विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 20 March 2024

२८ ऑगस्ट १६६७: मिर्झाराजा जयसिंगचा म्रुत्यु!

 



२८ ऑगस्ट १६६७: मिर्झाराजा जयसिंगचा म्रुत्यु!
यावेळी मिर्झाराजा दख्खनमधुन दिल्लीला परतत होता. वाटेतच त्याचा बुर्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे म्रुत्यु झाला. हा म्रुत्यु संशयास्पद ठरला.
१६६५ मधे दिलेरखानाच्या साथीने स्वराज्यावर आक्रमण करून मिर्झाराजाने शिवाजीराजांना पुरंदरचा तह करणे भाग पाडले. नंतर औरंगजेबाच्या आज्ञेने विजापुरच्या आदिलशाहीवरही आक्रमण केले. मात्र ते दोन वर्षे प्रयत्न करूनही यशस्वी झाले नाही. मधल्या काळात शिवाजीराजांना बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला पाठवण्यात आले. पुढे अनेक घडामोडी होऊन शिवाजीराजे आधी कैदेत पडले व तीन महिन्यांनी अभुतपुर्वरित्या स्वतः ची सुटका करवुन घेतली. मुघलांची नाचक्की झाली. इकडे आदिलशाहिशीही मिर्झाराजा झुंजत होता पण, निर्णायक यश येत नव्हते. आग्र्याला त्याचा मुलगा रामसिंगही अडचणीत सापडला होता. 'सीवा पळुन जाण्यात' रामसिंगचाच हात होता असा आरोप करुन त्याची चौकशी सुरू झाली व नंतर त्याचे परगणे जप्त करण्यात आले व त्याला दरबारात येण्याची मनाई करण्यात आली. यामुळे रामसिंग व जयसिंगाचेही संबंध काहीसे बिघडले. मिर्झाराजा जयसिंगला अपयश व आरोपांमुळे भयंकर निराशा आली होती असे त्याने त्याचा मुन्शी गिरीधरलाल याला व रामसिंगाला पाठवलेल्या पत्रांतुन दिसते. जयसिंगाचे पुर्वज अकबराच्या काळापासुन मुघलांसाठी झिजत होते. हे जयपुर-आमेरचे रजपुत मुघलांचे इतके एकनिष्ठ होतै की, स्वधर्मीय शिवाजीराजांसारख्या वीरांपेक्षा परधर्मीय औरंगजेब बादशहा जयसिंगाला कित्येक पटींनी वंदनीय होता.
जयसिंगाने १६५८ मधे शहाजहान व दारा शुकोहच्या विरोधात औरंगजेबाचा पक्ष उचलुन धरला व सत्तासंघर्षात त्याला साथ दिली. त्यावेळी व पुढेही त्याच्यासाठी सैनिकी व आर्थिक मदत देऊ केली.
मात्र जयसिंगाच्या या स्वामिनिष्ठेचा काय उपयोग झाला?? शेवटी औरंगजेबाने १६६७ मधे जयसिंगाची दख्खनची सुभेदारी काढुन घेतली व त्याला परत बोलावले. त्याच्या जागी शहजादा मुअज्जमची दख्खनमधे पुनर्नियुक्ती करण्यात आली. अशा वैफल्यग्रस्त अवस्थेत परतत असताना मिर्झाराजाचा २८ ऑगस्ट १६६७ या दिवशी वाटेतच म्रुत्यु झाला. मिर्झाराजाचे वय होते ५८. हा म्रुत्यु त्याचा दुसरा मुलगा किरतसिंग याला संशयास्पद वाटला. मिर्झाराजाचा एक अतिशय विश्वासु असा उदयराज नावाचा मुन्शी होता. या मुन्शीनेच आपल्या वडिलांना मारले असा आरोप ठेवून किरतसिंग उदयराजवर ससैन्य चालुन आला. उदयराज घाबरून बुर्हाणपूरच्या मुघल सुभेदाराकडे पळाला व तिथे जाऊन त्याने असा काही जालीम उपाय केला की, किरतसिंगाची त्याला हात लावायची हिंमतच झाली नाही. उदयराजने धर्मांतर केले व तो मुसलमान झाला.
ठोस पुरावा नसला तरी, मिर्झाराजाच्या म्रुत्युमागे औरंगजेबाचा हात असावा असे दिसते कारण, नंतर धर्मांतरित झालेल्या उदयराजचे नवीन नामकरण करण्यात आले 'तालियारखान'!
शिवाय किरतसिंगाने उदयराजवर केलेल्या आरोपामुळेही वस्तुनिष्ठ अंदाज करता येतो.
काहीही असो पण, सुलतान व बादशहांसाठी तलवार गाजवणार्या एतद्देशीय पराक्रमी पण लाचार वीरांशी कसा दगाफटका होऊ शकतो किंवा कशी मानहानी होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिर्झाराजा जयसिंग!!
बुर्हाणपूरातील जयसिंगाची समाधी ही प्रामुख्याने 'राजा की छत्री' या नावाने ओळखली जाते.
संदर्भ: शककर्ते शिवराय

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...