औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही, वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. छत्रपती शाहू ताराबाईसाहेब संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाईसाहेब या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला. त्यावेळी ताराबाईसाहेबांना सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला..
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला, होता परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडी करांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येई पर्यंत करवीरकरांकडे राहिला..
प्रत्येक गडात प्रवेश करण्यासाठी डोंगरावर चढाई करावे लागते, परंतु रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क उतार उतरुन गडात प्रवेश करावा लागतो.. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणार्या छोट्या वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो, प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे..
No comments:
Post a Comment