विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 18 September 2023

गुत्तीच्या लढ्याचा पराक्रमी सेनापती -मुरारराव घोरपडे


 गुत्तीच्या लढ्याचा पराक्रमी सेनापती -मुरारराव घोरपडे
मित्र आणि शत्रू अशा दोघांनाही आदर वाटावा, असे व्यक्तिमत्त्व मुरारीराव घोरपडे यांना लाभले होते. अठराव्या शतकात त्यांनी दक्षिणेकडील गुत्ती येथे राज्य केले. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा "एक झुंज शर्थीची' या पुस्तकातून वाचायला मिळते. त्यांचे चरित्र सांगणाराच हा ग्रंथ आहे. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशावर, तसेच रायलसीमा जिल्ह्यावर मुरारीरावांची घट्ट पकड होती.

त्यांचा चरित्रपट या ग्रंथात वाचायला मिळतो. सैन्याची गुणवत्ता आणि आत्मविश्वास ही त्यांची बलस्थाने होती. मुरारीराव यांचे वंशज मुरारराव यशवंत घोरपडे यांनी हे मूळ पुस्तक लिहिले आहे. लेखक स्वतः खासदार होते. ते कर्नाटकचे मंत्रीही होते. करुणा गोखले यांनी त्यांच्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद केला आहे. त्यात घोरपडे घराण्याचा संक्षिप्त इतिहास जसा कळतो; तसेच तत्कालीन मोगल साम्राज्याची पडझड कशी झाली? याचेही संदर्भ मिळत जातात. दर्जेदार असे तब्बल 52 पूर्ण आकाराचे फोटो या पुस्तकात छापले आहेत. नकाशे आणि या छायाचित्रांमुळे गुत्तीचा हा समृद्ध इतिहास नजरेसमोरून तरळत जातो. कोप्पलचा किल्ला, गजेंद्रगड, गुत्तीचा किल्ला, शनिवारवाडा अशा अनेक रंगीत छायाचित्रामुळे घोरपडे यांच्या शर्थीचा इतिहास स्पष्टपणे उलगडत जातो. एकूण दहा प्रकरणात मुरारीरावांच्या पराक्रमाची कथा या पुस्तकात वाचायला मिळते. भोसले आणि घोरपडे, संताजी घोरपडे, रायगड ते जिंजी, गुत्तीचे राज्यकर्ते, तीरुचिरापाल्लीचे राज्यपाल, अर्कोटचा वेढा, हैदरअलीचा उदय, माधवराव पेशवा, अखेरची मोहीम आणि एक झुंज शर्थीची अशा दहा टप्यांत मुरारीराव यांचा कालखंड लेखकाने मांडला आहे. तेच या पुस्तकाचे नायक आहेत. त्याकाळी फ्रेंच आणि ब्रिटिशांनी दक्षिण भारतातील राजकारणात सहभाग वाढविला होता. अनेक ठिकाणी स्थानिक सत्ताकेंद्रे तयार होत होती. अशा अस्थिर कालखंडात मुरारीराव यांनी स्वतःची सत्ता अबाधित ठेवली. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात गुत्तीचा अभेद्य किल्ला पाहायला मिळतो. तिथे आजही मुरारीराव यांचे पोवाडे गायले जातात. त्यांचा तिथे फार मोठा दबदबा होता. जनतेला ते अतिशय प्रिय होते. लेखकाने त्यांच्या बद्दलचे सर्व ऐतिहासिक दस्तऐवज जमा केले व त्याचे विश्लेषण करून हा चरित्रग्रंथ सज्ज केला आहे. मुरारीराव आणि त्यांचे पूर्वज, त्यांनी केलेल्या लढाया असा तपशील जाणून घेऊन हा ग्रंथ लिहिल्याने या ग्रंथाचा नायक, त्याचे धाडस, शौर्य असा सगळा तपशील वाचकांना समजतो. रियासतकार सरदेसाई यांनी दिलेले संदर्भ, आनंद रंग पिल्ले यांच्या तत्कालीन वह्या, मुरारीरावांची पत्रे असे अनेक दस्तऐवज लेखकाने तपासले आहेत. मुरारीराव यांचे नाव ऐकले, तरी विरोधकांचा थरकाप होत असे. हैदर अलीचा ते तिरस्कार करीत व पेशव्यांशी लाडीगोडी करीत. त्यांच्या संघर्षाचा सगळा तपशील लेखकाने उदाहरणे देऊन सादर केला आहे. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मुरारीराव यांची वाट बिकट झाली. हैदर अलीने गुत्तीचा किल्ला सर केला. कब्बलदुर्गच्या किल्ल्यात त्यांना कैदेत राहावे लागले. हाल हाल करून त्यांना अतिशय क्रूरपणे ठार मारण्यात आले. मुरारीरावांची ही शौर्यगाथा वाचताना अंगावर काटे उभे राहतात. मराठ्यांच्या इतिहासातील अनेक घटनांची स्मृती जागी होते. वाचता वाचता काही वेळा सुमारे चार शतकाचा कालखंड लेखक उभा करतो, त्यामुळे चरित्र नायकाची जडण घडण कशी झाली? याचा सहजपणे उलगडा होत जातो. अनेक घटना उभ्या करताना लेखकाने प्रसंगनाट्य सहजपणे ओघवत्या शैलीत मांडले आहे. त्यात सूत्रबद्धता आहे. त्यामुळे हा ग्रंथ सुरवातीपासून अखेरपर्यंत वाचावासा वाटतो. लेखक घोरपडे त्यांचेच वंशज असून ते उच्चशिक्षित आहेत. कॉंग्रेस पक्षाचे काम करता करता त्यांनी कर्नाटकचे मंत्रिपदही सांभाळले आहे. त्यांचा हा अनुभव चरित्र लेखनास पोषक ठरला आहे. या सर्व घडामोडींचा चपखल अनुवाद करुणा गोखले यांनी केला आहे. सोपी आणि ओघवती भाषा यामुळे हे पुस्तक अनुवादित आहे, असे वाटत नाही. यातच अनुवादाचे यश लपले आहे. मूळ लेखकच जणू आपल्याशी बोलतो आहे, असे वाटते. गोखले यांचे अनुवादकौशल्य यातून जाणवते.

-विकास वाळूंजकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...