साधारणपणे सप्टेंबर-नोव्हेंबर १६६६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे दोघेही आग्र्याहून सुटका करून स्वराज्यात दाखल झाले. युवराज संभाजीराजे स्वराज्यात परत येताच छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ स्वराज्यात शांतता रहावी म्हणून मोगलांशी तहाचे बोलणे सुरू केले. दुसरीकडे औरंगजेब याने मिर्जाराजे जयसिंह यांना दक्षिणेच्या सुभेदारीवरून काढुन उत्तरेत बोलावले आणि आपला पुत्र शहजादा मुअज्जम यास दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब तसेच छत्रपती शिवाजी महाराज - शहजादा मुअज्जम असा पत्रव्यवहार सुरू होता, हे सगळे सुरू असताना युवराज संभाजी महाराज यांना मोगलांकडून पुन्हा सप्तहजारी मनसब खानदेश-वऱ्हाडचा सुभा, १५ लाख होनाचा मुलुख मिळाला.
युवराज संभाजीराजे मनसबदार आणि खानदेश-वऱ्हाडचे सुभेदार म्हणून शहजादा मुअज्जम यास भेटण्यासाठी ९ ऑक्टोबर १६६७ रोजी राजगडावरून निघाले. शंभूराजे यांचे वय त्यावेळी फक्त १० वर्ष ५ महिने इतके होते. युवराज संभाजीराजे यांच्यासोबत सरनोबत प्रतापराव गुजर व आनंदराव मकाजी, प्रल्हाद निराजी, निराजीपंत आणि राहुजी सोमनाथ होते. २७ ऑक्टोबर १६६७ म्हणजेच आजच्याच दिवशी युवराज संभाजीराजे औरंगाबाद येथे पोहचले. त्याच दिवशी त्यांनी जसवंतसिंहाची औपचारिक भेट घेतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑक्टोबर १६६७ रोजी शहजादा मुअज्जम याची भेट झाली. शहजादा मुअज्जम याने हत्ती, घोडे, जवाहिर, वस्त्रे दिली. वऱ्हाड आणि खानदेश पंधरा लाख होनाचा मोकासा दिला. ४ नोव्हेंबर १६६७ रोजी शहजाद्याचा निरोप घेऊन युवराज संभाजीराजे प्रतापराव गुजर व निराजीपंत यांच्यासह राजगडाकडे निघाले, युवराज संभाजीराजे यांना राजगडी पोहचवून प्रतापराव गुजर आणि निराजीपंत यांना त्यांचे मुतालिक म्हणून औरंगाबादला शहजादा मुअज्जमकडे पुन्हा दाखल व्हायचे होते. त्यानंतर संभाजीराजे शहजाद्याकडे जाऊन येऊन असत..
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात काही काळ शांतता रहावी म्हणून मोगलांशी तहाचे बोलणे सुरू ठेवले होते आणि त्यांनतरच्या घडलेल्या काही घटनांची ही थोडक्यात पार्श्वभूमी, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे यामागील राजकारण काय होते याची नोंद आपल्याला अबे करे याच्या अहवालात मिळते. अबे करे याचा अहवाल खूप मोठा आहे, लेखनसीमेअभावी त्या अहवालातील काही ठळक गोष्टी नमुद करणे योग्य ठरेल.
अबे करे नमूद करतो " मला सुभेदाराकडून या शिवाजीच्या मुलाच्या बऱ्याच गोष्टी समजल्या. त्याने मला सांगितले की, या बालराजाला खानदेश प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर गुप्त कट घडवून आणावा. पादशाहजाद्याची व या बालराजाची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या सारख्या भेटीगाठी होत राहिल्याने तर ते मोठ्यामोठ्या राजकारणात एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडून एकमेकांपासून गुप्त काहीच राहत नसे. ज्या संभाजीराजेवर सैन्याचे व त्याच्या बापाचे विशेष प्रेम होते, त्या संभाजीराजास तो अधिकाधिक प्रेमाने वागवू लागला. कारण की मोअज्जमला संभाजीराजाच्याकरवी शिवाजी महाराजांची मदत पाहिजे होती. अबे करे पुढे लिहतो " पादशहजाद्याने त्याला औरंगजेबकडून होणाऱ्या त्रासाचे सर्व निवेदन केले. त्या बालराजाने या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी हा सर्व मजकूर आपल्या बापाला कळवला. शिवाजीनेही आपल्या मुलाला पादशहजाद्याच्या विचारप्रणालीस अधिकच चालना देण्याची आज्ञा केली. आपल्या आकांशा सुफलीत करून घेण्यास नवीनच राजकारण हाती आल्यामुळे शिवाजीला फार आनंद झाला. अशा तर्हेने शिवाजींनीही आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनीतीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला "
या राजकीय घडामोडी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलुख सावरून बारदेशावर स्वारी करून जाळपोळ, तसेच देसाईना धडा शिकवण्याची संधी मिळाली.
- राज जाधव
No comments:
Post a Comment