खंडेराव महाराज हे सयाजीराव दुसरे यांचे तृतीय पुत्ररत्न होते. त्यांचा जन्म इसवी सन 1828 मध्ये झाला. ज्येष्ठ बंधू गणपतराव महाराज यांच्या मृत्यूनंतर ते 19 नोव्हेंबर, 1856 रोजी बडोद्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. खंडेरावांना कुस्तीचा शौक आणि प्रेम होते आणि याचमुळे ते स्वतः बलदंड शरीरयष्टी राखून होते. बडोदा येथील खंडेराव मार्केट येथे त्यांचा असलेला पुतळा याची साक्ष आहे. खंडेराव महाराज या कारणांमुळे जनमानसात लोकप्रिय होते. ब्रिटिशांच्या कार्यशैलीनुसार त्यांनी संस्थानचा राज्यकारभार केला.
खंडेराव यांच्या कार्यकाळातच बडोदा संस्थानात रेल्वेमार्ग सुरू झाला. ही एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना म्हणावी लागेल. ही रेल्वे मियागाम ते डभोई अशी मार्गक्रमण करीत असे. इसवी सन 1862 मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेला गायकवाडांच्या बडोदा संस्थानची रेल्वे म्हणून ओळखले जाई. बडोदा संस्थानाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी नर्मदा नदीतून पाणी बडोद्यापर्यंत आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी त्या वेळचे सुमारे 36 लक्ष रुपये खर्चून आखली होती. परंतु ती कारणपरत्वे यशस्वी आणि फलदायी ठरू न शकल्याने अपूर्णावस्थेत बंद करावी लागली व उर्वरित फंड हा गायकवाड महाराजांच्या ‘मकरपुरा’ या राजमहालाच्या उभारणीसाठी वापरण्यात आला. हा राजवाडा शिकारीच्या हौसेपायी खंडेराव महाराजांनी प्राण्यांच्या अभयारण्यानजीकच बांधला होता. खंडेराव महाराजांना हिर्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. त्यांच्याजवळ सुमारे 129 कॅरेटचा मौल्यवान हिरा तसेच 79 कॅरेट चा मौल्यवान हिरा होता अशा नोंदी आहेत.
बडोद्याच्या राज्यकर्त्यांना ‘सेनाखासखेल आणि समशेरबहाद्दर’ अशा पदव्या छत्रपतींकडून दिलेल्या होत्या. गादीवर आलेले सगळेच राजे या किताबाचा आपल्या नावासोबत वापर करीत. सेनाखासखेलचा अर्थ होतो सैन्याचे सर्वाधिकारी अथवा प्रमुख आणि समशेरबहाद्दर म्हणजे शूर व तलवारीचे अधिपती. आधीच्या दोन्ही राण्यांपासून पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी 1866 मध्ये जमनाबाईसाहेबांशी विवाह केला. मात्र या राणीपासूनही त्यांना 1871 मध्ये कन्यारत्नच लाभले. परंतु दुर्दैवाने त्याआधीच खंडेरावांचे निधन झाले होते.
खंडेरावांनी तांब्याची विविध प्रकारची नाणी तसेच चांदीचीही नाणी पाडली होती. यात वर श्री, मध्ये छोटीशी फांदी आणि खाली ‘ख, गा’ ही नावाची आद्याक्षरे असलेली जाडसर तसेच पातळ अशी नाणी आहेत. यातील आद्याक्षरांच्या खाली आडवी तलवार पण आहे तसेच हिजरी सन पण छापलेले आहे. अजून एका नाण्यावर ‘ख गा’ या आद्याक्षरांसह आणि समशेरसमवेत अश्वाचा खूर (हेीीश हेेष) दर्शवलेला आहे. हे चिन्ह आपले घोडदळ समृद्ध आणि युद्धात तरबेज आहे, हे सिद्ध करण्यासाठी असावे. बंधू गणपतराव महाराज यांच्या नाण्याबरहुकूम खंडेरावांच्याही नाण्यावर ‘श्री ख, गा’, कळी आणि उभी तलवार छापलेली आढळते. तांब्याच्या नाण्यांत 1/2 पैसा, एक पैसा व दोन पैसे या मूल्याची नाणी छापलेली आहेत. चांदीच्या नाण्यांत 1/8 रुपया, 1/4 रुपया, 1/2 रुपया आणि एक रुपया या मूल्याची नाणी पाडलेली आढळतात. यांवरदेखील हिजरी सन, ‘ख, गा’ ही देवनागरीतील आद्याक्षरे आणि डावीकडे वळलेली तलवार छापलेली दिसते. तत्कालीन साचा बनवणार्याचे अज्ञान अथवा चूक म्हणा यातील तांब्याच्या काही नाण्यांवर दोन्हीही बाजूला ‘ख/गा’ छापले गेलेले आढळते. तर काही नाण्यांवर चक्क ‘गा / ख’ असेही उलट्या पद्धतीने छापलेले दिसून येते. या तांत्रिक चुकांपेक्षा ते नाणे वापरण्यासाठी उपलब्ध असणे हे तेव्हा महत्त्वाचे होते. म्हणून ही नाणी तेव्हा चलनात आली असावीत किंवा कदाचित त्या काळी बाद केलेली ही नाणी आता संग्राहकांसाठी उपलब्ध झाली असावीत.
अजून एका वेगळ्या धाटणीचे खंडेरावांचे तांब्याचे नाणे आढळते, ज्यावर डाळिंब या फळासदृश आकृती / चिन्ह छापलेले आढळते.
खंडेरावांनी अगदी सयाजीराव दुसरे यांच्याएवढी वैविध्यता असलेली नाही. परंतु त्यामानाने बरीच वेगवेगळ्या पद्धतीची नाणी पाडली, हे मात्र खरे. मात्र खंडेराव महाराजांच्या नाण्यांमधील अतिशय महत्त्वाचे पाडलेले नाणे म्हणजे पर्शियन लिपीतील नजराणा रुपया. या नजराणा रुपयासोबत त्यांनी 1/2 नजराणा रुपया पण पाडला होता. यातील एका नजराणा रुपयावर महाराजांचे नाव पर्शियनमध्ये ‘खंडेराव’ असे सुयोग्य पद्धतीने आहे.
त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 28 नोव्हेंबर, 1870 पर्यंत चौदा वर्षे राज्यकारभार केला.
No comments:
Post a Comment