विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 6 October 2023

सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध) भाग २

 


सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग २
श्रीशिवछत्रपती हे आपल्या समोर अनेक रुपात येतात. पण त्यांचे सर्वात महत्वाचे रूप म्हणजे ते भारताच्या मध्ययुगिन इतिहासातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक होते. राजकिय पटलावरची एखादी संधी हेरायचे किंवा नसल्यास ती निर्माण करायचे आणि मग ते योजनाच अशी आखायचे की ज्याने शत्रू भांबावून जात असे व त्याला हालचाल करायला संधीच मिळत नसे, हे आयुष्यभर शेकडो घटनांद्वारे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. राज्याभिषेकानंतर तत्कालिन राजकिय परिस्थिती बघून त्यांनी दक्षीणेची मोहीम आखली व यशस्वी करुन दाखवली.
वास्तविक मराठ्यांचा व दक्षीणेचा संबध हा मूळात शहाजीराजांपासून सुरु होतो. शहाजीराजांनी निजामशाही आडून स्वातंत्र्याचा केलेला प्रयत्न अल्पजीवी ठरला. ऑक्टोबर १६३६ मध्ये मुघल - आदिलशाहीच्या संयुक्त फौजे समोर शहाजीराजांना माहुली इथे शरणागती पत्करावी लागली. पण नुसती शरणागती पत्करुन फायदा नव्हता. नंतर काय हा प्रश्न होताच - मुघल कि आदिलशाही? या प्रश्नाचा विचार करताना त्यांनी शहाणाजोगेपणाने तुलनेने कमकुवत आदिलशाही निवडली. पण आदिलशहा देखिल दुधखुळा नव्हता. त्याने शहाजीराजांना महाराष्ट्रात राहु दिले नाही. त्याऐवजी त्यांना बंगरुळमध्ये जहागिरी दिली. शहाजीराजांना महाराष्ट्रात दिलेल्या जहागिरीत पुणे होतंच. याशिवाय सुपे, बारामती, चाकण, शिरवळ बहुदा १६३९ तर इंदापूर १६४६ च्या आसपास मिळाली असावी. पुढे जहागिरी बरोबर या भागांची मोकासदारीही मिळाली. इथे जहागिरी व मोकासदारी यातला फरक समजावून घेऊ जहागिरीत फक्त तो भाग त्याला उत्पन्न - खर्चासाठी मिळे पण त्याला त्यावर सरकारी दृष्ट्या स्वामीत्व नसे. तिथली शासकिय व्यवस्था सरकारच बघत असे. मात्र मोकासदारीत सरकार अधिकचे अधिकार देत असे. इनाम चालवणे अथवा रद्द करणे, गावे वसवणे, शेती उत्पादनासाठी प्रयत्न करणे वगैरे अधिकार व जबाबदार्या दोन्ही त्यावरती येत असत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...