विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 23 September 2023

शिंदे घराण्याचे संस्थापक महान सेनांनी श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे

 

🚩








शिंदे घराण्याचे संस्थापक महान सेनांनी श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे 🚩
शिंदे घराणे : मराठेशाहीतील हे एक पराक्रमी घराणे .भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक असणारे हे राजघराणे .कण्हेरखेड (जि.सातारा) येथील पाटीलकी या घराण्याकडे होती. शिवाय शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने कैदेत असतानाच छत्रपती शाहूंशी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंद्यांची मुलगी मरण पावली.छत्रपती शाहू महाराजांचे सरदार म्हणून त्यांची कारकीर्द स.१७२० ते १७४५ मध्ये सुरू झाली.
राणोजी शिंद्यांनी १८ व्या शतकाच्या सुरुवातीस ग्वाल्हेरला शिंदेशाहीचे अधिष्ठान असणारे शिंद्यांचे संस्थान स्थापन केले. कण्हेरखेडच्या मराठी मातीतली रयतेवर प्रेम करणारी अन मुघली सत्तेविरुद्ध अहोरात्र लढण्यास सज्ज असलेली ही रणमर्द माणसे ! महापराक्रमी महादजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे सर्वात कनिष्ठ चिरंजीव होते. राणोजींनी उज्जैन हे आपले मुख्य ठाणे बनवले होते. तर आपले लष्कर ग्वाल्हेर इथे ठेवले होते. पश्चिम मध्य भारतातील विंध्याचलाच्या रांगेतला समृद्ध पठारी अन पर्वतीय प्रदेश असणारा माळवा राणोजींनी आधी कब्जा केला.
१७३७ ते १८८० मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते. त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती. महाराज राणोजी शिंदे यांनी महांकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार , निजामाविरुद्ध साखरखेडाची लढाई, वसईची मोहीम, कर्नाटकची मोहीम अशा असंख्य लढायांमध्ये पराक्रम गाजवला.त्यांनी उज्जैनपाशी आपली शिंदे घराण्याची सत्ता स्थापन केली आणि मराठा साम्राज्य विस्तारामध्ये आपले मोलाचे योगदान दिले.
मल्हाराव होळकर यांच्या साथीने मराठ्यांचे उत्तर हिंदुस्तानात वर्चस्व स्थापन करण्यामध्ये आणि ते अबाधित ठेवण्यामध्ये राणोजी यांचा सिंहाचा वाटा आहे. राणोजीपासूनच शिंदे घराणे पुढे आले. निजामाबरोबर झालेल्या साखरखेड येथील लढाईत राणोजीने भाग घेतला होता. ते १७२५ मध्ये शिलेदार झाले. कर्नाटकच्या मोहिमेतही ते सहभागी होते.मराठ्यांच्या ऊत्तरेतील मोहिमेच्या दरम्यान स. १७२८-२९ शिंदे, होळकर व पवार यांच्या मदतीने माळवा जिंकून या तीन सरदारांत त्याची वाटणी केली.
राणोजी शिंदे अत्यंत शूर व निष्ठावंत असल्यामुळे त्यांना दीड कोटी वसुलापैकी ६५·५ लाखांचा मुलूख वाटणीस आला. शिंद्यांनी माळव्यात आपला चांगलाच जम बसविला. राणोजीने निजामाविरुद्धच्या भोपाळ वेढयात तसेच वसईच्या प्रसिद्ध लढाईत भाग घेतला होता. १७३७ ते १८८० मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते .या काळात उज्जैनचा खूप विकास झाला. उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती.
सुभेदार राणोजी शिंदे यांनी ऊज्जैन येथील महांकालेश्वर मंदिराचा व कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिर अशा अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. त्याकाळी पाचशे वर्षांपासून बंद असलेला सिंहस्थ कुंभमेळा सुरू केला.शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांनी स.१७१० मध्ये शिंदे घराण्याची राजधानी ऊज्जैनमधे आणली. वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावण्याची बहादुरी त्यानी केली. राणोजी सुजालपूरजवळ १७४५ मध्ये निवर्तले.
त्यांना जयाप्पा, दत्ताजी व जोतिबा हे पहिल्या पत्नी पासूनचे तीन पुत्र व तुकोजी आणि महादजी हे दोन दुसर्या पत्नीचे पुत्र होते. त्यांपैकी तुकोजी हे राणोजीपूर्वी मरण पावले. आणि ओर्छाच्या राजाने जोतिबास दगा करून १७४३ मध्ये मारले. त्यामुळे राणोजीनंतर जयाप्पाकडे घराण्याची सूत्रे आली. पुढे शिंदे-होळकरांनी मिळून दिल्लीचा वजीर सफदरजंग याच्या मदतीसाठी गंगा-यमुना यांच्या दुआबात जाऊन रोहिल्यांची खोड मोडली. तेव्हा सफदरजंगच्या सल्ल्यावरून बादशहाने मोगल सत्तेचे रक्षण करण्याचे काम मराठ्यांवर सोपविले आणि त्या बदल्यात काही प्रदेश व काही प्रदेशांचे वसुली अधिकार मराठ्यांना बहाल केले. याच कामगिरीवर राजस्थानात असताना, जयाप्पा शिंदे राजपुतांविरुद्ध नागोर येथे लढत असताना विश्वासघाताने त्याची हत्त्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ दत्ताजी व मुलगा जनकोजी हे शिंदे घराण्याचा कारभार पाहू लागले.
दत्ताजी हे अतिशय शूर होते.अब्दालीने दिल्ली लुटल्यानंतर उत्तर हिंदुस्थानचा कारभार करण्याचा आदेश मिळाला. त्यांच्यावर नजीबखानाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांपैकी नजीबखानास त्यांनी कैद केले. दत्ताजी शिंदे यांनी नंतर लाहोरचा बंदोबस्त केला .पुढे दत्ताजी नजीबखान रोहिल्याच्या कचाट्यात सापडले. त्यातून ते सुटले पण १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीजवळ बुराडीच्या घाटात अब्दालीशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना अपत्य नव्हते. जयाप्पाचा मुलगा जनकोजी हे पानिपतच्या लढाईत मरण पावले. (१७६१). यावेळी त्यांची पत्नी काशीबाई पानिपतच्या स्वारीत हजर होत्या.राणोजींचे वंशज जयाप्पा,दत्ताजी, जनकोजी यांनी उत्तरेत मर्दुमकी गाजवली.तसेच महादजी यांनी १७२७ ते १७९४ मधे शौर्य आणि पराक्रमाने शिंदे घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले.
१० जुलै १७४५ मधे सुजालपुर येथे मृत्यू झाला.
(श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे बहादूर यांची मध्यप्रदेशमधे सुजालपुर येथे छत्री आहे.)
🙏 शिंदे घराण्याचे संस्थापक सुभेदार, पराक्रमी सेनांनी राणोजी शिंदे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...