विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 27 September 2023

सरसेनापती_खंडेराव_दाभाडे

 

दाभाडे घराण्याचा मूळ पुरूष बजाजीराव दाभाडे. त्यांचा मुलगा हे येसाजीराव दाभाडे. येसाजीरावांचा थोरला मुलगा हे हिंदवी स्वराज्याचे “सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे”. येसाजीराव हे “श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज” यांचे विश्वासू अंगरक्षक होते. दाभाडे घराणे हे क्षत्रिय (सूर्यवंशी) असून, गोत्र : शौनल्य व देवक : सूर्यफूल आहे.
स. 1691 च्या अखेर छत्रपती राजाराम महाराज हे जिंजीस जाताना खंडेराव त्यांच्या बरोबर होते. यांनी महाराजांना खूप मदत केली. स.1696 च्या सुमारास राजाराम महाराज हे जिंजीस असताना खंडेराव याना तळेगांव दाभाडे जवळील ‘इंदुरी’ गांव इनाम मिळाले व पुढे स.1698 मध्ये जुन्नर प्रांताची सरपाटीलकी मिळाली.
जिंजीहून परत आल्यावर राजाराम महाराज यांनी खंडेरावांना “सेनाधुरंधर” हे पद देऊन गुजरात व बागलाणकडे मुलूखगिरीवर पाठविले आणि वस्त्रे व पोशाख देऊन निशाण आणि जरीपटका हवाली केला. शिवाय पुणे वगैरे प्रांताची तसेच अकोले व जावळे या महालांची सरपाटीलकी व काही प्रांताची सरदेशमुखी दिली.
थोरले शाहू छत्रपती महाराज सुटून आल्यावर खंडेराव हे छत्रपती महाराणी ताराराणी यांचा पक्ष सोडून शाहू महाराज यांच्या पक्षात मिळाले. मध्यंतरी चंद्रसेन जाधव यांनी खंडेराव यांना छत्रपती महाराणी ताराराणी यांचा पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.
शाहू महाराज यांनी खंडेराव यास 11 जानेवारी 1717 ला “सरसेनापती” पद दिले. ते पुढे खंडेरावांच्या घराण्यात कायम झाले. याच वेळी दिल्लीच्या बादशाहने दख्खनचा सुभेदार सय्यद बंधूंपैकी हुसेनअलीच्या विरुद्ध उठण्यास शाहू महाराज यास कळविले असता, शाहू महाराज यांनी ते काम खंडेरावांवर सोपविले. खंडेरावांनी खानदेश – गुजरातवर स्वार्या करून हुसेनचा रस्ता अडविला. तेव्हा हुसेनने फौज पाठविली, ती सुद्धा खंडेरावांनी अडचणीत गाठून कापून काढली.
पुढे हुसेनने परत मोठी फौज पाठविली म्हणून खंडेरावांनी, सुलतानजी निंबाळकर व दावलजी सोमवंशी यांच्या मदतीने मोगलांचा पुरता मोड केला (24 एप्रिल 1717). यानंतर शाहू महाराज यांनी गुजरात व काठेवाडकडे मराठ्यांचा अंमल बसवावा, असा हूकुम केला व अशा आशयाचे एक पत्र पाठिवले :
“दरमहा हुजूर खर्चास ऐवज देत जावा. थोरले महाराज धान्य व नक्त, श्रावणमासी धर्मदाय देत असत. तो सेनापती यांनी आपल्या तालुकापेकी, होन चार लाख रूपये खर्च करून, कोटी लिंगे ब्राह्मणांकडून करवीत जावी.”
बाळाजी विश्वनाथाने जी सरंजामी पध्दत निर्माण केली (स.1719) तीत खंडेरावास खानदेश देऊन गुजरात काबीज केल्यास तीही जहागिरी देऊन टाकू म्हणून आश्वासन दिले.
सय्यदांचा हस्तक अमलअली व निजाम यांच्यात स.1720 मध्ये बाळापूरची लढाई झाली तीत सैय्यदच्या विनंतीवरून खंडेरावास लढण्यासाठी म्हणून शाहू महाराज यांनी पाठिवले होते. त्यानंतर फत्तेसिंग भोसलेंच्या आधिपत्याखाली कर्नाटकात (स. 1725-26) झालेल्या स्वारीत खंडेराव हजर होते.
खंडेरावांनी वसई ते सूरतपर्यंतचे कोकण काबीज केले होते. तेव्हा शाहू महाराजांनी उद्गार काढले. “बडे सरदार मातबर, कामगिरी हुषार होते” असा उल्लेख आहे.
छत्रपती शाहू महाराज यांची मर्जी खंडेरावांवर खूप होती कारण एकदा खंडेराव पोटशूळाने आजारी असताना शाहू महाराजांनी खंडेरावांचा समाचार मुद्दाम घेतला. थोरल्या बाजीरावांच्या वेळेस खंडेराव वयोवृद्ध झाले होते. अखेर स. 27 सप्टेंबर 1729 ला मुतखड्याच्या विकाराने खंडेराव तळेगांव दाभाडे येथे मरण पावले. तळेगांव दाभाडे गावात खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे.
इतिहासप्रसिद्ध ‘सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे’ ह्या खंडेरावांच्या पत्नी होत. खंडेरावांना तीन पुत्र होते. (त्रिंबकराव, यशवंतराव व सवाई बाबूराव). त्रिंबकराव हे सुद्धा वडिलांसारखे शूर होते.
मराठाशाहीतील आपत् प्रसंगी जी नररत्ने महाराष्ट्रात चमकली त्यात खंडेराव दाभाडे यांची प्रामुख्याने गणना करण्यास हरकत नाही. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, परशराम त्र्यंबक यांच्यापेक्षा राजाराम महाराजांनी खंडेराव यांना जास्त उत्पन्न दिले. न जाणे खंडेरावांची कामगिरी सर्वांपेक्षा जास्त किमतीची असेल. तीनशे पंचाण्णव गावांची सरपाटीलकी म्हणजे जवळजवळ सातशे गावांची देशमुखी खंडेरावांस मिळाली असल्यामुळे खंडेराव हे सर्व वतनदारांचे मुकुटमणी ठरतात. भरीव कामगिरीवाचून असली भरीव देणगी मिळणे शक्य नाही.
– सरदार सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे
(राजेसाहेब – तळेगांव दाभाडे).

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...