गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला !!
गोपाला, गोपाला, देवकीनंदन गोपाला !! हा गजर ऐकला की आमच्या पुढे उभे राहतात फक्त संत गाडगेबाबा. अंगावर चिंध्याचे वस्त्र पांघरलेले, हातात खराटा व गाडगे घेतलेले, मातीच्या गाडग्यासारखे जीवन क्षणभंगूर असले तरी असंख्य ठिगळाप्रमाणे ते विविध अंगानी जगता येते असा स्वच्छ जीवनादर्श ठेवणारे निष्काम कर्मयोगी ..!!
महाराष्ट्रात साधुसंताची महान परंपरा असली तरी गाडगेबाबांचे कार्य आगळेवेगळे व ठाशीव आहे. संत गाडगेबाबांनी स्वतःला शब्दजंजाळात अडकविणे शक्य नसल्याने सेवाधर्म अंगी बाळगून धर्मशाळा, वृद्धाश्रम, गोरक्षण, शाळा, महाविद्यालये सदावर्त काढून लोकोपयोगी कार्य केले. जनजागृती केली, कीर्तनातून जनमानस जिंकून उपदेश करीत असतानाच शिक्षण, आरोग्यसोयी व कुप्रथा, कर्मकांडाच्या विरोधात उभे राहून व्यापक संदर्भात समाजसेवेचा मार्ग चोखाळला. संत गाडगेबाबांनी गरिबीचे चटके उपभोगले होते. आत्मनिरक्षणातून वाईट चालीरीतींचा अभ्यास व अवलोकन करून तो समाजापर्यंत पोहचवितांना अज्ञान, निरक्षरता पुसून काढण्यासाठी शाळांचे महत्व विशद केले. शाळा व महाविद्यालये काढण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्वावलंबन व श्रमाचे महत्व विद्यार्थ्यांत पटवून दिले. संत गाडगेबाबांच्या वसतिगृहातून मुले स्वतः काम करून शिकत असत. शिका-शिकवा आणि कमवा व शिका याचा वस्तुपाठ त्यांनी जनतेपुढे ठेवलेला होता.
संत गाडगेबाबा निरक्षर होते. शिकायच्या वयात त्यांना गुराखी नांगरगवठ्या म्हणून गाई-बैलांच्या पाठीमागे जावे लागले. शेतीची सर्व कामे करावी लागली. उत्तम शेती करतानाच भजनाचा छंद, परमेश्वराचा ध्यास लागला. ते नित्यनेमाने गांवाजवळील महादेवाच्या पिंडीजवळ जाऊन आंतरिक भावनांना वाट मोकळी करून देत. मुदगलेश्वरांवर बाबांची श्रद्धा होती म्हणूनच त्यांनी ऋणमोचनचा उद्धार केला. दारुपायी व खोट्या मानापमानामुळे वडील व मामाचा अंत झाला हे बाबांनी पाहिले होते. तरुणपणी त्यांनी ह्याचा अनुभव घेतला. हजारो ग्रंथात मिळणार नाही असे ज्ञान भ्रमंतीने संपादन करून मनुष्य स्वभावाचे बारकावे त्यांनी ओळखले. सामाजिक समस्यांचे चिंतन केल्याने मन प्रगल्भ बनले. संत गाडगेबाबांनी उद्योगाला पुरुषार्थाचे साधन मानून आंतरिक शक्तीवर विजय मिळविला.
संत गाडगेबाबांचा देव देवळात कधीच नव्हता. जनताजनार्दन आणि कर्मवादी लोकांत त्यांनी देव पाहिला. भुकेल्याला अन्न देणारा व तहानलेल्यांना पाणी पाजणारा, नग्न असलेल्यास वस्त्र देणाऱ्याला ते देव मानीत. माणसामाणसातील प्रेम, सहानुभूती, वर्गविहिन जातिमुक्त, समाजव्यवस्था, हुंडाविरोध, कर्जमुक्ती, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, भूतदया, ईश्वरांवर श्रद्धा, वृक्षलागवड अशी समाजोपयोगी कार्य करण्याची तळमळ ही संत गाडगेबाबांची देवकल्पना होती.
सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्ती-विकास साधण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे शिक्षण व्हावे असे संत गाडगेबाबांना वाटे. समाज दुबळा होण्याचे मुख्य कारण अविद्या असल्याचे त्यांनी ओळखले. शिक्षणामुळे मानवी विकास होतांना त्यांनी पाहिले. म्हणूनच शिक्षणप्रसार हा जनसेवेचा मार्ग गाडगेबाबांनी चोखाळला. तत्कालीन समाजाच्या पारंपारिक रुढीचे थैमान थोपविण्यासाठी शिक्षणाबरोबरच मानव जातीच्या हिताचा विचार केला. दुष्ट रुढीतून मुक्तीसाठी आपल्या रांगडी मराठी भाषेत उपदेश देण्याचे कार्य सुरु केले. त्यांना यासाठी विविध अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.
संत गाडगेबाबांच्या डोक्यावर नेहमी खापराचा तुकडा असे. त्याचा उपयोग जेवणासाठी व डोक्यावर सावली करण्यासाठी ते करीत म्हणून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. महाराष्ट्रात बाबांना विविध प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाई. सातारा गोकर्णाकडे त्यांना चिंधेबुवा म्हणत, तर नागपूर मध्यप्रांतात खराटेबाबा, कोकणात गोधडे महाराज तर वऱ्हाडात डेबुजीबुवा किंवा वट्टीसाधू अशा नावांनी ते परिचित होते. यात त्यांच्या वेशाचा व जातीचा उल्लेख प्रामुख्याने दिसून येतो. फाटकी घोंगडी, फाटके कपडे हीच बाबांची संपत्ती होती. ते पूर्णतः निसंग, निरहंकारी, निर्मोही असंग्रहीवृत्तीचे असल्याने स्वतःचा संसार न करता जनतेचा प्रपंच उभारला. या लोकोत्तर पुरुषाच्या सवयी अगदी साध्या होत्या. वागणे मोठे सावध व वृत्ती कमालीची सजग होती. म्हणूनच आजूबाजूच्या जनतेला जवळ करूनही त्यांनी कोणाला गुरु केला नाही आणि माझा कोणी शिष्य नाही अशा वैरागी वृत्तीने ते बोलत व वागत. त्यांच्या वैराग्याने ओथंबलेल्या चेहेऱ्याकडे पाहिले की चरणी नतमस्तक व्हावेसे वाटे.
गाव हे मंदिराप्रमाणे स्वच्छ, पवित्र आणि निर्मळ असावे ही त्याची कळकळ ग्रामसफाईतून दिसून येते. गांवात शिरताच गांजा, दारु विरुद्ध ते गप्पा करू लागत. संत गाडगेबाबा हे अगदी स्पष्टवक्ते होते. कोणाचीही भीड मूर्वत न ठेवता त्यांना न पटणारा विषय तोंडावर बोलायला कमी करीत नसत. ते उत्तम लोकसंग्रहक व संघटक होते. तरीपण एखादा कामचोर अनुयायी असला तर त्याला क्षणात तोडायला त्यांनी कमी केले नाही. ज्यांच्या दारात भाकरी मागत त्यांच्या हातून थोडीशी जरी चुक झाली तरी त्याला खडसावून बोलायला गाडगेबाबा मागेपुढे पहात नसत म्हणूनच त्यांना माणसे जोडायला व तोडायलाही वेळ लागत नसे. त्यांचा प्रभावच असा होता की लोक त्यांच्याकडे येताना त्यांच्या शिकवणुकीचा पाठ गिरवूनच येत असत.
आपल्या प्रबोधनाने गावाच्या कचरा आणि घाणी बरोबर माणसाच्या मेंदूतील अनिष्ठ रूढी आणि परंपरांची घाण काढणारे मानवतावादी आधुनिक संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन संदर्भ - संत गाडगे महाराज, काल आणि कर्तृत्व
- राज
No comments:
Post a Comment