विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 January 2024

२५ जानेवारी १७०० परंडा किल्ला...

 


२५ जानेवारी १७०० परंडा किल्ला...
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणीपरंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व पलिखंड आढळतो त्यानुसार पलांडा, परिंडा ते परंडा असे नामांतर झाले असावे. धारवाड जिल्ह्यातील होन्नती गावातील इ.स. ११२४ च्या शिलालेखात पलिखंड नावाचा उल्लेख असून येथे सिंघनदेवाची सत्ता असल्याचे म्हटले आहे...
देवगिरीच्या यादवांकडून बदामीच्या चालुक्याकडे परंडा गेल्यानंतर गावाला परगण्याचा दर्जा मिळाला. चालुक्यांनी सुरुवातीला छोटीशी किल्लेवजा गढी बांधली होती. पुढे बहामनी सुलतानाकडे परंडा आल्यानंतर दिवाण महंमद ख्वाजा गवान याने इ.स. १४७० च्या आसपास परंड्याचा किल्ला बांधलेला आहे. भुईकोट प्रकारातील परंडा किल्ला हा दक्षिणेतील सत्ताधा-यांसाठी केंद्रस्थानी असून परंडा हे विजापूर, हैदराबाद, सह्याद्री परिसरात जाण्यासाठी मध्य भागी होते मुनिमखान औरंगाबादीच्या एका पत्रानुसार मोगल काळात परंडा जिल्ह्यात १९ तालुके व ६२१ गावांचा समावेश होता तर परंड्याची महसूल वसुली २० लाखांवर होती...
१६८१ नंतर १७०७ म्हणजे मृत्यूपर्यंत औरंगजेब दक्षिणेतच राहिल्यामुळे उत्तरेकडील जमा होणा-या महसुलाचा पैसा विजापूर, सोलापूर, हैदराबाद, कोल्हापूर परिसरात जाताना तो परंड्याहून व्यवस्था लावल्याशिवाय जात नव्हता असेच एकदा परंड्याहून निघालेला खजिना सेनापती धनाजी जाधवांने २५ जानेवारी १७०० मध्ये परंड्याजवळील उंदरगाव या ठिकाणी लुटून फस्त केला होता. अशारीतीने धनाजींने वारंवार परंडा परिसरात धुमाकूळ घातल्याची नोंद सापडते एवढेच नाही तर शिवरायांचे कनिष्ठ चिरंजीव छत्रपती राजारामांनीही परंडा किल्ल्याच्या परिसरात धुमाकूळ घातल्याने मराठ्यांच्या छत्रपतींचे पाय परंड्याला लागले म्हणायला हरकत नाही...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...