सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १०
महाराजांनी
कृष्णा ओलांडून निवृत्तीसंगम आणि पुढे श्रीशैलम् याठिकाणी त्यांनी
तीर्थस्नान केले. या ठिकाणी स्नान करुन ते श्र्र्मल्लिकार्जुनाच्या
दर्शनाला गेले. तिथे त्यांछ्या अंगात देवीचा संचार झाला असे बखरकार
म्हणतात. आजूबाजूचे अध्यात्मिक वातावरण, जिजाऊसाहेब गेल्यावरती त्यांच्या
आयुष्यात तयार झालेली पोकळी, घरात सुरुवात झालेला सुप्त गृहकलह ह्या सगळ्या
पार्श्वभूमीवरती त्यांना विरक्तीचे विचार आले असावेत. इतका विरक्तपणा आला
की मल्लिकार्जुनाच्या पुजेत बिल्वदलांऐवजी स्वत:चे शीरकमल वहावे असं
त्यांना वाटून गेलं. त्याचे वेळी त्यांच्या अंगात भवानीची संचार झाला "तुज
ये गोष्टि मोक्ष नाही. हे कर्म करु नको, पुढे कर्तव्यही उदंड तुज हाते करणे
आहे." महाराजांनी स्वत:ला सावरले. कदाचित याच दरम्यान महाराजांनी काही
अध्यात्मिक पदेही रचली होती. त्यातले एक तंजावरच्या महालातील दफ्तरात
सापडले ते पुढीलप्रमाणे -
नासिवंत सुखासाटी। अंतरला जगजेठी॥
नाहि नाहि याते गोडी । लक्ष चौर्यौशीच्या जोडी॥
मणुष जन्म गेल्यावारे। काय करशिला बारे॥
शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना॥
महाराज साधारण ९ दिवस श्रीशैलम मुक्कामी होते. मल्लिकार्जुनाच्या उत्तरेला महाराजांनी जे गोपुर बांधून घेतले त्याला आज शिवाजीगोपुरम
असे ओळखले जाते. तिथेच महाराजांची शिल्पाकृती देखिल आहे. तिथुन महाराज ४
मे १६७७ रोजी तिरुपतीच्या दर्शनाला गेले. महाराजांनी प्रतिवर्षी ४२० होन
श्रींच्या अभिषेक, पुजा व नंदादिपासाथी देण्याचे थरविले व एका वर्षाचे
द्रव्य त्यांनी तत्काळ दिले सुद्धा. तिरुपतीहुन मद्रासजवळ पेड्डापोलम् इथे
महाराज पोहोचले. महाराजांनी महादोजी पंतलुंना इंग्रजांच्या भेटिवरती पाठवले
आणि काहि रत्ने व विषावरील उतारासाठी औषधे पाठवण्यास सांगितले.
इंग्रजांनीही या वस्तू तातडिने रवाना केल्या. वरुन या वस्तूंची किंमत न
आकारता त्यांनी त्या भेटिदाखल महाराजांना दिल्या. शिवाय ४ वार कापड व
चंदनाची ४ पात्रे देखिल भेट म्हणून पाठवली.
पेड्डापोलमच्या
मुक्कामातच बहुदा महाराजांनी जिंजी स्वारीचा बेत आखला असावा. पूर्वार्धात
सांगितल्याप्रमाणे पठाणी पक्षाच्या शेरखान लोदिचा प्रभाव वाढलेला बघून
खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मदने किल्ला पठाणांच्या ताब्यात जाण्यापेक्षा
आपणच तो कुत्बशहाला देऊया असा विचार केला व मादण्णांकडे दूत पाठवला. मात्र
विजापुरकरांचा किल्ला असा उघडपणे ताब्यात घेऊन मुघल - विजापूरकरांच्या
डोळ्यात येणे त्यावेळि मादण्णांना योग्य वाटले नाही. मात्र किल्लाही जाऊ
द्यायचा नव्हता म्हणून मग त्यांनी हुशारीने त्याच दूताला शिवाजी महाराजांची
भेट घ्यायला सांगितले. त्यानुसार तो दूत महाराजांना पेड्डापोलम् इथे येऊन
भेटला. महाराजांनी देखिल ५० हजार होन व १ लाखाच्या मुलुखाची लालुच नासीर
मुहम्मदाला दिली. आणि अपेक्षेप्रमाणे मासा गळाला लागला. थोडिशी लुटूपुटुची
लढाई करुन २० मे रोजी त्याने किल्ला महाराजांना दिला देखिल वरुन
ठरल्याप्रमाणे महाराजांनी देखिल आपला शब्द पाळला. ५० हजार होन व लाखाचा
मुलुख देऊन महाराजांनी दक्षिणेत एक बलाढ्य किल्ला आपलासा केला. ह्याच जिंजी
वरुन सुमारे नऊ वर्षे राजाराम महाराजांनी मुघलांना तोंड दिले हे लक्षात
घेतल्यावरती महाराजांची दूरदृष्टि लक्षात येते.
No comments:
Post a Comment