विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 17 October 2023

बाजी भिवराव रेठरेकर

 बाजी भिवराव रेठरेकर


बाजी भिवराव रेठरेकर म्हणजे बाजीरावांचे बालपणापासूनचे सवंगडी. भिवराव रेठरेकरांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं आपल्या मित्राच्या म्हणजेच बाळाजी विश्वनाथांच्या मुलांच्या नावाप्रमाणेच "बाजी" आणि "चिमणाजी" अशी ठेवली. पुढे हे दोघेही रेठरेकर बंधू बाजीरावांच्या फौजेत सरदारी करू लागले.
बाजी भिवरावांनी अनेक मोठ्या लढाया मारल्या होत्या. गमतीशीर गोष्ट म्हणजे महम्मदखान बंगशाला त्याच्या आयुष्यात दोन बाजींनी हरवलं. एक म्हणजे बाजीराव पेशवा अन दुसरे बाजी भिवराव रेठरेकर. बाजीरावांच्या राजपुताना मोहिमेदरम्यान इकडे रेठरेकरांनी बंगशावर नर्मदेच्या वाळवंटात अक्षरशः गुदमरून जाण्याचा प्रसंग आणलेला.
वसईच्या मोहिमेत बाजी भिवराव हे आपल्या फौजेसह चिमाजीआप्पांना कुमक करत होते, अन तारापूरच्या लढाईत तोंडात गोळी लागून ठार झाले. वास्तविक या वेळेस बाजीराव पेशवे बऱ्हाणपूरच्या आसपास नादिरशहाच्या मोहिमेची आखणी करण्यात व्यस्त होते. आपला सवंगडी गेला ही बातमी बाजीरावांना समजली आणि त्यांच्या डोळ्यासमोर एकदम रेठरेकरांच्या मातोश्री वेणूबाईंचा चेहरा आला. बाजीरावांनी वेणूबाईंचं सांत्वन करताना जे पत्रं लिहिलंय ते वाचनीय आहे.
"गंगाजान्हवीसमान मातुश्री वेणूबाई काकी वडिलांचे सेवेसी :-
अपत्ये बाजीराव बल्लाळ साष्टांग नमस्कार वि|| येथील ताा पौष वद्य १३ पावेतों स्वकीय लिहित जाणे. विशेष पौष शुाा ११ स तारापुरावर हल्ला केला ते समयीं बाजी भिंवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी जाहले. ईश्वरें मोठें अनुचित केलें! तुम्हास शोक प्राप्त जाला. आमचा तर भाऊ गेला त्यास, तुम्ही वडील. दुःखाचे परिमार्जन करून विवेक करावा. त्यांची मुलें व चिमणाजी आप्पा आहेत, त्यांचेही त्याजपेक्षां अधिक चालेल. परंतु आमचा भाऊ गेला. बाजू गेली. उपाय नाहीं. त्यास, चिमणाजी भिंवराव हे पाठविले आहेत. हें सांगतील ते ऐकावें. सारांश, मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा. मजवर दृष्टी द्यावी. बहुत काय लिहिणें, लोभ कीजे हे विनंती."
या पत्रातलं एकूण एक वाक्य बघा, कोण या पेशव्यावर जीव ओवाळून नाही टाकणार? आपण गेलो, तरी आपल्या मागे आपल्या कुटुंबाची जबाबदारी हा माणूस घेईल ही सगळ्यांना खात्री होती. "आमचा तर भाऊ गेला" म्हणताना महत्वाचं वाक्य पुढे आहे ते म्हणजे, "मीच तुमचा बाजीराव! असं समजून, माझ्याकडे बघून दुःख गिळावं".. समर्थ इथे पुन्हा आठवतात.. या मोठ्या माणसांची "सलगी देणे, कैसी असे" हे यातून दिसतं.
चित्र: बाजीरावांनी वेणूबाईंना पाठवलेल्या पत्रातील "मीच तुमचा बाजीराव" हे शब्द. मूळ पत्रं पुण्याच्या पेशवे दप्तरात आहे.
- कौस्तुभ कस्तुरे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...