अक्कलकोट गुलबर्गा रोडवर अक्कलकोट पासून 7-8 किलोमीटरवर होनमुर्गी नावाचं एक गाव आहे. तिथे अल्लाबक्श हा मांत्रिक व जंगलिशा अहमदशा हा त्याचा चेला लोकांची काही किरकोळ कामे करून त्यावर गुजराण करीत असत. स्वामी समर्थ जसे अक्कलकोटात आले तसा यांचा धंदाच हळूहळू बसला. आता काय करायचं ? गुजराण कशी करायची ? या स्वामीचा काटा काढल्याशिवाय धंदा सुरळीत बसणारा नाही म्हणून जारणमारणाचा मंत्र टाकून अल्लबक्षने जंगलिशाची मूठ वळवून घट्ट केली व "इस स्वामी का काम तमाम कर देते है अब" असं म्हणत ती कापडात बांधलेली हाताची घट्ट मूठ घेऊन जंगलिशा तडक अक्कलकोटात आला. *वो स्वामी कहाँ है* असं विचारत चोळाप्पाच्या घरी स्वामी आहेत असं कळल्यावर तिथं आला. स्वामी अंथरूणावर पहुडले होते ते पाहून जंगलिशाने कापड सोडवून मूठ स्वामींचे दिशेने मारली तो काय ? वीज चमकावी तसं स्वामींनी जंगलिशाकडे क्षणभर चमकून पाहिलं व परत निवांत पडले. मूठ जंगलिशा वरंच उलटली. त्याला जागचा हलता येईना की पापणी हलवता येईना की थुंकी गिळता येईना. अर्घा तास तसाच गेल्यावर जंगलिशा भयंकर घाबरला. त्यानं मनातल्या मनात स्वामींची माफी मागितली व म्हणाला, *स्वामी मेरेकू बचाव* स्वामींना ते अंतर्ज्ञानाने कळलं. स्वामींनी त्याला मनातच उत्तर दिलं *मैने कुछ नही किया. ये तो दत्तमहाराज की किमया है* मग जवळची चिमूटभर माती घेऊन त्याचे दिशेने फेकताच जंगलिशा मोकळा झाला. पुढे जवळपास वर्षभर स्वामींची दिवसरात्र स्वामींची मनोभावे सेवा केली. एक दिवस पहाटे जवळ बोलावून स्वामींनी डोक्यावर वरदहस्त ठेवला तसा जंगलिशा देहभान विसरला व संपूर्ण अवस्थेत आला. स्वामींची आज्ञा घेऊन तिथून निघाला व अल्लाबक्षला भेटला. त्याला काही उपदेश केला. आता दोघांना जादूटोण्याची गरजच उरली नव्हती.
जंगलिशा तिथून निघाला तो फिरत फिरत सांगलित नदीकिनारी येऊन बसला. तिथे घाटावर जवळच एक रखमाबाई गाडगीळ नामक विधवा बाई कपडे धूवत होती व तिचा एकुलता एक मुलगा छोटा मुलगा वरखाली वरखाली धावत खेळत होता. खेळता खेळता एका उंच ठिकाणावरून तो खाली पडला व जागीच गतप्राण झाला. हे पाहून रखमाबाईचा धीर सुटला व तिनं हंबरडा फोडला. जवळपासच्या बायकापुरूषांनी तिची पुष्कळ समजूत घातली पण व्यर्थ.
मग एकजण म्हणाला की "तिथे कोणी अवलियासदृष्य मनुष्य बसलाय त्याकडं जा"
हो नाही करता करता लेकराचं कलेवर घेऊन ती माय जंगलिशासमोर आली. *हे जग नश्वर आहे त्याचा पाश तोड असं पुष्कळ तत्वज्ञान ऐकवलं* पण रखमामाय ऐकेना. "मला मुलगा देत असाल तर द्या तत्वज्ञान नको" असं म्हणाली.
जंगलिशाने स्वामींचे स्मरण करून मुलाला उठायची आज्ञा करताच झोपेतून उठल्यागत उठून बसला व भूक लागली म्हणाला. जवळपासच्या लोकांनी जयजयकार केला. रखमा म्हणाली "मला आता संसार नको. सेवा करायची आहे"
जंगलिशा तिला म्हणाले *आता मुलगा जिवंत झालाय. आता त्याचं सर्व कर, मग मी येईन*
ही बातमी लगेच राजवाड्यावर पटवर्धनांचे कानी गेली तसे राजेसाहेब स्वतः अदबीनं घाटावर येऊन जंगलिशाची वाड्यावर मुक्कामी यावं म्हणून विनवणी करू लागले.
तसं काही दिवस पटवर्धनांचे वाड्यावर काही दिवस मुक्काम केल्यावर आशीर्वाद देऊन स्वारी सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक गावी आली. तिथे काही दिवस राहिल्यावर एकाजणाचा खून झाल्यावर उदास होऊन ते गाव सोडले व पुणे पलिकडील नदीतीरी भांबुर्डा गावठाणात येऊन राहिले. रोकडोबाचे मंदिरात मागे बसत असत.
पुढे या रखमाबाई गाडगीळही तेथे आल्या. त्या ज्ञानेश्वरीवर रोकडोबा मंदिरात उत्तम प्रवचन करीत असत. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांचे अंगाखांद्यावर येऊन बसत असत.
रोकडोबाचे समोरील राम मंदिर रखमाबाई गाडगीळांनी वर्गणी व कर्ज घेऊन बांधले. आजही प्रदक्षिणा मार्गावर डावीकडे दत्ता पाध्येचे घरासमोर या रखमाबाईंची व त्यांच्या सेवेकरीणीची समाधी आहे.
जंगली महाराजांनी गावठाणातील अजाबलीची प्रथा बंद केली. दारूच्या नशेत बुडालेल्या गावाला त्यातून बाहेर काढले व देहूहून भजनीमंडळाला बोलावून जंगलिमहाराज भजनी मंडळाची स्थापना केली. गाव सुधारलं. दुपारी गावात भिक्षा मागत असताना फक्त शिरोळेंच्या गृहिणी न चुकता भिक्षा घालत.
एकदा शिरोळेंच्या बाजूचे दोन वाडे आगीत भस्म झाले व ज्वाळा वाड्याच्या दिशेनं पसरल्या तसे महाराज समोर बसून सोटा आपटत राहिले. शिरोळ्यांच्या वाड्याचा वासाही काळा झाला नाही..
पुढे राममंदिरावरचे कर्ज शिरोळ्यांनी सोडवले. तशी शिरोळे घराण्यावर महाराजांचा वरदहस्त कायम राहिला. तो आजही आहे.
1890 मध्ये महाराजांनी देह ठेवल्यावर हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण झालं. हिंदू म्हणाले अंत्यविधी हिंदू पध्दतीने तर मुस्लिम म्हणाले त्यांच्या पध्दतीने.
यावर परत देहात प्रवेश करून उठून बसले. म्हणाले "सर्व विधी हिंदू पध्दतीने व चौचौथऱ्याचा दगड मुस्लिम पध्दतीने" व परत झोपले. त्याप्रमाणे सर्व करण्यात आले. ही बातमी त्यावेळच्या केसरीत आली होती.
शिरोळ्यांपैकी एकांनी 1921 मध्ये महाराजांना पहायचं म्हणून दगड बाजूला सारला तर देह आतच ठेवलाय असा होता.
मग पूजा प्रार्थना केल्यावर डोळे उघडले आशीर्वाद दिला व "परत कोणीही कधीच दगड हलवायचा नाही ही आज्ञा दिली.."
पुढे मंदिर बांधताना पाया मिळेना तसे शिरोळ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले पाया मिळणार नाही कारण ही नैसर्गिक टेकडी नाही तर बाजूची लेणी कोरताना जो दगडभुसा निघाला त्यानी बनली आहे
म्हणून साधं बांबूच्या बांधणीचं मंदिर बांधायला सांगितलं. ते आजतागायत तसंच आहे.
असो.
।। श्री गुरूदेव दत्त ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
अमोल तावरे के फेसबुक वॉल से साभार
No comments:
Post a Comment