सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग ८
दिनांक
६ जून १६७४, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६, श्री शिवछत्रपतींचा
राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. दख्खनमध्ये एक नवीन
सत्तेचे प्रकटिकरण झाले. आजवरची शत्रूंनी बनवलेली बंडखोर, लुटारु अशी खोटी
ओळख धुडकावून एक सार्वभौम सिंहासन स्थापन झाले. या घटनेला फार मोठा अर्थ
होता. याचे फार दूरागामी परीणाम एकंदरच देशाच्या भविष्यावरती होणार होते व
ते झालेही. आता यापुढे एक अभिषिक्त राजा म्हणून महाराजांच्या प्रत्येक
कार्याकडे जग बघणार होते. संकटे व जबाबदार्या वाढल्या होत्या.
यानंतरची
एक घटना दक्षीणेतील राजकारणसाठी महत्वाची आहे ती अशी की राज्याभिषेकात
अडचण नको म्हणून १६७४ पासूनच महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याच्याशी
तहाची बोलणी लावली होती. अखेरीस मुघलांकडून जिंकलेले सतरा किल्ले व मुलुख
मी परत करतो त्या बदल्यात बहुदा साल्हेर - मुल्हेर (किंवा सातारा - मावळ
याबाबत जरा गोंधळ आहे.) महाराजांकडे रहावेत याबाबत करार हे बोलणे होते.
राज्याभिषेक यथासांग पार पाडल्यावरती इतर राजकारणांतून किंचित फुरसत
मिळताच, राज्याभिषेकानंतर जवळपास वर्षाने म्हणजे जून १६७५ मध्ये अखेर तो
करार झाला. संभाजीराजांचे मुघलांचे पंच हजारी सरदार असल्याचे कलम रद्द
करण्यात आले. यावरती महाराजांनी बहादूरखानाच्या सह्या घेतल्या. ह्याचे
वृत्त बहादूरखानाने औरंगजेबाला कळवले. खरेतर आधी महाराजांनी ह्या कराराला
नकार कळावला होता व पुरंदर वरतून बहादूरखानाच्या वकिलांना हाकलून दिले
होते. म्हणून बहादूरखानाने चिडून कल्याण नजिक जाळपोळ केली होती. यामुळेच
वर्षभराने करार मान्य झाल्यावरती औरंगजेबहि खूष झाला. वायव्य सीमेवरती तो
लढाईत गुंतला असतानाही त्याने बहदूरखानाला पंच हजारी सरदारावरुन सप्त हजारी
सरदार म्हणून बढती दिली. एक हत्ती पाठवला. हा बहादूरखान म्हणजे "बहादूरखान
कोकलताश" - हा औरंगजेबाचा दूधभाऊ होता व अतिशय विश्वासातला माणूस होता.
बहादूरखानाने बहादूरगडावरती मोठा आनंदोत्सव केला. मेजवानी दिली. ३० हत्ती -
५०० घोडे, २००० वस्त्रे, तलवारी असे सगळे वाटले. मात्र जुलैच्या पहिल्या
पंधरवड्यात जेव्हा हे गड त्याने मागितले महाराजांनी स्पष्टपणे त्याला कोलून
लावले. आदिलशाही मुलुखावरती शांतपणे स्वारी करता यावी व वेळ मिळावा म्हणून
महाराजांनी हे केले होते. अर्थात इतका जाहिर पाणउतारा झाल्याने
बहादूरखानचा तीळपापड झाला. औरंगजेबही चिडला. त्यांनी विजापूरकरांशी संधान
बांधले. महाराजांचा सूड घ्यायला बहादूरखान टपून बसला.
सांभार:सांभार : http://sahajsuchalamhanun.blogspot.in/2012/12/blog-post.html
No comments:
Post a Comment