अजातशत्रू शाहू
( भाग - १ )
लेखन ::संजय क्षीरसागर
मराठी
बखरकारांनी पुण्यश्लोक, अजातशत्रू या विशेषणांनी गौरवलेल्या शाहूची
भित्रा, दुबळा, अकर्तुत्ववान, नेभळट इ. गौरवपरपदांनी बऱ्याच मराठी
इतिहासकारांनी हेटाळणी देखील केली आहे. याच शाहुच्या पदरी उदयास आलेल्या
भट घराण्यातील पेशव्यांनी पुढे प्रत्यक्ष छत्रपतींना गुंडाळून ब्राम्हणी
पेशवाई उभारल्यामुळे कित्येक इतिहासकारांनी याबाबत शाहूस दोषी धरले आहे. (
प्रस्तुत लेखकाचे देखील असेच मत आहे. ) स्वराज्य संस्थापक शिवाजी
महाराजांचा हा नातू, संभाजीचा पुत्र नेमका होता तरी कसा याविषयी
सर्वसामान्य इतिहास वाचकांना फारशी माहिती नसल्याने इतिहासकारांनी शाहूस
दिलेली दुषणे खरी मानून ते देखील शाहूविषयी प्रतिकूल मत बाळगून आहेत.
प्रस्तुत लेखाद्वारे दुसरा शिवाजी उर्फ शाहू हा नेमका कसा होता हे जाणून
घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
ता.
१८ मे १६८२ रोजी शाहूचा जन्म रायगडजवळील गंगावली गावी झाला. आपल्या
पराक्रमी पित्याची आठवण म्हणून संभाजीने आपल्या मुलाचे नाव ' शिवाजी '
ठेवले. स. १६८२ मध्ये जन्मलेला दुसरा शिवाजी हा काहीसा दुर्दैवी निघाला.
स. १६८९ मध्ये त्यास पितृशोक तर अनुभवा लागलाच पण त्याच वर्षी नोव्हेंबर
महिन्यात त्यास मोगलांच्या नजरकैदेत जाण्याचा प्रसंग ओढवला. छ. संभाजीचे
मोगलांच्या कैदेत जाणे, राजारामाची नजरकैदेतून सुटका होऊन त्याने
मंचकारोहण करणे, संभाजीच्या सुटकेसाठी नव्या छत्रपतीकडून कसलाही खटाटोप न
होणे, मोगलांचा रायगडी वेढा पडताच येसूबाईच्या सल्ल्याने राजारामचे
जिंजीला निघून जाणे इ. लागोपाठ विद्युतवेगाने घडणाऱ्या घटनांनी काही काळ
का होईना पण मराठी सरदार पुरते भांबावले होते. संभाजीची पत्नी व ८ - ९
वर्षे महाराणीपद अनुभवलेली येसूबाई देखील या बनावाने बरीच चकित झाली
असावी. जरी तिने रायगडाहून राजारामास निघून जाण्याचा सल्ला दिला असला तरी
बाहेर राहून आपली सर्वोतपरी मदत करून व रायगड शत्रूहाती पडण्यापूर्वी
आपणांस पुत्रासह येथून बाहेर काढण्याचेही बजावले होते. परंतु, राजारामाने
येसूबाईचा अर्धाच सल्ला मान्य केला. स्वतः तो तर निसटला पण येसूबाई व
शाहूच्या सुटकेविषयी त्याने काहीशी अनास्थाच बाळगली. ७ वर्षांचा शाहू
घरातील व घराबाहेरील राजकारण समजण्याइतका सुज्ञ होता का ? हा प्रश्न एकवेळ
बाजूला ठेऊ पण वयाच्या ७ व्या वर्षी हे आघात भोगणाऱ्या शाहूच्या मनावर या
घटनांचे पडसाद कसे उमटले असतील याची वाचकांनीच आपल्या मनाशी कल्पना
करावी.
No comments:
Post a Comment