विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 26 November 2023

'संस्थान शिवसागर'

 

कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर तटबंदीच्या आत असणारा मंदिर समूह म्हणजे

'संस्थान शिवसागर' होय. संस्थान शिवसागर मधील मंदिरे कोल्हापूरच्या कैलासवासी छत्रपती महाराजांची स्मृतीमंदिरे आहेत. या मंदिर समूहातील सर्वात पहिला उभारण्यात आलेले मंदिर हे शिवरायांचे नातू व राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचे आहे. २० डिसेंबर १७६० रोजी त्यांचे निधन झाले, कोल्हापूरच्या पंचगंगा तीरावर त्यांचेवर अंत्यसंस्कार करुन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याठिकाणी महाराणी जिजाबाई यांनी त्यांची भव्य 'छत्री' उभारली ज्यास हल्ली मंदिर म्हणून ओळखले जाते. यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार त्याच ठिकाणी करण्याचा प्रघात पडला. पुढेही अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर त्या छत्रपतींची स्मृतीमंदिरे उभारली गेली.
परंतू हा संपुर्ण परिसर पंचगंगेच्या अगदी जवळ असल्याने पाऊसाळ्यात या भागात पुर्ण पाणी असते. पंचगंगा या भागाला कवेत घेऊनच वाहत असते. त्यामूळे ऐन पाऊसाळ्यात छत्रपती घराण्यातील कोण्या व्यक्तीचे निधन झाल्यास, त्याचे विधी करण्यास आडचण येऊ शकते. या कारणास्तव छायाचित्रात दाखवलेली जागा निश्चित केली आहे. या जागेत कितीही महापूर आला तरी पाणी येत नाही. हा भाग यासाठी राखीव असून, त्याची मालकी आजही छत्रपती देवस्थान ट्रस्ट यांच्या कडेच आहे. या ठिकाणी आणखी दोन इमारती होत्या,परंतू त्याची पडझड होऊन त्या आता नामशेष झाल्या आहेत.
आता आपण हे मंदिराविषयी पाहू...
हे मंदिर आतून अतिशय सुरेख असून लाकडी कलाकुसर केलेले आहे. आजही निरखून पाहील्यास, दोन्ही बाजूच्या भिंती नंतर बाधंल्याचे लगेच लक्षात येईल.
यामंदिरामध्ये एकाच ठिकाणी तिन महादेवाच्या पिंडी दिसून येतील. हे अस का. याच उत्तर हे मंदिर सुध्दा छत्रपतींचे समाधीमंदिरच असून यामध्ये तिन छत्रपतींच्या समाध्या आहेत.
यातील १)बवासाहेब महाराज यांची समाधी.
कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत बुवासाहेब महाराज यांनी तुळजाभवानीस नवस केला होता. त्यानुसार नवस फेडण्यासाठी महाराजांनी सहकुटूंब तुळजापूरास भवानी मातेच्या दर्शनास जाण्याचे ठरविले. पावसाळा संपल्यानंतर व राजवाड्यातील श्रींचा नवरात्रौत्सव संपल्यानंतर महाराजांनी सेनापती, पंतप्रतिनिधी, पंतप्रधान, पंतअमात्य इत्यादी मानकऱ्यांना बोलावून तुळजापूरच्या यात्रेची तयारी केली. निघण्यापूर्वी भवानी मातेसाठी हस्तीदंती कलाकुसरीचे शयनासन आणि सिंहासन, वस्त्रे व अलंकार इत्यादी तुळजापुरास पाठविण्यात आले. १८३८ च्या नोव्हेंबर महिन्यात सोबत संपूर्ण राजपरिवार, मानकऱ्यांच्या स्वाऱ्या, तोफा, बंदुका, घोडदळ असा सुमारे दोन हजार लोकांचा लवाजमा घेऊन महाराज तुळजापूरास निघाले. अर्जुनवाड, मिरज, मालगाव याठिकाणी महाराजांचा मुक्काम झाला. मालगावचा मुक्कामात महाराजांची प्रकृती बिघडली. त्यांना ज्वर येऊ लागला. पण तसेच ते पंढरपुरास गेले. तेथे आजार अधिकच बळावला. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी विठोबाचे दर्शन घेऊन महाराज लवाजम्यासह तुळजापूरकडे निघाले. वाटेत येवती मुक्कामी महाराजांची प्रकृती अधिकच बिघडली आणि शेवटी तेथेच २९ नोव्हेंबर १८३८ रोजी पहाटेच्या वेळी बुवासाहेब महाराज निधन पावले.
२)छत्रपती राजाराम महाराज.
राजर्षी शाहू छत्रपति महाराजांचे नात्याने चुलते व दत्तक आजोबा क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति महाराज विदेश दौऱ्यावर होते.मात्र परतीच्या प्रवासामध्ये इटली देशातील फ्लॉरेन्स या शहरात महाराजांचा मृत्यू झाला.
३)चौथे शिवाजी महाराज.
ब्रिटिशांशी संघर्ष करताना छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झाले.
कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून हवापालटासाठी म्हणून तेव्हाचे दिवाण व ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोल्हापूरातून अन्यत्र हलवले. जून १८८२ मध्ये महाराजांना अहमदनगरच्या किल्ल्यात एकांतवासात ठेवण्यात आले. त्यांना कोणाला भेटू दिले जात नव्हते. शेवटचे दीड वर्ष महाराज किल्ल्यात होते. २५ डिसेंबर १८८३ रोजी ब्रिटीश सार्जंट ग्रीन याच्याशी झालेल्या झटापटीत महाराजांच्या पोटाला मार लागून मृत्यू झाला. नाताळच्या दिवशीच ब्रिटीशांकडून महाराजांची हत्या झाली. महाराज तेव्हा अवघ्या २० वर्षांचे होते. आपला राजा ब्रिटीशांकडून मारला गेला, हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेर अंत्यसंस्कार उरकले.
आजही अहमदनगर येथील महाराजांच्या दहनभूमीवर एक छोटी समाधी व महाराजांचे सुंदर स्मारक उभे आहे.
हे तिन छत्रपती आपल्या राजधानी पासून दुर मृत्यूमुखी पडले. त्यांचे स्मरण रहावे. यासाठी याठिकाणी त्यांचे समाधीमंदीर बाधंण्यात आले आहे. तसेच याच मंदिरात शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सर्व छत्रपतींचे अस्थीकलश ठेवण्यात आले होते. अगदी अलिकडच्या काळापर्यंत तांब्याच्या कलशात अस्थी होत्या. सध्या त्याचा ठावठिकाणा समजत नाही.
अशी समाधीमंदिर बाधंण्याची परंपरा छत्रपती घराण्यात पुर्वापार चालत आलेली आहे.
त्यामूळेच अन्य छत्रपतींची समाधी मंदिरे आपल्याला आढळतात.
हि वास्तू कायम बंद असल्याने आणि बऱ्याच जणांना माहीती नसल्याने या वास्तूबद्दल कायम समज, गैरसमज पसरत असतात.
धन्यवाद.
राहुल शिंदे.9766288488

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...