विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 February 2024

आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांचा बलिदान दिन : ०३ फेब्रुवारी १८३२

 


आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांचा बलिदान दिन : ०३ फेब्रुवारी १८३२
२३ जून १७५७ रोजी रोबर्ट क्लाईवने बंगालमधील नादिया जिल्ह्यातील प्लासी इथे झालेल्या लढाईत मोगल सुभेदार सिराज उद्दौलाचा पराभव करून भारतात ब्रिटीश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रजांकडे २५०० सैनिक होते तर सिराज उद्दौल्याकडे ४५ हजाराचे सैन्य होते. इंग्रजांच्या फंदफितुरीला सिराज उद्दौल्याचा सेनापती मीर जाफरच बळी पडला होता.त्यामुळे केवळ सात इंग्रजी आणि १६ हिंदुस्थानी अशा तेवीस सैनिकांच्या प्राणांच्या मोबदल्यात इंग्रजांनी प्रचंड सैन्यबळ असलेल्या सिराज उद्दौल्याचा पराभव केला.फंदफितुरिचा फॉरमुला इंग्रजांनी पुढे बरीच वर्षे ह्या देशात वापरून इ.स.१८५० पर्यंत संपूर्ण हिंदुस्थानभर इस्ट इंडिया कंपनीचा एकछत्री आणि निरंकुश अंमल बसविला.असे असले तरी इंग्रजी सत्तेला विविध ठिकाणांहून वैयक्तिक आणि सामुहिक स्वरूपाचे प्रतिकार १७५७ पासूनच होत होते.वैयक्तिक पातळीवर इंग्रजी सत्तेला ललकारणाऱ्या महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांचा आज १९१ वा स्मृतीदिन आहे.त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीची हि पोस्ट.
उमाजी हे रामोशी ह्या आदिवासी जमातीतील* होते. रामोशी हा समाज जात्याच लढवय्या बाण्याचा असल्यामुळे इंग्रजपूर्व काळात गड,किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या कोळी, मांग, महार यासारख्या शूर समाजात रामोशी हे सुद्धा प्रमुख असत. गड,किल्ल्यांच्या सुरक्षेच्या कामासाठी ह्यांना इनामे, वतने दिलेली असत.उमाजी पण अशाच परिवारातील होते. एकोणीसाव्या शतकात इंग्रजी सत्तेचा प्रतिकार करणाऱ्यात मुख्यतः खानदेशातील भिल्ल,मध्य भारतातील गोंड,रामोशी,कोळी,मांग वगैरे मंडळी होती. याशिवाय मराठा साम्राज्याचा भाग असलेल्या आणि तेथील राजघराण्याप्रति निष्ठा असणाऱ्या उच्च जातीतील आणि कुळातील लोकांनी पण इंग्रजी सत्तेचा यथाशक्ती प्रतिकार केला.ह्या मंडळींमध्ये शौर्य,धाडस,ध्येयाप्रती निष्ठा,आदींची कमी नव्हती. तुटपुंजी साधनसामग्री,शिस्तीचा,प्रभावशाली नेतृत्वाचा अभाव आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वकियांकडून इंग्रजांसाठी फंदफितुरी इ.स्वातन्त्रेछू भारतीयांच्या इंग्रज विरोधातील प्रमुख अडथळे होते. तरी पण मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्याचे प्रयत्न कुणी सोडून दिले नाही,उलट मागच्याचे बलिदान,त्याग पुध्च्यांसाठी प्रेरणा,स्फूर्तीचा दीपस्तंभच ठरला.
इ.स.१८२६ पासूनच पुणे जिल्ह्यातील रामोशी इंग्रजांविरुद्ध लढू लागले होते. इंग्रजांनी रामोशांशी प्रथम सामोपचाराचे धोरण ठेवले होते. त्यांना नोकऱ्या व जमिनी देऊन वश करण्याचा प्रयत्न करून पाहिला;पण रामोशी त्याला बधले नाही. उमाजीनी १८२४ मध्ये भाम्बुर्ड्याचा (सध्याचे पुण्यातील शिवाजीनगर) ब्रिटीश खजिना लुटला होता.तेव्हापासून इंग्रज सरकारने त्यांची दरोडेखोर म्हणून नोंद केली. १८२७ नंतर त्यांनी पुणे जिल्हातील गावोगावी इंग्रज धार्जीण्या लोकांवर दरोडे,डाके घालून आपला वचक निर्माण केला. जनतेने इंग्रजांना कर देऊ नये अशा सूचना पण दिल्या.पुणे परिसरात आपला जम बसल्यावर उमाजीनी स्वतःला राजे म्हणून घोषित केले. त्यांनी कोल्हापूरचे छत्रपती, कुलाबेकर आंग्रे, भोरचे पंत सचिव यांच्याशीही संधान बांधण्याचा प्रयत्न केला. उमाजीना सामान्य जनतेकडून पण समर्थन मिळत गेले. परिणामी त्यांना अटक करण्यात इंग्रज अधिकाऱ्यांना यश मिळत नव्हते. इंग्रजांनी उमाजींचा प्रभाव लक्षात घेऊन त्यांच्याशी सामोपचाराचे धोरण अवलंबले. त्यांना पुरंदर किल्ला परिसरातील चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या सेवेत घेतले. उमाजीनी पण आपल्या ध्येयाच्या प्राप्ती मार्गात साहाय्यक होईल म्हणून इंग्रजांचा हा देकार(ऑफर)स्वीकारला. त्यांनी आता कंपनी सरकारच्या कृपा छत्राखालीच आपले बळजबरी धन संकलनाचे कार्य चालू ठेवले. कंपनी सरकारच्या ध्यानात हि गोष्ट आल्यावर त्यांनी उमाजीना नोवेंबर १८३० मध्ये पुणे इथे नजर कैदेत ठेवले पण १६ डिसेंबर रोजी उमाजी कैदेतून निसटले आणि त्यांनी पुन्हा अधिक जोमाने दरोडे, लुट करण्याचे सत्र सुरु केले.पुण्याच्या कलेक्टरने २६ जानेवारी १८३१ रोजी एक जाहीरनामा काढून उमाजीना पकडून देणाऱ्यास दहा हजार रुपयांचे इनाम जाहीर केले.याच्या प्रत्युत्तरात उमाजीनी १६ फेब्रुवारीला जाहीरनामा काढून हिंदुस्थानी राजे,संस्थानिक,जनता यांस, इंग्रजांना ठार मारण्याचे, त्यांची संपत्ती लुटण्याचे आवाहन केले. कंपनी सरकारने कॅप्टन अलेक्झांडर म्यांकीटोश याच्या नेतृत्वाखाली उमाजीना पकडण्यासाठी विशेष पथक नेमले. उमाजी पुणे,सातारा,सांगली,बारामती परिसरात आश्रय घेत होते. एकदा त्यांनी इंग्रजांच्या पाच माणसांचे मुडदे पडून त्यांची मुंडकी पुण्याला कॅप्टन रोबर्टसनकडे पाठवून दिली! आम्ही चोर,दरोडेखोर नसून स्वदेशासाठी लढणारे बंडखोर असल्याचे त्यांनी रोबर्टसनला बजावले.
सहा महिने पाठलाग करूनही उमाजी इंग्रजांच्या हाती लागत नव्हते. अखेरीस इंग्रजांनी आपल्या नेहमीच्या कपट,भेद,प्रलोभन नीतीचा उपयोग करण्याचे ठरविले. पैशाच्या लोभाने वा आपापसातील हेव्यादाव्यामुळे उमाजीं सारख्या शूर माणसांचे जवळचे नातेवायिक किंवा सहकारी इंग्रजांना फितूर होत असत.
इंग्रजांनी भोरच्या संस्थानिक पंत सचिवांना उमाजीना पकडून देण्याकामी मदत करण्याची गळ घातली. त्याकाळी बहुसंख्य हिंदुस्थानी संस्थानिक,बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद वगळता, कमालीचे इंग्रज धार्जिणे होते. पंत सचिवांनी उमाजीस भेटीस बोलावून दगाबाजी करून त्यांना पकडून दिले.( १५ डिसेंबर १८३१) पण उमाजींचा भाऊ भुजाबा नाईकांनी उमाजींची सुटका केली. इंग्रजांनी प्रयत्न चालूच ठेवले. त्यांनी उमाजींची बहिण जिजाई हिला चार गावे इनाम देण्याची आणि तिच्या मुलांना चाकरी व इनाम म्हणून कडीतोडे देण्याची लालूच दाखवून तिला आपल्या बाजूस वश करून घेतले. बहिणीने संक्रांतीच्या दिवशी भावाला जेवायला बोलावले ** आणि इंग्रजांनी डाव साधला.बंधू भुजाबा यांनी उमाजीना सोडण्यासाठी शर्थ केली पण इंग्रजी बळापुढे ते अपुरे पडले. इंग्रजांनी उमाजीना पुण्यातील खडक येथील कचेरीत ३ फेब्रुवारी १८३२ रोजी फाशी दिले.जनतेत दहशत बसविण्यासाठी त्यांचा मृतदेह तीन दिवस तसाच झाडावर ठेवला होता.
उमाजीनी ३० नोवेंबर १८२७ रोजी पुण्यातील इंग्रज अधिकारी कॅप्टन रोबर्टसनला एक खलिता पाठविला होता.त्यात त्यांनी इंग्रजांना इशारा दिला होता कि,सातारचे छत्रपती,पेशवे यांनी आम्हाला दिलेले आमचे सर्व हक्क, अधिकार कायम राहिले पाहिजेत.नाही तर आज एक बंड तुम्हाला दिसत आहे, तशी हजारो बंडे होतील व सर्वत्र पसरतील. उमाजींची भविष्यवाणी त्यांच्या हौतात्म्या नंतर पाव शतकातच-१८५७ मध्ये प्रत्यक्षात उतरली.
उमाजी राजे नाईक यांच्यासारख्या असंख्य,अगणित,ज्ञात,अज्ञात वीरांनी केलेल्या बलिदानाचा भारताची गुलामीतून मुक्तता होण्यात सिंहाचा वाटा आहे.उमाजीना विनम्र अभिवादन.
# प्रकाश लोणकर
संदर्भ: * १-झुंज क्रांतिवीरांची -ले.सुधाकर पाटील
** २-विसाव्या शतकातील महाराष्ट्र-खंड पहिला-१९०१-१९१४- ले. य.दि. फडके

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...