विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 31 January 2024

३० जानेवारी १७१५... सरखेल कान्होजींचा दरारा.

 


३० जानेवारी १७१५... सरखेल कान्होजींचा दरारा...🚩

कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली...

मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला असे समाधान शाहू छत्रपतींना झाले...

१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ.स १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात...,

१).“मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले...”

२).“तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले...”

या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजीं पुढे त्या दोघांचे काही चालले नाही..

३१ जानेवारी १९४८ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे एक अपूर्ण स्वप्न साकार झाले.

 


३१ जानेवारी १९४८ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे एक अपूर्ण स्वप्न साकार झाले...🚩
भारत जरी १५ ऑगस्ट १९४७ ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला असला तरी ब्रिटिशांचे मांडलिक असलेल्या सिद्दी नवाबाच्या जंजिरा संस्थानाच्या पारतंत्र्यातून मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन हे तीन तालुके मुक्त व्हायला ३१ जानेवारी १९४८ चा दिवस उजाडावा लागला...
१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने मुघल बादशहा कडून स्वतंत्र सनद मिळवून जंजिऱ्याची जहागीर मिळवली आणि मुघलांचे मांडलिकत्व पत्करले छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करुनही थोडक्यात जंजिरा हातातून निसटला त्यांना जर या मोहिमेसाठी पुरेसे आयुष्य आणि पुरेसा वेळ मिळाला असता तर त्यांच्यासाठी जंजिरा जिंकणे अशक्य नव्हते छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात जंजिरा येत आहे हे पाहून औरंगजेबाने त्याची फौज कल्याण भिंवडीच्या मार्गे रायगडाच्या दिशेने पाठवली त्यामुळे नाईलाजास्तव संभाजी महाराजांना रायगडावर परत यावे लागले मराठ्यांच्या हाती जाऊ नये म्हणून मोगल, इंग्रज, आणि पोर्तुगिजांसारख्या शत्रूंनाही एकत्र आणणारा जंजिरा हा बहुतेक एकमात्र किल्ला...
१८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यावर सिद्दी नवाबांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले पुढे १९४८ पर्यंत तो नवाबांच्याच ताब्यात होता १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर शेवटच्या नवाबाला सिद्दी मोहम्मद खान त्याचे नाव भारतात सामील होणे मान्य नव्हते त्याला जंजिरा संस्थान पाकिस्तानात न्यायचे होते विचार करून पहात सध्याच्या महाराष्ट्राचा एक भाग जर पाकिस्तानचा भाग बनला असता तर कसे चित्र दिसले असते आणि त्यात वर पेशव्यांची मूळ गावं श्रीवर्धन, मुरुड आणि म्हसळा...
२८ जानेवारी १९४८ रोजी म्हसळा तर ३० जानेवारी १९४८ रोजी श्रीवर्धन ताब्यात घेतले लोकांच्या दबावामुळे घाबरलेल्या नवाबाने ३१ जानेवारी १९४८ रोजी सामीलनाम्यावर सही केली आणि जंजिऱ्यावर तिरंगा फडकला...🇮🇳
———————————
📷 सह्याद्री प्रतिष्ठान

Saturday, 27 January 2024

गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला, असे सरदार बाजी भिवराव रेठरेकर

 


गोवेकर पोर्तुगीजाला धडा शिकवायचा चंगच त्यांनी बांधला, असे सरदार बाजी भिवराव रेठरेकर...🙏🏼🚩
२४ जानेवारी १७३९ च्या,
तारापुरच्या मोहिमेत तोंडात गोळी लागून मृत्युमुखी पडलेल्या या योद्धयाचे खरे नाव भिवराव रेठरेकर.. परंतू जीवाची बाजी लाउन त्यांनी युद्धात पराक्रम गाजवला म्हणून बाजीरावांचे छोटे भाऊ चिमाजी अप्पा यांनी त्यांचा बाजी असा उल्लेख केला...
इ.स १७३४ मधील सिद्धीवरील बाणकोटच्या मोहिमेत बाजी भिवराव यांनी अतिशय पराक्रम गाजवला. तसेच इ.स १७३६ मधे बुंदेलखंड येथे चौथाई वसूल करण्याचे कामसुद्धा यांनी केले. भिवराव हे बाळाजी विश्वनाथ यांचे अतिशय खास सरदार त्यांच्या दोन्ही मुलांची नावे सुद्धा बाजीराव व चिमणाजी अशीच होती. त्यांच्या मृत्यूनंतर चिमाजी अप्पा यांनी बाजीराव पेशवे यांना लिहिलेल्या पत्रात ‘तारापुर घेतले.. फत्ते झाली परंतू बाजी भिवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले परम दुःख झाले...’ अशाप्रकारे आपला शोक व्यक्त करतात...
तर त्यांच्या मातोश्री वेणुबाई यांना लिहिलेल्या पत्रात बाजीराव पेशवे म्हणतात, ‘माझा मोठा भाऊ गेला इथून पुढे आता मीच तुमचा बाजी...’
● सरदार रेठरेकर घराणे :
रेठरेकर घराण्याचे मूळ पुरुष भिवराव रेठरेकर हे रेठरेवड गावाचे कुलकर्णी. १६८०-८५ या सालात अर्थाजनसाठी आलेले हे घराणे काही कारणास्तव तळेगाव येथे राहिले. तेथेच तळेगाव च्या दाभाड्यांकडे त्यांना फडणीशी मिळाली. धनाजी जाधव व येसाजी दाभाडे यांचा उत्तम स्नेह असल्या मुळे बाळाजी विश्वनाथ ही तळेगावला येणेजाणेबकरीत. येथेच भिवराव रेठरेकर आणि बाळाजी विश्वनाथ यांची चांगली मैत्री झाली. बाळाजी विश्वनाथ हि जेव्हा कामानिमित्त दाभाड्यांकडे तळेगावला येत असत तेव्हा त्यांचा मुक्काम हा रेठरेकरांच्या घरीच असत. दोघेही हुशार व बुद्धिमान असल्याने कामात एकमेकांशी सल्लामसलत करत असल्याने दोघेही एकमेकांची योग्यता जाणून होते. पुढे बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली आणि ते त्यांच्या कामात गुंतून गेले आणि भिवराव रेठरेकर हि आपल्या मूळ गावी आले आणि तेथेच कालांतराने मृत्यु पावले..
रेठरेकरांचे कुटुंब व भट पेशवे कुटुंब यांचा घरोबा निस्सीम होता, इतका की भिवराव रेठरेकर यांनी आपल्या मुलांचे नाव ही बाजी भिवराव आणि चिमणाजी भिवराव अशी ठेवली. हे दोघे भाऊ पुढे बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांच्या सोबत शेवट पर्यंत राहिले. दोघेही बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांचे बालमित्र. हे दोघेही भाऊ महापराक्रमी..!

#रास्ते_वाडा

 









#रास्ते_वाडा
दारूवाला पुलावरून डावीकडे वळून पुणे स्टेशनकडे जाताना समोर एक भव्य वाडा दिसतो. तो म्हणजे #रास्ते_वाडा. भव्य प्रवेशद्वार असलेला हा वाडा लांबूनच ओळखता येतो. सदर वाडा तीन मजली असून, छपरावर कौले आहेत. या वाड्याच्या एका बाजूस आगरकर हायस्कूल असून, तिथून अपोलो टॉकीजपर्यंत व मागे के.ई.एम्. हॉस्पिटलपर्यंत वाडा पसरलेला आहे. पेशवाईतील एक प्रमुख #सरदार_आनंदराव_रास्ते यांचा हा वाडा.
गुहागरमधील वेळणेश्वर या गावातील रास्ते यांचे आडनाव पूर्वी गोखले हे होते. आदिलशाहीत या घराण्याचा करवसुली व सावकारीचा व्यवसाय होता. गोखले घराण्याचा प्रामाणिकपणा व सचोटी पाहून त्यांना रास्ते हे नामाभिधान मिळाले. छ. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत भिकाजी नाईक रास्ते व सदाशिव नाईक रास्ते हे सावकारी व्यवसायानिमित्त साताऱ्यात स्थायिक झाले. त्यांचा शाहू महाराजांशी परिचय होऊन त्यांची छत्रपतींच्या विश्वासू व्यक्तीमध्ये गणना होऊ लागली. काही कालावधी नंतर भिकाजी रास्ते यांची कन्या #गोपिकाबाई हिचा विवाह #नानासाहेब_पेशवे यांच्याशी झाला. भिकाजी यांच्या सात मुलांपैकी मल्हारराव यांना पेशव्यांची सरदारकी मिळाली, ते पेशव्यांच्या घोडदळाचे प्रमुख होते. त्यांच्या नंतर आनंदराव हे सरदार झाले. आनंदराव रास्ते यांनी वाई प्रांतात आपले मुख्य ठाणे ठेवले. वाई येथे महालक्ष्मी, विष्णु, गणपती, काशी विश्वेश्वर, गंगारामेश्वर, पंचायतन ही देवालये, कृष्णा नदीस घाट, धर्मपुरी ही नवी पेठ वसवून ब्राम्हणांना त्यांनी तेथे घरे बांधून दिली. बोपर्डीचा रस्ता व सोनजाईचा मार्ग यांच्या दुतर्फा तीन मैलाच्या परिसरात आंब्याची झाडे लावली. अनंतपूर येथे किल्ला बांधला. याखेरीज नाशिक, त्र्यंबकेश्वर, सातारा, तासगाव, अनंतपूर, अथणी, पंढरपूर, वाल्हे, मांडवगड, तालीकोट येथे वाडे बांधले. सरदार रास्ते यांनी आपल्या पराक्रमाने कर्नाटक व दक्षिणेकडील प्रदेशात आपली घडी बसवली.
पुणे शहराच्या पूर्वभागात #सरदार_आनंदराव_रास्ते यांनी गणेश मंदिर उभारून #रास्ता_पेठ वसवली आणि भव्य वाडा बांधला. सवाई माधवरावांच्या कारकीर्दीत इ.स. १७७९ ते इ.स. १७८४ या काळात रास्ते वाड्याचे बांधकाम झाले. या बांधकामाला नऊ लाख रुपये खर्च आला. #रास्ते_वाड्याला भव्य लाकडी प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या लाकडी दरवाज्यांवर उठावदार नक्षी कोरलेली आहे. या वाड्याला तीन मजले व दोन चौक आहेत. वाड्याच्या सभोवती तटबंदी असून या तटबंदीच्या लगत तबेले व घोडदळाच्या इमारती होत्या. या वाड्याचे क्षेत्रफळ अकरा हजार चौरस फूट आहे. तत्कालीन इतर मराठा शैलीतील इमारतीप्रमाणेच या वाड्याच्या बांधकामात कलात्मकरीत्या लाकडांचा मोठ्या प्रमाणात चापर करण्यात आलेला आहे.
प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस मुख्य निवासस्थान आहे या इमारतीचेही प्रवेशद्वार भव्य असून त्यावर गणेशपट्टी कोरलेली आहे. आत प्रवेश केल्यावर घडीव दगडांची फरसबंदी असलेला मोठा चौक आहे. चौकाच्या समोर तीन पायऱ्या चढून ओसरीवर डाव्या हाताला शंकराचे देऊळ आहे. या चौकाच्या चारही बाजूंस लाकडी खांब व प्रशस्त ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांना लागून चारही बाजूंनी सोपे, कोठी, माजघर, मुदपाकखाना, जामदारखाना व मोठे भोजनकक्ष होते. या वाड्यात पाचशे लहान-मोठी दालने होती. या इमारतीत दोन जिने व छत्तीस दरवाजे आहेत. ओसरीतील खांब व कडीपाटांना तेलपाणी दिल्यामुळे त्यांची झळाळी आजही उठून दिसते. या वाड्यातील दिवाणखाने भव्य असून या दिवाणखान्यांच्या मध्यभागी सुरूदार खांब आहेत. या दिवाणखान्यांच्या छतावर विविध प्रकारची नक्षी कोरलेली आहे. दिवाणखान्यात काचेच्या हंड्या व छतावर मध्यभागी झुंबरे लावलेली आहेत. दिवाणखान्यांच्या भिंतींना लागून जिने व खोल्या आहेत. दुसऱ्या मजल्यावरील दिवाणखान्यांत पूर्वी कारंजी होती. हा दिवाणखाना पूर्वजांची तैलचित्रे, ऐतिहासिक प्रसंगाची चित्रे, हस्तिदंती व संगमरवरी कोरीव काम केलेली टेवले, दुर्मीळ घड्याळे, तांब्याची शोभिवंत भांडी, इत्यादी वस्तूंनी सजवलेला आहे. पूर्वी या वाड्याच्या भिंतींवर भित्तिचित्रे काढण्यात आली होती. या चित्रांचे अस्पष्ट दर्शन एखाद्या भिंतीवर आढळून येते.येथे असलेल्या दरबार हॉलमध्ये सध्या लक्ष्मीबाई रास्ते विद्यालय असून काही भागात कार्यालये आहेत.
सदर वाडा सध्या फक्त बाहेरून बघता येतो. रास्ते कुटुंबीय आजही या वाड्यात राहतात.
संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची - संभाजी भोसले
वैभव पेशवेकालीन वाड्यांचे – मंदा खांडके
पुण्यनगरीतील वाडे व वास्तू - डॉ. एच. वाय. कुलकर्णी
हरवलेले पुणे - डॉ. अविनाश सोवनी
तुम्हाला आमचा हा #आठवणी_इतिहासाच्या प्रकल्प कसा वाटत आहे हे नक्की कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा काही पुण्याच्या आजूबाजूच्या वास्तूंबद्दल माहिती असेल ज्या भूतकाळात गेल्या आहेत, तर आम्हाला तिथे भेट द्यायला आणि त्याची माहिती गोळा करून तुमच्यासमोर आणायला नक्कीच आवडेल.
like करा, share करा आणि follow करा.

Friday, 26 January 2024

संभाजी आंग्र्यांची (इंग्रजी चांदी वापरून पाडलेली!) नाणी आणि कॅप्टन ॲन्सेल्मची सॅलरीस्लीप (१७३६ मधली!)

 


संभाजी आंग्र्यांची (इंग्रजी चांदी वापरून पाडलेली!) नाणी आणि कॅप्टन ॲन्सेल्मची सॅलरीस्लीप (१७३६ मधली!)
=========================
१८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत ईस्ट इंडीया कंपनीच्या सागरी व्यापाराचे बस्तान चांगलेच बसले होते. व्यापारासाठी कंपनीकडे स्वत:ची जहाजे होतीच पण त्याचबरोबर बरेचदा अतिरिक्त मालाची वाहतूक करण्यासाठी कंपनी इतर जहाज मालकांकडून किंवा जहाज कंपन्यांकडूनही जहाजे भाडेतत्वावर (chartering) घेत असे. ह्या बोटावरचे कॅप्टन (त्यांना ‘शिपमास्टर’ म्हणत) आणि खलाशी त्या दुसऱ्या कंपनीचे नोकर असत पण माल मात्र ईस्ट इंडीया कंपनीचा असे. ह्या जहाजांवर देखरेख करण्यासाठी ईस्ट इंडीया कंपनीचे अधिकारीही कधीकधी ह्या दुसऱ्या जहाजांवर असत. अजून एक पध्दत त्या वेळी रूढ होती ती म्हणजे ह्या जहाजवाहतूक करणाऱ्या कंपन्या खलाश्यांचे पगार त्यांच्या हाती देत नसत. कारण खलाशी हे पैसे बाई - बाटली - जुगारात उडवून टाकत असत. असं होऊ नये म्हणून हे पगार खलाश्यांच्या बायकांना दिले जात आणि त्यांची सही त्या कागदांवर घेतली जात असे.
असेच एक जहाज होते ‘डर्बी’. ‘मेसर्स जॉन स्पेन्सर ॲंड हेन्री क्रॅब’ ह्या कंपनीचे हे जहाज ईस्ट इंडीया कंपनीने भाडेतत्वावर घेतलेले होते. ह्या जहाजाचा कॅप्टन होता अब्राहम ॲन्सेल्म. त्याला महिन्याचा पगार होता £३.५०. त्याच्या २३ जुलै १७३६ रोजी मिळालेल्या दोन महिन्याच्या पगाराची - म्हणजे £७ ची ही पावती. हा पगार त्याच्या बायकोला - मिसेस रेबेका ॲन्सेल्मला दिल्याचा उल्लेख आहे. पण त्याचा हा पगार तिला देण्याचे कारण मात्र वेगळे आहे. ह्या काळात कॅप्टन ॲन्सेल्म विजयदुर्गावर संभाजी आंग्र्यांच्या तुरूंगात खितपत पडलेला होता. त्याची ही गोष्ट.
ह्या डर्बी जहाजाने बंगाल ते इंग्लंड माल वाहतूक एकदा केलेली होती. पण दुसऱ्या गोव्याहून निघाल्यानंतर सफरीदरम्यान २६ डिसेंबर १७३५ रोजी संभाजी आंग्र्यांनी ९ जहाजे घेऊन त्याच्यावर दक्षिण कोकणात हल्ला केला आणि पकडून विजयदुर्गाकडे आणले. कॅप्टन ॲन्सेल्मसह बरेच खलाशीही पकडले गेले. डर्बीवर आंग्र्यांना ३ पेट्या भरून चांदी मिळाली. सोबत चांदीचे ३२००० स्पॅनिश डॉलर्सही होते. मालाची किंमत सुमारे वीस लाख होती. (विचार करून पहा - १७३० मध्ये फक्त सुमारे सोळा हजार रुपयांत पुण्यात शनिवारवाडा बांधून झाला होता म्हणजे त्या काळी वीस लाख रूपयांची काय किंमत असेल!) ईस्ट इंडीया कंपनीच्या इतिहासातही संपूर्ण जगात सागरी चाच्यांनी त्यांची केलेली ही सर्वात मोठी लूट होती - ह्यावरूनही लुटीचा अंदाज येईल. संभाजी आंग्र्यांना ह्या लुटीने मोठा हात दिला. त्यांची बरीचशी ह्यामुळे कर्जे फिटली.
(एक अशीही गोष्ट सांगतात की, ह्या डर्बी जहाज जिंकल्यावर त्याच्यावरील इंग्लिश तलवारी पाहून त्या केवळ ‘लोणी कापायच्या’ कामाला योग्य आहेत असे उद्गार संभाजी आंग्र्यांनी काढले होते - खरे खोटे इतिहासालाच माहीत!)
इथे विजयदुर्गावर तुरूंगात ठेवलेल्या इंग्रज खलाश्यांचे मात्र हाल झाले. त्यांना शिधा म्हणून फक्त भात आणि पाणी दिले जात असे. आंग्र्यांसमोर आणून त्यांना सतत छळाच्या धमक्या दिल्या जात असत. कॅप्टन ॲन्सेल्मबरोबर पुढे आंग्र्यांनी ओळख वाढवली. डर्बीवरच्या मालाची मोजदाद आणि त्याचा भाव निश्चित करायचे कामही ॲन्सेल्मने केले. पोर्तुगीजांना हा सगळा माल विकायचा आंग्र्यांचा मनसुबा होता. बरेचदा आंग्रे आणि त्याचे सहकारी चक्क लंडनवर हल्ला करून ते बेचिराख करायच्या गप्पा मारत असत - हे ॲन्सेल्मने त्याच्या रिपोर्टसमध्ये लिहून ठेवलेले आहे!
७ नोव्हेंबर १७३६ रोजी मुंबईचा गव्हर्नर जॉन हॉर्नच्या सांगण्यावरून कॅप्टन इंचबर्ड विजयदुर्गावर वाटाघाटींसाठी आला. डर्बीच्या खलाश्यांना सोडवणे हे कामही त्याला सांगितले होते. इथेही त्यांचा एक डाव होता. इंग्रज कैद्यांसाठी म्हणून त्याने काही पत्रं आणली होती. प्रत्येक पत्रात सोन्याच्या पुतळ्या (व्हेनेशियन डुकाट्स) लपवलेल्या होत्या. वेळ पडताच कैद्यांनी आंग्र्यांच्या पहारेकऱ्यांना त्याची लाच द्यावी व तुरूंगातून निसटायची योजना आखावी हा इंचबर्डचा हेतू होता. पण आंग्रे त्यालाही पुरून उरले. त्यांनी ती कैद्यांसाठीची पत्रंही इंचबर्डला आधी उघडायला लावली. त्यातूनही त्यांना ९०० सोन्याच्या पुतळ्यांची ‘लूट’ मिळाली! कैद्यांनी आपले सोने परत मिळावेत म्हणून बऱ्याच विनंत्या केल्या. शेवटी आंग्रे कबूल झाले पण त्यांनी अट घातली की ते चांदीच्या रुपयांत त्या सोन्याची किंमत देतील. चांदीचे रूपये कुठले - तर डर्बीवर लुटलेल्या चांदीचेच आंग्र्यांनी रूपये पाडले आणि कैद्यांना दिले. ह्यांना ‘बंदर राजापूर नाणी’ म्हणतात. मुघल बादशाह मुहम्मदशहाच्या नावाने ही नाणी पाडली गेली. म्हणजे गंमत पहा - चांदी इंग्रजांची - नाणी पाडणार आंग्रे - मुघल बादशहाच्या नावाने - आणि देणार पुन्हा त्याच इंग्रजांना - त्यांच्याकडून जप्त केलेल्या सोन्याच्या मोबदल्यात. ह्यात आंग्र्यांचे नुकसान शून्य होते! ह्यातली काही नाणी आजही पहायला मिळतात. सोबत त्यांचे फोटो देतोय. (डॉ. शैलेन्द्र भांडारे ह्यांनी ह्या विषयावर एक पेपरही पब्लिश केलेला आहे. फोटोही त्यांच्याकडचेच आहेत.)
सुमारे १८ महिने कंपनी सरकारने पत्रव्यवहार आणि वाटाघाटी केल्यावर ॲन्सेल्म आणि बाकी खलाश्यांना सोडवण्यात त्यांना यश आले. कॅप्टन ॲन्सेल्मचे मात्र पुढे फार हाल झाले. १७३८ मध्ये इंग्लंडला परतताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जहाज आणि त्यावरील माल गेल्याने त्याला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आले. लढाई न करता डर्बी जहाज आंग्र्यांना दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. ह्या आगळीकीबद्दल त्याचे पगार आणि पेन्शनही बंद करण्यात आले. त्याने मृत्यूपूर्वी बरेच पत्रव्यवहार - कोर्टकचेऱ्या केल्या पण कसलाही उपयोग झाला नाही. ह्यातल्या एका पत्रांत कॅप्टन ॲन्सेल्म आंग्र्यांबरोबरच्या लढाईचे सखोल वर्णनही करतो. डर्बी जहाजाच्या मूळ शिपिंग लॉगसोबत आजही हे पत्रव्यवहार ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध आहेत - ते कागदही अभ्यासकांसाठी विशेष वाचनीय आहेत.
मित्रवर्य संकेत कुलकर्णी (लंडन)
यांच्या सहयोगाने 🙏🚩

बांडे निशाण.!

 

  बांडे निशाण.!
 
 
आपल्यापैकी अनेकांना अजूनही हे माहित नाही की, संपूर्ण जगाच्या इतिहासात अभिमान बाळगावा अशी राजवट ज्या इंदौरच्या होळकर घराण्याची होती, त्या होळकरांचा "ध्वज" कोणता होता ?
अज्ञानाने आणि अनावधानाने आपण 'पिवळा ध्वज' हाच होळकरांचा किंवा धनगरांचा म्हणून स्विकारतो.
परंतु , इतिहास काही वेगळेच सांगतो.
काय आहे इतिहासातील खरे सत्य ???
💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂💁‍♂
होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर लहानपणी पित्याच्या मृत्युनंतर आपले होळ गांव ( ता.फलटण जि. सातारा) सोडून आई जिवाईसह आपले मामा बारगळ यांचे आश्रयास तळोदे येथे खानदेशात गेले.
भोजराज बारगळ हे पेशव्यांचे सरदार कदमबांडे यांचे सैन्यांत ५० स्वारांसह शिलेदार होते.मल्हारराव यांनी काही वर्षे मेंढपाळ, शेतीमधील कामे करत करत,
घोडेस्वारी व हत्यार (तलवार, बाण, भाला, इत्यादी) चालविण्याचे शिक्षण घेतले. त्यात वाकबगार झाल्यानंतर मामांबरोबर सरदार कदमबांडे यांचे सैन्यांत चाकरी सुरू केली.
उत्तरेकडील एका मोहिमेत मल्हाररावांचा युध्दपराक्रम, चपळाई, साहस, संघटनकौशल्य पाहून थोरले बाजीराव पेशवे खूश झाले. त्यांनी बारगळांकडून 'स्वतंत्र सरदार करतो' म्हणून मल्हारराव यांना आपल्याकडे मागून घेतले.भाच्याचे हित पाहून बारगळांनी त्यास संमती दिली.
सरदार कदमबांडे यांचेकडून पेशव्यांकडे जाण्यापूर्वी मल्हारराव अनुमती घेण्यासाठी कदमबांडे यांचेकडे गेले असता, त्यांचा गौरव करून कदमबांडे म्हणाले, " तुमच्या शौर्यावर आणि गुणांवर आम्ही बेहद्द खुष आहोत. तुमच्या गौरवार्थ तुम्हांस काही भेट द्यावे, असे फार वाटते. आपणांस काही हवे असेल तर नि:संकोच मागा."
यावर मल्हारराव यांनी विनम्रपणे परंतु पराक्रमी व स्वाभिमानी पुरूषास साजेल असे उत्तर दिले.ते म्हणाले, "आपले आशिर्वादच आमच्याठी लाखमोलाची भेटवस्तू आहे. पण याऊपरही स्वामींच्या मनात काही द्यावयाचेच असेल तर, ज्या निशाणा खाली आम्हांस प्रथम तरवार गाजविण्याची आणि शौर्य दाखविण्याची संधी मिळाली,ते आपले निशाण वापरण्याची आम्हांस अनुमती द्यावी.श्री मल्हारी मार्तंड यांना साक्ष ठेवून सांगतो की, या निशाणाचा सन्मान आम्ही कायम उंचावत ठेवू. त्यास कधीही कमीपणा येवू देणार नाही."
मल्हाररावांच्या या उत्तराने अतिशय प्रसन्न मनाने सरदार कदमबांडे यांनी आपल्या देवघरातील चांदीच्या दंडावर असलेले लालपांढरे बांडे निशाण ( बांडे = कदमबांडे यांचे ) ढाल- तलवार, शेला-पागोटे यांसह देवून मल्हारराव यांचा यथोचित सत्कार करून आशिर्वादपूर्वक सन्मानाने रवानगी केली.(इ.स. १७२५)
पुढचा इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. आपल्या आयुष्यात बावन्न युध्दे करून ती सर्व जिंकण्याचा विश्वपराक्रम सुभेदार मल्हाररावांनी केला तो याच बांडे निशाणा खाली.! थोरल्या बाजीराव पेशव्यांनी उत्तर भारतात केलेल्या प्रत्येक स्वारीच्या वेळी आघाडीवर होते ते मल्हारराव होळकर आणि त्यांचे हेच बांडे निशाण.!! एवढेच नव्हे तर रघुनाथराव पेशव्यांच्या
उत्तर भारतावरील स्वारीत अटकेवर विजय मिळवला तेंव्हाही आघाडीवर होते ते मल्हारराव होळकर आणि हेच बांडे निशाण.!!!
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरानंतर राजकारण, धर्मकारण, न्यायकारण, अर्थकारण, जलसंवर्धन, पशु-पक्षी-वृक्ष संवर्धन आणि मानवता यांमध्ये विश्ववंद्य कार्य करणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रजाहितदक्ष गौरवशाली इतिहासाचा (इ.स.१७६७-१७९५)साक्षी होता हाच बांडा ध्वज.!!!
छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर राज्याभिषेक करून घेवून छत्रपती बनलेले (इ.स.१७९७-१८११) एकमेव सिंहासनाधिश्वर महाराज श्रीमंत यशवंतराव होळकरांनी संपूर्ण जगावर राज्य करणा-या ब्रिटीशांना पळता भूई थोडी करून नऊ युध्दांमध्ये नामोहरम केले ते याच लाल-पांढ-या बांड्या निशाणाच्या साक्षीने.!!!
पुढे महाराज यशवंतराव यांची कन्या पहिली भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर यांनी ब्रिटीशांना आव्हान दिले, तेंव्हा त्यांच्या सैन्याच्या अग्रभागी होते ते हेच बांडे निशाण.!!!
होळकर घराण्यातील चौदा राजांच्या जनहितैषी राज्यकारभाराचे २२२वर्षे (इ.स.१७२५-१९९४७) साक्षीदार असणारे हे बांडे निशाण.!
भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा यशवंतराव होळकर (द्वितीय) यांनी इंदौर संस्थान भारतीय संघराज्यात सम्मिलीत करून हे बांडे निशाण भारत सरकारच्या स्वाधीन केले.भारतीय संघराज्यामध्ये प्रमुख संस्थानांच्या काही प्रतिकात्मक बाबींचा समावेश करण्यात आला. होळकर संस्थानच्या जागेवर ( रायसीना भाग ) उभ्या असलेल्या राष्ट्रपती भवनातील भारताच्या तिन्ही सैन्यददलांचे प्रमुख असणा-या राष्ट्रपतीं पथकाचा ध्वज म्हणून बांडे निशाण स्विकारण्यात आले.!!!
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिना निमित्त किंवा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या संचलनामध्ये राष्ट्रपती पथकाबरोबर तुमच्या-माझ्या अभिमानाचा विषय असणारे हे बांडे निशाण दिमाखाने फडकत असते.!
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणारे संचलन अवश्य पहा आणि त्या ध्वजामागील गौरवशाली इतिहास जाणून घ्या व इतरांनाही समजावून सांगा.

Thursday, 25 January 2024

२५ जानेवारी १७०० परंडा किल्ला...

 


२५ जानेवारी १७०० परंडा किल्ला...
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणीपरंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स. ११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे...
देवगिरीच्या यादवांकडून बदामीच्या चालुक्याकडे परंडा गेल्यानंतर गावाला परगण्याचा दर्जा मिळाला. चालुक्यांनी सुरुवातीला छोटीशी किल्लेवजा गढी बांधली होती. पुढे बहामनी सुलतानाकडे परंडा आल्यानंतर दिवाण महंमद ख्वाजा गवान याने इ.स. १४७० च्या आसपास परंड्याचा किल्ला बांधलेला आहे. भुईकोट प्रकारातील परंडा किल्ला हा दक्षिणेतील सत्ताधा-यांसाठी केंद्रस्थानी असून परंडा हे विजापूर, हैदराबाद, सह्याद्री परिसरात जाण्यासाठी मध्य भागी होते मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता तर परंड्याची महसूल वसुली २० लाखांवर होती...
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवांने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. अशारीतीने धनाजींने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही...

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज

 


श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज 
श्रीमंत राजेभोसले वावीकर घराण्यातून दत्तक घेण्यात आलेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे चार विवाह झाले होते. त्यांचा चौथा विवाह भवानजी राजे शिर्के यांची कन्या आनंदीबाई यांच्या सोबत २५ मार्च १७८६ रोजी झाला. त्यांना तीन पुत्र झाले.
१. प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब महाराज
२. रामचंद्र उर्फ भाऊसाहेब महाराज
३. शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा जन्म १८ जानेवारी १७९३ रोजी झाला. त्यांचं जन्मानंतर पेशवाईतून मुक्त होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज धाकटे यांनी १७९८ ला प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आल्याने दुसरा बाजीराव पेशवे याने छत्रपती आणि राजपरिवार यांच्या भोवती फास आवळला. त्यानंतर प्रतापसिंह महाराज, रामचंद्र महाराज, शहाजी महाराज यांना शिक्षण घेण्यास अडचणी येऊ लागल्या. तेच त्यांच्या मातोश्री आनंदीबाई साहेब यांनी रात्री अडीच वाजता आपल्या मुलांना उठवून शिकवून पहाटे पाच वाजता परत झोपवले आणि त्यांना सर्व शास्त्रात पारंगत केले.
छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे ४ मे १८०८ ला दुःखद निधन झाले. छत्रपती शाहू महाराज धाकटे यांच्या मातोश्री सगुणाबाई साहेब यांनी प्रतापसिंह महाराज याना तेरावे दिवशी १६ मे १८०८ ला वयाच्या पंधराव्या वर्षी सिंहासनावर बसवून राज्यारोहण करण्यात आले. त्यांचे वय कमी असल्याने सुरुवातीला स्वराज्याचा कारभार त्यांच्या मातोश्री आनंदीबाई साहेब यांनी पहिला. सन १८१२ नंतर छत्रपती राजघराणे आणि पेशवे यांच्यात तेढ वाढू लागला होता. यातच ९ नोव्हेंबर १८१७ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज याना वासोट्याच्या किल्ल्यावर बंदोबस्तात ठेवले होते. १४ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी पेशवाईच्या विरोधात चालून आले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इंग्रजांशी संधान साधू नये म्हणून बाजीरावाने त्यांना कुटुंब कबिल्यासह सिद्धटेक येथे लष्करी छावणीत बोलावून घेतले आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची प्रचंड फरपट केली. काही दिवसातच बाजीराव छत्रपतींना सोडून पळून गेला. ४ मार्च १८१८ ला
बेलसर येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची इंग्रज अधिकारी यांची भेट झाली. १० मार्च १८१८ ला महाराजांचे साताऱ्यात आगमन झाले. महाराजांचे आगमनाने सातारकर जनता खुश झाली होतो, त्यांनी जागोजागी गुढी उभारून त्यांचेच स्वागत केले. ११ मार्च १८१८ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे पुन्हा राज्यारोहण करण्यात आले.
एल्फिन्स्टनने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना बरीच मदत केली. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या. एप्रिल १८२२ ला स्वराज्याचा संपूर्ण कारभार श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या हाती आला. महाराज हे अतिशय सुसंस्कृत, निर्व्यसनी, उदार, स्पष्ठवक्ते, आणि अतिशय मानी होते. आपण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता.
राज्याची उत्तम व्यवस्था -
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सातारा शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा सुरू केली आणि त्या शाळेमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती. महाराजांना वाचनाची आवड असल्याने त्यांनी स्वतःचे ग्रंथालय देखील सुरु केले होते.
व्यापाऱ्यांनी सातारा राजधानीत येऊन व्यापार करावा म्हणू राजपथ बांधून त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्यासाठी १९ विहिरी, पाण्याचे हौद बांधून नव्या पेठा वसवल्या. १८२२ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराजांनी स्वतःच्या आर्थिक खर्चात कपात करून तात्काळ १ लाख रुपये उपलब्ध करून दिले. वेठबिगारी बंद करून गोहत्या बंदी कायदा स्वराज्यात लागू केला.
सन १८२६ मध्ये एल्फिन्स्टनने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची भेट घेतली आणि लिहून ठेवले" मराठ्यांचे कुळात प्रतापसिंहाइतका सुसंस्कृत पुरुष दुसरा मला आढळला नाही. त्याने राज्यात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली असून रस्ते, पूल, पाण्याची टाकी अशा सोयी जागोजागी निर्माण करून लोकसुखासाठी तो सारखा झटत आहे." ६ ऑक्टोबर १८३३ ला गव्हर्नर लॉर्ड क्लेअर याने महाराजांची भेट घेतली अन लिहून ठेविलें "लोकांस विद्यादान देण्याची प्रतापसिंहास मोठी हौस असून त्याने साताऱ्यास पाठशाळा घातली आहे. त्यात इंग्लिश , पारशी, मराठी या भासग शिकवल्या जातात." जॉन ब्रिग्ज म्हणतो "महाराजांचे पोलीस दल कोणत्याही बाबतीत आमच्यापेक्षा कमी नाही." महाराजांनी साताऱ्यात दोन तुरुंगही बांधले होते. न्यायालयांची स्थापना करून अनेकदा महाराज स्वतः न्यायदानास बसत असत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण महाराजांनीच विकसित केले होते. महाराजांनी सातारा ते महाबळेश्वर पुढे प्रतापगड आणि नंतर महाड पर्यंत रस्ता तयार केला. मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम हे महाबळेश्वर येथे आल्यावर महराजनी तिथे पेठ वसवली. खरं तर या सर जॉन मॅल्कम यांची इच्छा होती की त्या पेठेला छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे नाव द्यायचे पण महाराजांनी याला आदरपूर्वक नकार दिला. पुणे सातारा हा देखील मार्ग महाराजांनी तयार करवून घेतला.
सन १८२८-२९ मध्ये छत्रपतींना क्षत्रियकुलावंतस म्हणण्यास नकार देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी २४ मुद्दे निश्चित करून त्यावर चर्चा करण्यासाठी धर्म परिषद बोलावली. परिषदेच्या निर्णयाच्या दिवशी अनुचित प्रकट टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. स्वतः महाराज परिषदेच्या बाहेर तलवार घेऊन उभे होते. धर्म परिषदने क्षत्रियांचे अस्तित्व मान्य करून त्यांचे अधिकार मान्य केले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांना आपले मराठा राज्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्याविरुद्ध सारखीच कटकारस्थाने चालू होती. विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. ब्रिटिशांचा हस्तक बाळाजीपंत नातू याने बाजीरावांचा बीमोड करून मराठा राज्य इंग्रजांच्या घशात घालण्यासाठी केवळ स्वार्थापोटी अनेक कारस्थाने करून इंग्रजांना मदत केली होती. छत्रपतींनी राजद्रोहाचा आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला.शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ श्रीमंत आप्पासाहेब महाराज (शहाजी) यास छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) छत्रपती प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. छत्रपती प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते.
काशी मुक्कामी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सेनापती बळवंतराव राजेभोसले वावीकर यांचे चिरंजीव त्रिंबकजी याना दत्तक घेतले. त्यांचे नाव बदलून त्यांना शहाजी उर्फ शाहू हे नवीन नाव देण्यात आले. त्यांनाच जंगली महाराज या नावाने ओळखले जाते. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे स्थानबद्धतेत दुःखद निधन झाले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्यकाळात त्यांना सेनापती बळवंतराव राजेभोसले वावीकर यांनी प्रचंड साथ दिली. गोविंदराव दिवाण, यशवंतराव शिर्के, रंगो बापूजी, शेडगावकर आणि हिंगणीकर राजेभोसले तसेच दिनकरराव मोहिते हंबीरराव, बळवंतराव चिटणीस, रघुनाथराव गुजर, तारळेकर राजे महाडिक आणि इतरही जुन्या नामवंत छत्रपतींचा इमान राखणाऱ्या सरदार मंडळींनी एकमेकांना स्वराज्याच्या कामी पूर्ण साहाय्य केले.
अशा सुसंस्कृत, लोकाभिमुख कार्य करणाऱ्या, लोकहितवादी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना आज जयंती दिनी त्रिवार मनाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन
© श्रीमंत राजेभोसले वावीकर

श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज :

 

श्रीमंत छत्रपती शाहू (शहाजी) उर्फ जंगली महाराज :
लेखन ::© श्रीमंत खेळोजी विठोजी राजे भोसले प्रतिष्ठान, वावी



 
 
हे जंगली महाराज अध्यात्मिक क्षेत्रातील नावाजलेले जंगली महाराज नाहीत. तर श्रीमंत जंगली महाराज म्हणजे स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू, स्वराज्यासाठी, छत्रपतींसाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले वावीकर यांचे नातू . श्रीमंत चतुरसिंग राजे भोसले यांचा वारसा समर्थपणे चालवणारे स्वराज्याचे सेनापती श्रीमंत बळवंतराव राजे भोसले यांचे चिरंजीव.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी ७ डिसेंबर १८३९ ला काशीला प्रयाण केले. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन महाराणी, कन्या गोजराबाई साहेब, श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती, त्यांची पत्नी गुणवंताबाई साहेब , सेनापतीचे काका - श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे लहान बंधू श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर, महाराजांना मानणारे सर्व आप्तेष्ठ होते. या प्रवासात खान्देशात सांगवी मुक्कामी १२ जानेवारी १८४० रोजी श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांची पत्नी गुणवंताबाई साहेब प्रसूत होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्रिंबकजी असे ठेवण्यात आले. जंगलात जन्म झाल्याने त्यांना जंगली महाराज हे नाव पडले. त्यांच्या जन्माचा कुठला उत्सव तर सोडा साधा आराम सुद्धा न करू देता इंग्रज अधिकाऱ्याने भोयांना पालखी उचलण्याचा इशारा केला. पालख्या काशीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती यांना ताप येऊ लागला होता. इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्यावर कुठलाही औषधोपचार करू दिला नाही. ज्वर वाढत गेला. मुलगा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांनी २७ जानेवारी १८४० ला स्वराज्याचे सेनापती आपल्या तान्ह्या मुलाला परकं करून, गुणवंताबाई साहेब यांना विधवा करून इहलोकी गेले. मध्य प्रदेशातील महू जवळील तिकुराई येथे स्वराज्याच्या सेनापतींचे श्रीमंत बळवंतराव राजे सेनापती उर्फ बाळासाहेब सेनापती यांचे निधन झाले. प्रबोधनकार ठाकरे आपल्या रंगो बापूजी आणि प्रतापसिंह महाराज या पुस्तकात बाळासाहेब सेनापती यांचे निधन आमांशाने म्हणजे अतिसाराने झाले आहे असं मांडले आहे.
२५ मार्च १८४० ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे सर्व लवाजम्यासह काशी नगरीत आगमन झाले. ऑक्टोबर १८४५ मध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी जंगली महाराज उर्फ त्रिंबकजी राजे यांना मेजर कारपेण्टरच्या समक्ष विधीपुर्वक दत्तक घेतले.१० आॕक्टोबर १८४५ च्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी मृत्युपत्रात लिहले की,” माझ्या दोन्ही राण्यांना पुत्र झाला नाही. सबब आमच्या हिंदुधर्माप्रमाणे मी माझे आप्त कै. बळवंतराव राजे भोसले यांचा पुत्र त्रिंबकजी राजेभोसले यास विधीपुर्वक दत्तक घेऊन त्याचे नाव शाहाजी असे ठेवले आहे. सदरहु त्रिंबकजी याच्या मातोश्री गुणवंताबाई हिची या दत्तक विधानाला संमती असुन तीला दुसरा मुलगा दत्तक घेण्याची आम्ही परवानगी दिलेली आहे. माझ्या मागे माझ्या राज्याचा खाजगी आणि सरकारी खजिना नि मालमत्तेचा, माझ्या पदव्यांचा आणि मी उपभोगलेल्या सर्व अधिकारांचा आणि सत्तेचा त्रिंबकजी हा कायदेशिर वारस समजण्यात यावा. विलायतेतल्या मोकादम्याचा निकाल माझ्या हयातीत लागला तर ठिकच. न लागल्यास तो आमचे दत्तकपुत्र शाहाजीराजे यांच्या नावाने पुढे चालवावा आणि ब्रिटीश सरकारने त्यांना न्याय द्यावा.” (मराठी रियासतीमध्ये दत्तकविधानाची तारीख २५ जानेवारी १८४७ आहे. )
त्रिंबकजी राजे यांचेच नाव शहाजी उर्फ शाहू महाराज झाले. या दत्तकविधानानंतर लगेचच गुणवंताबाई साहेब यांनी संताजी राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव तात्याबा यांस दत्तक घेऊन त्याचे नाव दुर्गासिंह ठेवले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्यांना दुर्गासिंह सेनापती असे संबोधले. त्यासोबतच श्रीमंत परशराम राजे भोसले वावीकर यांनी जानराव राजेभोसले शेडगावकर यांचे कनिष्ठ चिरंजीव जिजाबा यांस दत्तक घेतले.
दत्तकविधानानंतर काही दिवसांनी १४ ऑक्टोबर १८४७ ला स्वराज्याचे धनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दुःखद निधन झाले. महाराजांच्या निधनानंतर त्यांची कन्या गोजराबाईसाहेब यशवंतराव गुजर १३ जानेवारी १८५० ला साताऱ्यात आल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी ३० ऑगस्ट १८५३ ला त्यांचे दुःखद निधन झाले.
इसवी सन १८५४ मध्ये श्रीमंत जंगली महाराज, त्यांच्या मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांचे कृष्णा नदीच्या तीरावर मौजे आरले येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मातोश्री सगुणाबाईसाहेब आणि व्यंकोजी राजे हे स्वतः आरले येथे जाऊन त्यांना सातारा शहरात घेऊन आले. आणि जुन्या वाड्यात राहू लागले.
इसवी सन १८५७ च्या सुरुवातीलाच इंग्रजांविरुद्ध जनमानसात असंतोष वाढू लागला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांना पदच्युत करून त्यांची काशीला रवानगी केल्याने सातारकर मंडळी जास्त चिडलेली होती. त्यात छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे चिरंजीव छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज साताऱ्यात आल्याने सातारकर मंडळीत उत्साह संचारला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांची बाजू इंग्लंड मध्ये मांडणारे रंगो बापूजी हेही साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्या वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. इंग्रज अधिकाऱ्यास ठार मारणार असल्याची बातमी साताऱ्यात पसरली. एके दिवशी छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि दुर्गासिंह सेनापती यांचे घोडे रात्रभर जीन घालून वाड्यापुढे सज्ज असल्याचे आढळले. साताऱ्यात इंग्रजांविरुद्ध उठाठेवी वाढू लागल्या होत्या. जुलै महिन्यात इंग्रजांनी धरपकड चालू केली. ८ सप्टेंबर १८५७ ला रंगो मापूजी यांच्या मुलाला पकडून फाशी देण्यात आली. त्यापूर्वीच ६ ऑगस्ट १८५७ ला छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज, त्यांचे चुलते काकासाहेब, मातोश्री राजसबाईसाहेब, जनकमता गुणवंताबाई, दुर्गासिंह सेनापती यांना अटक करून मुंबई येथे बूचर बेटावर अलग अलग ठेवण्यात आले. डिसेंबर १८५७ ला Mr. Rose हे बूचर बेटावर जाऊन त्यांनी महाराजांना कारस्थानाचा कबुली देण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज अथवा इतर कुणीही कबुली दिली नाही.
मार्च १८५८ ला त्यांना कराचीला पाठवण्यात आले. त्यांना एकमेकांना भेटूही दिले जात नव्हते. त्यानंतर इतरांना काही काळानंतर सोडण्यात आले. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब याना जुलै १८८५ मध्ये सोडण्यात आले. परत आल्यांनतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज आपल्या पत्नी समवेत पुण्यातील भवानी पेठेत घर क्र ५४३ येथे राहू लागले. तिथेच त्यांनी १ जून १८९२ ला आपला देह ठेवला. महाराजांनी त्यांच्या हयातीत ब्राम्हो समाजाची दीक्षा घेतली असल्याने त्यांचा अंत्यविधी त्याच पंथानुसार करण्यात आला.
आजही छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांची समाधी पुण्यातील भवानी पेठेत आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे लहान बंधू यांचे देखील नाव श्रीमंत छत्रपती शाहजी महाराज असल्याने गफलत करू नये. दोघांचा कार्यकाळ वेगळा आहे.
आजच्या १८४ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा ...!
फोटो १. राजमाता जिजाऊ माँसाहेब
२. छत्रपती शाहू महाराज
३. छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज यांच्या भवानी पेठेतील समाधीचा.
४. दत्तकविधानानंतर छत्रपती शहाजी उर्फ शाहू महाराज उर्फ जंगली महाराज आणि त्यांच्यासोबत श्रीमंत दुर्गासिंह सेनापती
© श्रीमंत खेळोजी विठोजी राजे भोसले प्रतिष्ठान, वावी

सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर

 

२५ जानेवारी १६६५...
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक

सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन...
सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न.. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती...
कुठल्याही राज्याच्या सैन्याची मुख्य फळी म्हणजे त्या राज्याचे हेरखाते. मोहिमांच निम्मं यश हे हेरखात्यावरच अवलंबून असते.छत्रपती शिवाजी महाराजांचे हेरखाते हे त्यावेळचे सर्वात उत्तम हेरखाते होते.त्याचे दोन भाग पडतात.पहिले अस्सल गुप्तहेर आणि दुसरे म्हणजे वकील. एखाद्या तिखट नजरेच्या, अत्यंत सावध आणि अत्यंत हुशार माणसाची वकील म्हणून निवड होत. मोहिमेवर असताना परराज्यात बोलणी करण्यासाठी त्यांना पाठवले जात. तेथील बातम्या उत्तमप्रकारे आणण्याची जबाबदारी त्यांना दिलेली असे. महाराजांचे वकील मंडळी असे असत. त्यातलेच एक होते “सोनोपंत विश्वनाथ डबीर”....
● सोनोपंत डबीर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनावलेले खडे बोल :
जेव्हा शाहजीराजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपती शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना...,
“पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजीराजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा....”
राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर ह्यांस विनम्र अभिवादन....🙏🚩

Saturday, 20 January 2024

सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई भोसले

 

सरलष्कर शहाजीराजे भोसले यांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई भोसले🌙🌙
सादर दानपत्र दिल्यानंतर नरसाबाई यांच्या नावावरून एका गावाला नरसांबपूर असे नाव पडले. नरसापूर हे नेमके कोणते याचा उल्लेख नसलातरी राणी नरसाबाई या मुळच्या कर्नाटकातील असून 1637 साली ज्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीत दाखल झाले. तेव्हा त्यांनी नरसाबाईसोबत लग्न केले असावे. उपरोक्त पत्र हे १६८८ सालचे असून नरसाबाई या पुढे बरेच दिवस हयात होत्या. यातील नरसापूर म्हणजे कर्नाटकातील बेंगलोर जिल्ह्यातील नरसापुरा म्हणून ठिकाण आहे ठिकाणी या भागात कोणतं मराठा घराणे नांदले आहे काय याचा शोध भविष्यात घ्यावा लागेल किंवा आजही हे मंडळी तिथे आहेत का याचा शोध भविष्यात घ्यावा लागेल कारण बेंगलोर शहर हे शहाजीराजे महाराज साहेबांचं जहागिरीचे गाव असून याच परिसरातील एखाद्या वतनदार घराण्यातल्या या राणीसाहेब असाव्यात असा एक अंदाज आहे पण तत्कालीन कालखंडात कोणतं मराठा घराणे या ठिकाणी होऊन गेलं याबद्दल मराठ्यांच्या इतिहासातील कागदपत्र अजिबात बोलत नाहीत हे दुर्दैव! !
सरलस्कर शहाजीराजे भोसले व राणीसाहेब नसराबाई यांचा विवाह कधी झाला याबद्दल काही उल्लेख नाही तसेच औरंगजेबाच्या आगमनानंतर संभाजीराजे आल्यानंतर या परिसरात येऊन गेल्याचे बेंगलोर व आदी परिसरात लष्करी तर असल्याचेही उल्लेख आढळतो तसेच तसेच सादर पत्रातून संताजी राजे यांचा उल्लेख सापडतो संताजी राजे हे शहाजी महाराजांचे पुत्र होते आणि नसराबाई या त्यांच्या विवाहित तिसऱ्या पत्नी होत्या याबद्दल उल्लेख वरील पत्रात स्पष्ट दिला आहे यामुळे 91 कलमी बखरीत दिलेल्या नसराबाई या सरलष्कर शहाजीराजे भोसले महाराजांच्या रक्षा पत्नी होत्या याबद्दल मुद्दा या ठिकाणी खोडून निघतो तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या सोबत कैदेत असलेले रायभानजी काका भोसले यांचा उल्लेख पुढे सातारा दरबारात आल्यानंतर रायभानेकाका भोसले हाच सापडतो कारण छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या पत्रातून त्यांचा उल्लेख रायभान काका असाच येतो त्याअर्थे रायभान राजे भोसले हे कोण होते हे सांगण्याची मुळीच गरज नाही फक्त ते शहाजीराजांच्या कोणत्या पत्नीपासून जन्माला आले किंवा वंश होता याबद्दल माहिती उपलब्ध होत नाही कारण छत्रपती शाहू महाराजांचा येसूबाई यांच्या सह चाळीस मंडळी कैदीत होती जुल्फिकर खान याच्या कैदेत सापडलेल्या तंजावर येथील राजघराण्यातील मंडळींपैकी रायभानराजे काका भोसले हे एक होते औरंगजेबाने रायभानराजे काका भोसले यांची नियुक्ती छत्रपती शाहू महाराज यांच्या कारभारी म्हणून केली होती याबद्दल मोगल दरबारच्या कागदपत्रे नोंद आहे व त्यानंतर त्या घराण्यातील वंशाचे काय झालं याबद्दल ही काही लिहिलं आणि बोललं जात नाही किंवा आज त्यांचा वंश कुठे आहे याबद्दलही काही सांगितलं जात नाही तसेच जिंती येथील थोरले संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या सुनबाई व उमाजी राजे भोसले यांच्या पत्नी मकाऊ राणी सरकार पाटलीण या कनार्टकातून येऊन येऊन मासाहेब जिजाऊ साहेबांच्या याच्या वतनने जिंती गावात स्थायिक झाल्या पण आज घडीला त्या घराण्या कडेही कागदपत्रे किंवा कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे या राणीसाहेब कोण व रायभान काका भोसले, नरसाबाई राणी सरकार याबद्दल कागद बोलत नाहीत तसेच तंजावर येथील छत्रपती घराण्यातील वंशजांनी याबद्दल पुढाकार घेऊन मराठ्यांच्या तंजावर छत्रपती दप्तरात उपलब्ध असलेल्या कागदपत्रातून भविष्यात खरी इतिहास बाहेर पडले वरील उल्लेख केलेला बहुतेक चारही गाव हे त्याचा मराठ्यांचा इतिहासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंदवी स्वराज्याची संबंध आहे व या भागात मराठ्यांची लष्करी हालचाली तसेच छत्रपती घराण्यातील संबंधित घराण्याचं वास्तव्य झालेला आहे पण नरसा बाई या कर्नाटकातील होतय याबद्दल दुमत नाही फक्त या कोणत्या घराण्यातील होत्या व त्यांचे मूळ गाव कोणतं याबद्दल संशोधनास वाव आहे जर याबद्दल काही उल्लेख माहिती असल्यास आवश्यक कळवावा सादर दानपत्र
🔥🔥 " राजेश्री शहाशहाजीराजे भोसले यांची स्त्री राजेश्री
संतोजी राजियाची माता राजेश्री नसराबाई 🔥🔥
हे उल्लेख संताजी राजे हे शहाजी महाराजांचे व नरसुबाई या शहाजी महाराजांच्या पत्नी होत्या हे सांगण्यास पुरस आहे
🙏🏼🙏🏼
राजश्री नरसाबाईंनी हे दानपत्र अरवी गावात रहाणारे बाळंभट रामेश्वर प्रभाकर भट उपाध्ये. यांना दिले आहे.
तोरपाडी या गावाचे नाव बदलून ते नरसांबापूर असे केले आहे.
तोरपाडी ( नवीन नाव नरसांबापूर ) हे गाव तर्फे तायणूर गावाच्या पूर्वेस, इकोणा गावाच्या पश्चिमेस , मांबट गावाच्या दक्षिणेस व पुदपट गावाच्या उत्तरेस आहे.
या गावाचा परगणा बेंटवाल व प्रांत त्रिणमल आहे. असा सर्व उल्लेख पत्रात आहे, थर २२जानेवारी १६८८या तारीखाचे सादर दानपत्र दिले आहे तसेच नरसाबाई यांनी आरवी येथील भट उपाध्ये यांनी दानपत्र दिले या अर्थाने त्याच्या महाराष्ट्र तील जडणघडणीशी संबंध आले आहे व सरलष्कर शहाजीराजे भोसले महाराज च्या सोबत जो मराठा सरदार बंगलोर येथे गेले त्यापैकी एखाद्या घराण्यातील असावीत ❓
सदर पत्राच्या शेवटी संस्कृत श्लोक असून पत्राच्या वरील बाजूस फारशी शिक्का आहे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष झिपरे ९०४९७६०८८८
🙏🏼🙏🏼बेंगलोर म्हैसूर आणि कोल्हार भागातील कोणी इतिहास प्रेमी मराठा बांधव असतील तर संपर्क करावा कारण भविष्यात या ठिकाणी भेट देऊन इतिहासाची नव्याने माहिती व संशोधन करण्यास आम्हा सहकार्य होईल सोबत खाली नंबर देत आहोत

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...