत्रपतींकडे होता.
उदाजीराव चव्हाण यांचा मृत्यू १७६२ चा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झाला. उदाजीरावांना विठोजीराव आणि प्रीतीराव असे दोन पुत्र होते .उदाजीराव व प्रितीराव यांनी आपली कर्तबगारी आणि नावलौकिक टिकवून ठेवला.
हे सर्व कुटुंब नळदुर्गच्या किल्ल्यावर राहत होते. उदाजीराव निजामाच्या बाजूने असल्यामुळे त्यांचे मुख्य ठाणे नळदुर्ग किल्ल्यावर होते. याच सुमारास अक्कलकोट आणि हिंमतबहाद्दर चव्हाण यांच्या सरंजामाची सरहद्द भिडलेली होती. या हद्दीतील एका गावावरून वाद वाढत गेला आणि त्याचे रुपांतर लढाईत झाले.निजामाने हिम्मतबहाद्दराचा मुलुख जप्त करण्यासाठी फौजा रवाना केल्या .त्यात चव्हाण बंधूचा पराभव झाला. निजामाने विठोजी चव्हाणांना भेटीस बोलावले असता ते गेले नाहीत. त्यामुळे निजाम खूप क्रोधित झाला. पण शेवटी मध्यस्थीने त्यांची समजूत काढली म्हणून निजामाने काठी व मारडी असे दोन परगणे चव्हाण बंधुंकडे ठेवले.
प्रीतीराव चव्हाण नळदुर्गास होते तेव्हा पन्हाळ्याहून जिजाबाई आणि छत्रपतीं संभाजीराजे यांनी चव्हाण बंधूंना पन्हाळ्यास येण्यास अज्ञान पत्राने कळवले. त्यावरून ते दोघे डिग्रज येथे येऊन राहिले.
आपल्या अलौकिक पराक्रमाने साऱ्या मराठमंडळाचे डोळे दिपवणारा पराक्रम करून छत्रपती राजाराम महाराजांकडून ' हिम्मत बहाद्दर ' हा किताब विठोजी चव्हाण या वीर आणि पराक्रमी पुरुषाने सन १६८९ साली मिळवला. यानंतर पुढील जवळपास दीडशे वर्ष मराठ्यांच्या इतिहासात हिम्मत बहाद्दर चव्हाण घराणे आपल्या पराक्रमाची तलवार गाजवीतच राहिले.
हिंमत बहादुर चव्हाण घराणे सोलापूर जिल्ह्यातील तोंडले-बोंडले गावचे होय. या हिम्मत बहाद्दर चव्हाण घराण्याकडे सोहनी प्रांत सातारा या गावच्या पाटीलकेचे वतन होते .महाराष्ट्रातील अत्यंत जुन्या आणि प्रतापशाली घराण्यापैकी चव्हाणांचे हे घराणे आहे. सम्राट पृथ्वीराज चव्हाणांचा महंमद
घोरीकडून पराभव झाल्यानंतर काही घराणी दक्षिणेत आली त्यातील हे हिम्मत बहाद्दरांचे घराणे होय.या चव्हाण घराण्याचे सर्व पुरुष मोठे कर्तबगार आणि दीर्घायुष्यी निपजले.शहाजी राजांच्या कारकिर्दीतपासून करवीरचे शिवाजीराजे (दुसरे ) यांच्या कारकीर्दीपर्यंत म्हणजे सुमारे दीडशे वर्षाच्या प्रदीर्घ काळात चव्हाण घराण्यातील राणोजी, विठोजी, उदाजी आणि प्रीतीराव या चार पुरुषांनी मराठ्यांचा राज्यासाठी फार मोठे पराक्रम करून योगदान दिले. ज्यांच्या त्यांच्या काळातील परिस्थितीप्रमाणे कर्तबगारीला कमी-अधिक प्रमाणात वाव मिळाला असला तरी या घराण्याचे एक वैशिष्ट्य असे आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासूनच मराठ्यांचा राज्य उदयास साठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न चालले होते त्यात भाग घेतला होता. त्यानंतर खुद्द शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी मर्दुमकी गाजविली.छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात विठोजी चव्हाणांनी संताजी घोरपडे यांच्या बरोबर दोन पिढ्या म्हणजे उदाजीराव आणि प्रीतीराव यांनी यासाठी परिश्रम केले.
या घराण्यातील वरील चार पुरुषांपैकी पहिले तिघेजण राणोजी, विठुजी ,उदाजी प्रत्यक्ष लढाईत ठार झाले. सतत चार पिढ्या पराक्रमाची परंपरा चालू राहिलेली जी काही घराणी थोडीफार होती त्यात चव्हाण घराण्याचा उल्लेख करावा लागेल.
बेंगलोरहून शहाजीराजांनी पाठविलेल्या राणोजीराव चव्हाण यांना शिवरायांनी प्रथम पायदळाची सरदारकी दिली. सन १६७४ पर्यंत राणोजी चव्हाण शिवरायांच्या बरोबरच मोहिमेत भाग घेत होते. १६७४ मध्ये सिद्दीच्या ताब्यात असलेल्या गोवळकोटावर छत्रपती शिवरायांच्या फौजेने हल्ला केला त्या हल्ल्यात मराठ्यांना यश मिळाले नाही, परंतु राणोजीराव चव्हाण या युद्धात मारले गेले.राणोजी रावांच्या दोन मुलांपैकी विठोजी लहान होते. संताजी घोरपडे यांचे वडील म्हाळोजी घोरपडे यांनी विनंती केल्यावरून विठोजी चव्हाण यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सेवेत रुजू करून घेतले. विठोजी चव्हाण वयाने लहान असले तरी ते म्हाळोजी घोरपडे यांच्या बरोबर काम करत होते. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर विठोजी चव्हाण यांच्या पथकाने छत्रपती संभाजी राजांच्या काळात अनेक मोहिमांत भाग घेऊन स्वराज्याचे सेवाचाकरी केली. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूपूर्वी छत्रपती संभाजी राजे पन्हाळगडावर नजरकैदेत होते, त्यावेळी छत्रपती शिवरायांनी विठोजी चव्हाण यांना त्यांच्या देखरेखीसाठी पन्हाळगडावर ठेवले होते. छत्रपती संभाजी राजांच्या क्रूर हत्तेमुळे सारा मराठी मुलुख दुःखी झाला होता. राजधानी रायगडावर छत्रपती राजाराम महाराज, राणी येसूबाई,बाल शिवाजी ,सकवारबाई राणीसाहेब अशी प्रमुख मंडळी होती. छत्रपती संभाजी राजांना पकडले गेले होते त्यावेळी,म्हाळोजी बाबा घोरपडे, संताजी घोरपडे ,विठोजी चव्हाण छत्रपतीे संभाजीराजे यांच्या बरोबर संगमेश्वर येथे होते. रायगड किल्ला मोगलांच्या हाती पडल्याने सर्वांना कैद व्हावे लागले होते. यावेळी छत्रपती राजाराम महाराजांना प्रतापगड, पन्हाळगड, विशाळगड अशा गडांचा आश्रय घेऊनही मोगलांनी पिच्छा पुरवल्याने दक्षिणेकडे जिंजीकडे जावे लागले होते .यावेळी छत्रपती् राजाराम महाराजांना सुखरूपपणे जिंजीकडे पोहोचवण्याची जबाबदारी विठोजी चव्हाण त्यांच्याकडेसुद्धा होती.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू ,राजघराण्यातील सर्व कुटुंबियांना कैद यामुळे सर्व मराठी मुलखाला मरगळ आली होती. ती मरगळ दूर करण्यासाठी या सर्वांनी एक डाव टाकला होता .औरंगजेबाच्या छावणीतले बादशाही तंबूचे कळस कापून आणले. तंबूला सोन्याचे कळस होते ,ते कापून आणण्याच्या मोहिमेमध्ये विठोजी चव्हाण सर्वात पुढे होते. या वेळी झालेला प्रतिकार थोड्या झटापटीनंतर मोडून काढून साऱ्यांनी सूर्योदयाबरोबर सिंहगड किल्ल्याचा पायथा गाठला. सिदोजी गुजर हे सिंहगड किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांनी या पथकाची दोन दिवस चांगली बडदास्त ठेवली. या ठिकाणाहून संताजी घोरपडे, मालोजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे विठोजी चव्हाण या साऱ्यांनी भोर मार्गे रायगडावर प्रवेश केला. बादशहाचा खान याने किल्ल्यास वेढा दिलेला होता .त्यावर या सर्वांनी छापा घातला. मोगली सैन्याचे पाच लढाऊ हत्ती ताब्यात घेऊन ही अनोखी भेट घेऊन पन्हाळा किल्ल्यावर असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांसमोर पेश केली.या अलौकिक विजयावर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे यांना ममलकतमदार,बहिर्जिस हिंदुराव, मालोजीस अमीर - उल - उमराव , विठोजी चव्हाण यांना 'हिम्मतबहाद्दर ' हा किताब बहाल केला.ही कामगिरी सुवर्णाक्षरांनी नोंद करावी अशी ऐतिहासिक कामगिरी होती. या धाडसी छाप्यात आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे छत्रपती संभाजी राजांच्या क्रूर हत्तेमुळे मराठी मनाला जे औदासीन्य, निराशा यांची छाया भेडसावत होती. तिचा पार नायनाट झाला. सर्व स्वराज्य प्रेमी उत्साहीत झाले.शिवरायांचे हे स्वराज्य प्राणाची बाजी लावून टिकवण्यासाठी मराठी मनाला ताजेपणा आला. नवीन नेटाने व नवीन जोमाने सर्वजण पुन्हा कामाला लागले. हे ऐतिहासिक कार्य या तिघांनी घडवून आणले . या पराक्रमाचा वाटा उचलून यश संपादन करण्यात विठोजी चव्हाणांचा मोलाचा वाटा होता.
खुद्द छत्रपती कडून एवढ्या लहान वयात त्यांना पराक्रमाबद्दल ' ' 'हिम्मतबहाद्दर ' किताब मिळाला यावरून त्यांचे पराक्रम आणि धाडस यांची ओळख पटते. तोंडले-बोंडले येथील चव्हाण घराण्यातील एका तेजस्वी तरुण विठोजी चव्हाण यांनी या पराक्रमासाठी आपला वाटा उचलला यश संपादन केले ही सर्वांना अभिमान वाटणारी गोष्ट आहे. बादशाही छावणीवर धाडसी छापा घालण्याची योजना यामध्ये विठोजी चव्हाण यांची प्रमुख भूमिका होती. संताजी घोरपडे यांनी अनेक नामांकित सरदार नामोहरण करून सर्वांची झोप उडवून दिली. या साऱ्या मोहिमेत विठोजी चव्हाण हिंम्मतबहाद्दर
यांनी त्यांचेबरोबर सैनिकी कारवाईत लढाया,मोहिमा, यात मोलाची साथ दिली.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यात अडकून पडले असता जुल्फिकारखान प्रचंड सैन्यानिशी वेढा घालून बसला होता.त्यावेळीही विठोजी चव्हाणांनी त्यांना मोलाची साथ दिली .जिंजीहून संताजी घोरपडे यांच्या बरोबर स्वराज्यात परत येत असता विठोजी चव्हाण बेंगलोर मुक्कामी मोगलांच्या बरोबर झालेल्या लढाईत २५ मे सन १६९६ रोजी विठोजी चव्हाण धारातीर्थी पडले. पस्तिशीच्या उंबरठ्याच्या मागे पुढे असलेला पराक्रमी पुरुष काळाच्या पडद्याआड गेला.
अशा या थोर ,पराक्रमी, शोर्यशाली हिंम्मतबहाद्दर सरदार विठोजी चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन .
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ
१ गोपाळराव देशमुख
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास
२ करवीर रियासत
स.मा.गर्गे
मराठी रियासत
गो.स.सरदेसाई
No comments:
Post a Comment