विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 February 2024

उत्तर मराठेशाहीतील शूर,खंदे, महत्वकांक्षी मराठे सेनापती महादजी शिंदे यांचा विश्वासू व हुरहुन्नरी असा सरदार, डी बॉयन ( सेवोयचा सिंदबाद ) भाग १



 

उत्तर मराठेशाहीतील शूर,खंदे, महत्वकांक्षी मराठे सेनापती महादजी शिंदे यांचा विश्वासू व हुरहुन्नरी असा सरदार, डी बॉयन ( सेवोयचा सिंदबाद )
लेखन :संकलन व लेखन:प्रमोद करजगी
सेवोयचा सिंदबाद
भाग १
मित्रानो, आजच्या लेखाच्या विषयाचे नाव आहे "सेवायचा सिंदबाद ".आपल्या लहानपणी आपण सिंदबादच्या सफारीच्या गोष्टी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. सिंदबाद याने आयुष्यात जे साहस केले, अनेक जीवावरच्या संकटाना तोंड दिले, त्याची परिणीती म्ह्णून त्याला यश, मानमतराब व संपत्ती प्राप्त झाली हे आपल्याला माहिती आहे. आज आपण अशाच एका सिंदबादच्या तोडीस तोड असणाऱ्या माणसाची माहिती घेणार आहोत. तत्कालीन काळातील युरोपातील त्याचे नाव आहे "सेवोयचा नबाब"! आपण भारतात अनेक नबाबांची नावे ऐकली असतील, ती नावे आपल्या वाचण्यात आली असतील. उदाहरणार्थ भोपाळचा नबाब, बंगालचा नबाब, शतरंजके खिलाडी या प्रसिद्ध चित्रपटातील अवध संस्थानचा नबाब वगैरे. पण हा सेवोयचा नबाब कुठून आला? महत्वाचे म्हणजे सेवोय हे ठिकाण आपल्या हिंदुस्थानातील नाही तर ते फ्रांस देशात आहे. तर फ्रांस देशात नबाब कसा पैदा झाला असा आपला गोंधळ होणे साहजिकच आहे. अशा एका नबाबाची ही आहे एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी चित्तथरारक कथा !!
सेवायचा हा सिंदबाद म्हणजे आपल्या उत्तर मराठेशाहीतील शूर,खंदे, महत्वकांक्षी मराठे सेनापती महादजी शिंदे यांचा विश्वासू व हुरहुन्नरी असा सरदार, डी बॉयन होय. हा गृहस्थ १७७८मध्ये भारताच्या किनाऱ्यावर दक्षिणेत मद्रास (चेन्नई) येथे उतरला आणि त्यानंतर साधारण दोन दशके तो आपल्या हिंदुस्थानात राहिला, रमला व वाढला. मराठ्यांची पराक्रमी ‘अपराजित’ कवायती सेना शून्यातून निर्माण करण्यामागे डी बॉयन याचे महान योगदान होते.या डी बॉयनची कहाणी एखाद्या सिंदबादच्या सफरी सारखीच चित्तथरारक व मनोरंजक आहे यात शंका नाही.
क्रोस्तोफर रोलसन याने आपल्या एका लेखामध्ये डी बॉयनचे संक्षिप्त शब्दात वर्णन "सेवोयचा नबाब: हिंदुस्थानातील एक साहसी व भाडोत्री योद्धा, शिंदे महाराजांचा सेनापती,ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तूचे संगोपनकर्ता, स्वतःचे जन्मस्थान सेवोयची भरभराट करणारा आणि तसेच तत्कालीन हिंदुस्थानातील ऐतिहासिक कादंबरीचा एक नायक" असे केलेले आहे. डी बॉयन (Benit de Boigne) हा अलिजाबहादूर महादजी शिंदे यांच्या अनेक विश्वासू सेनापतीपैकी एक होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात कवायती फौजेचे बाळकडू मराठ्यांना त्याने दिले असे म्हणावे लागेल. हिंदुस्थानात नशीब काढायला आलेल्या त्या काळातील अनेक युरोपिअन लोकांमध्ये सर्वात प्रसिद्ध, युद्धकलेत अत्यंत तरबेज आणि स्वामिनिष्ठ असा डी बॉयन १७८४ मध्ये अलिजाबहादूर महादजी शिंदे याजकडे नोकरीस लागला व शेवटपर्यंत म्हणजे हिंदुस्थानातील त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत डिसेंबर १७९५ मध्ये युरोपमध्ये आपल्या देशात परत जाईपर्यंत शिंद्यांशी एकनिष्ठ राहिला.
सेवोय चेम्बरीचे एक विहंगम दृश्य
डी बॉयन याचा जन्म व शिक्षण: सेवाय हा फ्रान्समधील पॅरिस शहराच्या आग्नेयेस सुमारे ७०० किलिमीटरवर असलेला एक प्रांत आहे. डी बॉयन हा मुळात फ्रान्स देशाचा रहिवासी होता. त्याचा जन्म फ्रान्समध्ये सेवाय प्रांतांमधील चेम्बरी (Sevoy Chambary) येथे ८ मार्च सन १७५१ मध्ये झाला. लहानपणी त्याचे नांव बेनोईत लेबोन (Benoît Leborgne) असे होते. सेवोयमधील सेंट लेगर या भागात एका सामान्य कुटुंबात लहानशा घरात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील जीन बॅप्टीत्से लेबोने हे मेंढ्यांच्या लोकरीचे व्यापारी होते. त्याचा वडिलांना एकूण १३ अपत्ये झाली त्यापैकी फक्त ५ जगली. डी बॉयन हा लेबोने घरातील एकमेव सदस्य होता ज्याने मोठा झाल्यावर लेबोने हे जुन्या वळणाचे आडनाव त्यजुन डी बॉयन असे त्या काळात उच्चभ्रू भासणारे असे नवीन नाम धारण केले. चेम्बरी येथील रॉयल कॉलेजमध्ये डी बॉयन याने आपले शिक्षण पूर्ण केले, फ्रेंच व इटालियन या भाषेत त्यांनी प्राविण्य संपादन केले होते. त्यानंतर इंग्रजी भाषा शिकण्यासाठी विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्याऐवजी त्यांनी लष्करी शिक्षण घेणे पसंत केले.
लष्करीसेवेचा आरंभ :लष्करी शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने फ्रेंच राजाच्या लष्करात नोकरीस सुरुवात केली. त्यावेळी तो स्वतः फ्रेंच नागरिक नव्हता. फ्रांस देशाचा नागरिक नसताना त्यांनी सुरु केलेली अशी नोकरी त्याला भविष्यात वेगवेगळ्या देशात व संस्कृतीमध्ये नोकरीची संधी मिळवून देण्यास कारणीभूत ठरली व त्यायोगे आज ज्याला आपण जागतिकरण म्हणतो त्याची जणू मुहूर्तमेढ त्याच्याकडून रोवली गेली असे म्हणावे लागेल. डी बॉयन यास दुर्दैवाने स्वतःचा देश सोडून परागंदा व्हावे लागले. त्याला कारण म्हणजे त्या प्रांताच्या त्यावेळेच्या सत्तेतील सारडिनियन अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे काही कारणावरून मतभेद झाले होते. १७६८ मध्ये, वयाच्या केवळ सतराव्या वर्षी त्या वेळच्या फ्रेंच राजाच्या आयरिश ब्रिगेडमध्ये तो शिपाई म्हणून सामील झाला. ही आयरिश ब्रिगेड कंपनी संपूर्ण युरोपमध्ये तिच्या शौर्याबद्दल व शिस्तीबद्दल प्रसिद्ध होती आणि कोठेही, कधीही युद्ध करण्याची त्यांची सदैव तयारी होती. डी बॉयन याने आपल्या युद्धकलेचे प्राथमिक धडे या ब्रिगेडमध्येच गिरविले. काही काळ या नोकरीत गेल्यावर या ठिकाणी डी बॉयन याला त्याच्या योग्यतेनुसार बढती न मिळाल्यामुळे निराश होऊन त्याने १७७२ मध्ये आयरिश ब्रिगेडचा राजीनामा दिला व तो ग्रीकांच्या रेजिमेंटमध्ये कॅप्टन म्हणून रुजू झाला. रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथील कॅथरीन राणीच्या हुकुमतीखाली ही रेजिमेंट होती. रशियाच्या महत्वकांक्षी राणीच्या लष्करी सेवेत असताना त्याला ग्रीस ,तुर्कस्थान, सीरिया व इजिप्त या देशात लढाईसाठी जाण्याची संधी मिळाली. टेनेडोस (Tenedos)च्या लष्करी हल्ल्यात तो तुर्कांच्या कैदेत सापडला. त्याला तुर्कांनी कैद केले व काही जाणकारांच्या मते त्याला ओटोमानची राजधानी काँस्टंटीनोपल (Constantinople) येथे नेले व तेथे गुलाम म्हणून विकले. गुलामगिरीत असताना विहिरीतील पाणी रांधायचे काम करत असताना एका ब्रिटिश उमरावाच्या दृष्टीस तो पडला व त्याने डी बॉयनची गुलामगिरीतून सुटका केली. काही इतिहासकारांच्या मते गुलाम असताना आपल्या मालकाशी गोड बोलून काही पैसे देऊन हुशारीने त्याने आपली गुलामगिरीतून सुटका करून घेतली. नंतर डी बॉयन आपल्या आधीच्या सैन्यात कॅथरीन राणीकडे परतला व तेथे आपल्या पूर्वीच्या रेजिमेंटमध्ये नोकरीस लागला. त्याच्या हुशारीमुळे राणीची त्याच्यावर मर्जी बसली व तिने त्याला काही महिन्यातच मेजरचा हुद्दा दिला.
हिंदुस्थानात आगमन:एक दिवस त्याला राणीकडील नीरस नोकरीचा कंटाळा आला तेव्हा राणीने त्याला ग्रेसिअन अर्चिपिलागो (Grecian archipelago)च्या सफरीवर(cruise)वर पाठवून दिले. तिथे हिंदुस्थानातून नुकत्याच परतलेल्या काही व्यापाऱ्यांशी त्याची गाठ पडली. त्या व्यापाऱ्यांनी हिंदुस्थानचे केलेले वर्णन तसेच तेथील ‘सोन्याच्या धुराच्या‘ कहाण्या ऐकून आपण केव्हा एकदा हिंदुस्थानात जाऊन आपले नशीब काढतो असे त्याला वाटू लागले. तेव्हा हिंदुस्थानात जाण्याचा निश्चय करून जमिनीवरून प्रवास करून भारतात येण्यास तो निघाला. परंतु दुर्दैवाने त्या सुमारास तुर्क आणि पर्शियन सैनिक यांच्यात युद्ध सुरु झाले. त्यामुळे जमिनीच्या मार्गाने हिंदुस्थानात जाण्याचा त्याचा बेत फसला. नंतर अलेप्पो (Aleppo)पासून तो अलेक्झांड्रियाला जहाजाने परत गेला. वाईट नशिबाचा फेरा त्याची पाठ सोडत नव्हते कारण की तिथे नाईल नदीच्या मुखापाशी त्याचे जहाज वाळूत रुतून बसले आणि अरबांनी त्याला कैदी म्हणून आपल्या बरोबर नेले. अरब लोक त्याची गुलाम म्हणून परत विक्री करणार होते, परंतु काही दयाळू अरब लोकांनी स्वतःचे पैसे खर्च करून त्याला कैरो येथे सोडले. हिंदुस्थानात जायचे त्याचे स्वप्न त्याला गप्प बसू देत नव्हते. कैरो येथे त्याला काही जुने मित्र भेटले, त्या मित्रांनी त्याला हिंदुस्थानात मद्रासला जाणाऱ्या जहाजात बसवून देण्यास मदत केली. हिंदुस्थानात जाणाऱ्या जहाजात तो बसला तेव्हा त्याची परिस्थिती एकदम हलाखीची झाली होती. परिस्थितीमुळे अगदी बेजार होऊन कफल्लक अवस्थेत जानेवारी १७७८ मध्ये मद्रासला पोचला. १७७८मध्ये भारतात पाय ठेवलेला डी बॉयन पुढील दोन दशके भारतात राहिला व रमला व आपल्या देशात परतताना मात्र एक यशस्वी श्रीमंत उमराव म्हणून परतला.
तर मित्रांनो, सेवोयचा हा सिंदबाद अशा रीतीने नशिबाचे टक्केटोणपे खात , कधी गुलामगिरीत तर कधी स्वातंत्र्यात दिवस काढत होता, हिंदुस्थानात जाऊन पैसे कमवावेत व नशीब उजळावे असे स्वप्न त्याच्या डोळ्यात सतत तरळत होते. आपल्या स्वप्नभूमीच्या पथावर त्याला कधी तुर्कांनी बंदिवान केले तर कधी अरब लोकांनी ! तरी त्याने हिम्मत न हारता समोर आलेल्या संकटांचा धैर्याने मुकाबला केला. मध्य पूर्वेत आयुष्यातील काही वर्षे व्यतीत केल्याने त्याचा दृष्टिकोन विशाल झाला. भिन्नभिन्न अशा संस्कृतीमध्ये वावरल्याने व त्यांची युद्धनीती आत्मसात केल्याने भारतातील लष्करी अधिकारी म्हणून त्याच्या वेळेस हिंदुस्थानात आलेल्या इतर युरोपिअन लोंकापेक्षा त्याचे भविष्य अधिक उज्ज्वल झाले.
हिंदुस्थानात इंग्रजांकडे एक मामुली शिपाई म्हणून सुरु झालेली त्याची कारकीर्द केवळ दोन दशकात त्याला मराठ्यांच्या कवायती सेनेचा एक जनरल अशा पदापर्यंत घेऊन गेली.पण हा प्रवास सोपा सरळ नव्हता, या प्रवासात त्याला अनेक संकटाना तोंड द्यावे लागले, एका राजापासून दुसऱ्याकडे नोकरीसाठी म्हणून वणवण भटकावे लागले. त्याचा हा मनाला गुंतवून ठेवणारा हिंदुस्थानातील प्रवास आपण पुढील भागात पाहू या ! क्रमशः पुढे चालू!!!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ: A History of Maratha people by C.A.Kincid & D.B.Parasnis, मराठी रियासत खंड ७: गो.स.सरदेसाई, FROM SAVOY TO AGRA: THE CROSS-CULTURAL NARRATIVE OF BENOÎT DE BOIGNE by Christopher Rollason संकलन व लेखन:प्रमोद करजगी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...