*महत्त्व,अवस्था, निश्चिती आणि जीर्णोद्धार*
लेख व फोटो-प्रवीण भोसले
माझ्या गेल्या काही पोस्टसमधून तुम्हा इतिहासप्रेमींना मराठा स्वराज्य आणि साम्राज्यातील वीरांची शौर्यगाथा आणि समाधीस्थळे याबरोबरच समाधी शोधकार्य आणि जीर्णोद्धार याची थोडीफार माहिती झालेलीच आहे.आजची ही पोस्ट थोडी वेगळी आहे. 'समाधीस्थळे' हा विषय यात उलगडून सांगायचा मी प्रयत्न केलाय.या विषयाला अनेक पैलू आहेत. 'समाधीस्थळ' हा विषय बऱ्यापैकी समजण्यासाठी शेकडो-हजारो समाध्या स्वतः प्रत्यक्ष पाहणे, त्यांचा अनेक अंगांनी अभ्यास करणे, विविध धर्म आणि जातींच्या अंत्यविधींचाअभ्यास करणे, पितर-श्राद्ध-कुलाचार या बाबींची माहिती घेणे, स्वतः जीर्णोद्धार कार्यात सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याच बाबतीत माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखे बरेच काही आहे.'मराठ्यांची धारातीर्थे' या माझ्या ग्रंथातील मनोगतातील काही भाग व इतर लिखाणातील काही भाग,जो या विषयाशी संबंधित आहे, तो इथे मांडतोय.समाध्यांविषयी महत्त्वाची माहिती थोडक्यात द्यायचा प्रयत्न मी या लेखात करतोय.
छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत तर त्यांचे स्वराज्यस्थापनेचे कार्य, पुढील काळात भारतभर झालेला मराठेशाहीचा विस्तार आणि शत्रूसत्तावर असलेला मराठ्यांचा दरारा हे मराठी जनांच्या अभिमानाचे विषय आहेत. जगाच्या इतिहासात अद्वितीय ठरलेला हा इतिहास घडविला तो अतुल पराक्रमी आणि कर्तबगार महाराष्ट्रपुत्रांनी. शिवरायांच्या किल्ल्यांप्रमाणेच अभेद्य निष्ठेने लढलेले पराक्रमी मराठे हे त्या काळातील जणू जिवंत दुर्गच म्हणायला हवेत. मराठ्यांचे किल्ले ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आहेत. हे किल्ले आजही मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगत उभे आहेत. तसेच हा इतिहास घडविणाऱ्या वीरांचे भौतिक अवशेष आजही अस्थिकलशाच्या रुपाने त्यांच्या समाध्यांमध्ये अस्तित्वात आहेत. ही समाधीस्थाने म्हणूनच अत्यंत पवित्र व अमोल अशी आहेत. मराठ्यांचे किल्ले ही 'मराठ्यांची तीर्थक्षेत्रे' तर पराक्रमी मराठ्यांची समाधीस्थाने ही 'मराठ्यांची धारातीर्थे' आहेत.
इ.स.१५९० ते १८७० ह्या कालखंडातील शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांच्यापासून ते ब्रिटीश राजवटीतील वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद साळवे ह्यांच्या पर्यंतच्या काळातील आपला मराठ्यांचा इतिहास हजारो कर्तबगार व्यक्तींनी, वीरांनी घडविलेला आहे. मूळ कुठले व कोण हे वीर? कसे स्वराज्य कार्यात आले ? काय आहे त्यांचे कर्तृत्व? कुठे आणि कशा अवस्थेत आहेत त्यांची समाधीस्थाने? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधताना मी हजारो समाधीस्थळे पाहिली.मराठ्यांच्या तत्कालीन प्रतिस्पर्धी शत्रूसत्तांमधील महत्वाच्या व्यक्तींची समाधीस्थाने, कबरीदेखील पाहिल्या. मराठ्यांनी चारीमुंड्या चित केलेल्या या तत्कालीन शत्रूंच्या समाध्या व कबरी हीदेखील मराठ्यांच्या विजयाची स्मारकेच म्हणायला हवीत.
१९९० साली मी सर्वप्रथम पाहिलेली व दर्शन घेतलेली समाधी म्हणजे रायगडावरील शिवप्रभूंची समाधी. त्याच दिवसापासून शिवरायांचे इतर किल्ले पाहण्याची आणि शिवरायांचे सेनानी, मंत्री, सरदार, मावळे ह्यांच्या चरित्राबद्दल जाणून घेण्याची व त्यांच्याही समाधीस्थानांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा मनात जागी झाली. इथूनच सुरु झाली ह्या वीरांच्या समाधीस्थानांच्या शोधाची व दर्शनाची धारातीर्थयात्रा. गेली तीस वर्षे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर दीड लाखांहून अधिक किलोमीटर्सचा प्रवास करुन ह्या वीराच्या समाधीस्थानांचे त्या स्थळी जाऊन दर्शन घेऊन छायाचित्रे काढली. बहुतांशवेळा मोटरसायकलवरुन एकट्याने प्रवास करीत, ज्या काळात मोबाईल अथवा ए.टी.एम. सारख्या सुविधा आणि इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध नव्हती, त्या काळात अनेक अडचणी पार करुन स्वखर्चाने केलेली ही यात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
तीनशेहून अधिक किल्ले, शेकडो प्राचीन व शिल्पसमृध्द मंदिरे, अनेक गढ्या, वाडे, घाट, पुष्करणी अशी हजारो ऐतिहासिक स्मारके ह्या यात्रेत पाहता व अभ्यासता आली. हजारभर समाधीस्थानांचे दर्शन ह्या यात्रेत झाले.
समाध्या शोधण्याबरोबरच त्या त्या व्यक्तींची माहिती गोळा करणे हेसुद्धा एक मोठेच काम होते. ह्यासाठी अनेक पुस्तकांचा आणि मूळ संदर्भ साहित्याचा संग्रह, त्या व्यक्तींच्या वंशजांकडील माहिती, गावोगावच्या जाणकारांनी दिलेली माहिती, इतिहास विषयातील जाणकारांचे मार्गदर्शन, ह्यातून मोलाची माहिती मिळाली. ग्रंथसंग्रह वाढलाच शिवाय इतर अवांतर विषयाचीही बरीच माहिती जमा झाली. संबंधित व्यक्तींच्या मुद्रा (शिक्के), हस्ताक्षरे,चित्रे, नाणी, शस्त्रे ह्यांचीही माहिती व छायाचित्रे घेता आली. ह्या सर्वांचा समाधीस्थाने व चरित्रे ह्यांच्याबरोबर समावेश करुन प्रथम २००६ साली व अलिकडे २०१९ साली प्रकाशित केलेल्या 'मराठ्यांची धारातीर्थे' ह्या ग्रंथामुळे वाढलेल्या जनसंपर्कातूनही मला खूप महत्वाची माहिती मिळत गेली.
राहत्या गावी आपल्या पूर्वजांची समाधी बांधण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनच परंपरा आहे. त्यासाठी गावाच्या स्मशानभूमीबरोबरच ग्रामदैवताच्या शेजारचे स्थान सर्वात योग्य मानले जाते. शंभूमहादेवाला आपण स्मशानाचा देवदेखील मानतो. याचमुळे बरीच समाधीस्थळे महादेव मंदिराच्या परिसरात आढळतात. मावळात भैरवनाथ,भवानीमाता अशा मंदिराच्या परिसरातही समाध्या असतात. याशिवाय नदी, ओढा, तलाव अशा जलस्थानांशेजारी, नद्यांच्या संगमावर, परिसरातील प्राचीन मंदिराशेजारी अथवा इतर पवित्र ठिकाणीसुद्धा समाध्या बांधल्या जात.अशा परिसरातील देवतांच्या पूजनाबरोबरच समाध्यांचेही पूजन आपोआप केले जाते व ते सोयीचेही ठरते. समाधी बांधताना त्यात मृत व्यक्तींचा अस्थिकलश ठेवण्याची परंपरा आहे. नित्यनैमित्तिक पूजा, पूर्वजांचे स्मरण, कुलाचार व इतर सोयींसाठी या समाध्या बांधल्या जातात.पूर्वजांच्या मृत्यूतिथीला समाधीचे पूजन करून नैवेद्य अर्पण करायची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासूनच आहे. कित्येकदा स्वतःच्या शेतात, घराण्याच्या खाजगी स्मशानभूमीत पूर्वजांच्या समाध्या बांधल्या जातात.
शिवपूर्वकाळापासून म्हणजे इ.स.१६०० पासून ते १८१८ मध्ये मराठी साम्राज्य ब्रिटिशाकडून नष्ट केले जाईपर्यंतच्या काळात मराठेशाहीतील शेकडो कर्तबगार, महत्त्वाच्या व एखाद्या प्रसंगाने प्रसिद्धी पावलेल्या व्यक्ती मरण पावल्या. काही लढायांत, काही वृद्ध
होऊन तर काही आजारपणाने मृत झाल्या. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरसुद्धा गावोगावी,
किल्ल्यांवर, पवित्र ठिकाणी अनेक समाधीस्थाने,स्मृतीशिळा, वीरशिल्पे आहेत. लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या, घराण्याच्या मूळ पुरुषाच्या तसेच विशेष कर्तबगारी दाखवलेल्या व्यक्तींची समाधीस्थाने आवर्जून बांधली जात.कारण अर्थातच त्यांचा त्याग आणि कर्तृत्व. त्यांच्यामुळेच घराण्याचा उत्कर्ष झाल्याने, मान व प्रसिध्दी लाभल्याने ही समाधीस्थळे मोलाची असतात.लढाईत रणांगणावर आलेला मृत्यू त्याकाळी व आजही सर्वश्रेष्ठ समजला जातो.अशा व्यक्तींच्या कर्तबगारीचे स्मरण म्हणून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच परंपरेने चालत आलेली पितृपूजा, कुलाचार, पूजाविधी करण्यासाठी या समाध्या बांधल्या व पूजल्या जात. ह्या समाध्यांमध्ये मृत व्यक्तीच्याअस्थी खापरी किंवा धातूच्या कलशात घालून ठेवतात. या अस्थी आत ठेवलेल्या असल्यानेच त्या पूजनीय व पवित्र बनतात. तसेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या व्यक्तींचे चरित्र समाध्या बांधल्यामुळे व परंपरेने पूजन केल्यामुळे माहिती होत जाते.
इ.स. १६०० पासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा (इ.स. १७०७)हा काळ महाराष्ट्रासाठी अतिशय धामधुमीचा होता. त्यामुळे या काळातील बहुसंख्य समाध्यांना
कागदोपत्री अगदी काटेकोरपणे समाधीची निश्चिती करणारा पुरावा आढळत नाही. तसेच समाधीच्या पूजाअर्चेसाठी कागदोपत्री काही जमीन अथवा इनाम दिले जाण्याच्या
घटना अगदी महत्त्वपूर्ण पदावरील, मोठ्या घराण्यातील तुरळक व्यक्तींच्या बाबतीतच आढळतात. समाध्यांवर माहितीपर लेख कोरल्याची उदाहरणे अगदीच तुरळक आहेत. त्यामुळे ठाम लेखी पुरावा नसलेल्या समाध्यांच्या नावनिश्चितीत अडचण निर्माण होते.अशा अडचणीच्या वेळी त्या व्यक्तींच्या घराण्यातील वंशजांच्या परंपरा, वहिवाट, पूर्वापार चालत आलेली माहिती,परिसरातील लोककथा व त्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रसंगाची व ठिकाणाची कागदपत्रातून आढळणारी त्रोटक माहिती यांच्याआधारेच एखाद्या व्यक्तीचे समाधीस्थान निश्चित करणे भाग पडते.
अनेक मोठ्या घराण्यांची त्यांची वेगळी समाधीस्थानांसाठी ठेवलेली जागा असूनसुद्धा त्या जागेतील समाध्यांपैकी कोणती समाधी कोणाची हे कागदोपत्री पुराव्याअभावी काटेकोरपणे सांगता येत नाही. मुधोळमधील घोरपडेंच्या समाधीस्थानाची जागा, गजेंद्रगडकर घोरपडेंची एकत्रित असणारी समाधीस्थाने, तंजावरच्या राजेभोसले घराण्यातील समाधीस्थाने, साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपतींच्या घराण्यातील समाधीस्थाने इथेही काही समाध्यांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. पण कित्येकदा परंपरेने या समाध्या त्या व्यक्तीच्या नावासह तिच्या मृत्यूतिथीला पूजल्या जात असल्याने कोणती समाधी कोणाची हे ठरवण्यास निश्चित आधार मिळतो. अशाच प्रकारे कित्येक समाध्या निश्चित झालेल्या आहेत.
अनेक अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या समाध्यांना अस्सल लेखी संदर्भ,काटेकोरपणे स्थाननिश्चिती करणारा, मोजमापे नोंदलेला, जवळच्या महत्त्वाच्या ठिकाणांपासून सापेक्ष अंतरे दर्शविणारा कागदोपत्री कायदेशीर पुरावा नाही. या सर्व समाध्या परंपरेने त्या त्या व्यक्तींच्या मानल्या जात आहेत. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील इतिहासात नोंदलेला प्रसंग, मृत्यूचे स्थान,अंत्यसंस्काराचे वर्णन यावरून या समाध्या निश्चित केल्या गेल्या आहेत. याबरोबरच समाधीस्थानाच्या बांधकामावरून त्या कोणत्या काळातील आहेत त्याचाही अंदाज इथे उपयुक्त ठरतो. दगडांचे जुनेपण व बांधकामाची शैली हे यासाठी पूरक पुरावे मानले जातात.जिथे काहीच पुरावा उपलब्ध होत नाही तिथे त्या व्यक्तीच्या वंशजांचे मत निर्णायक मानले पाहिजे.कारण कुठलीही व्यक्ती आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगत असल्याने याबाबतीत त्यांच्याकडून खोटी माहिती दिली जाणे अशक्य आहे.शिवाय पितरांच्या पूजेचा कुलाचार ही धार्मिक बाबदेखील असल्याने यात खोटेपणा संभवत नाही.जिथे असे वंशज अथवा त्यांचे मतही उपलब्ध नाही तिथे ग्रामस्थांची परंपरागत माहिती लक्षात घेतली पाहिजे.
शिवकाळापासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या कालखंडातील महाराष्ट्रातील
अत्यंत धामधुमीचा, सतत लढ्यांचा, सतत होणाऱ्या सत्ताबदलाचा, अनिश्चितपणाचा, अस्वस्थतेचा काळ लक्षात घेतला तर या काळातील समाध्यासंबंधी असलेला कागदोपत्री कायदेशीर पुराव्याचा अभाव व कमतरता समर्थनीय ठरते. या काळात मोजमापांसह, दिशांसह, नजीकच्या ठिकाणापासून सापेक्ष अंतरांसह वर्णन आढळणे अवघड आहे.तसेच या धामधुमीत व पुढील काळातील दुर्लक्षामुळे अनेक घराण्यातील ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे फार मोठ्या संख्येने नष्ट झालेली आहेत. जिवाची शाश्वती नसलेल्या या काळात इतिहास लिहून ठेवणे आणि लिहिलेल्या
कागदपत्रांची जपणूक होणे अगदीच अवघड होते.जी कागदपत्रे राहिली ती बऱ्याच घराण्यांनी संशोधकांना आपल्या घराण्याचा इतिहास उजेडात येईल या अपेक्षेने दिली. यातील किती कागदपत्रे विविध दप्तरखान्यात या संशोधकांनी जमा केली आणि किती स्वतःच्या खाजगी संग्रहात ठेवली हा एक संशोधनाचा विषय आहे. आजही अनेक घराणी ही कागदपत्रे प्रकाशित होण्याची वाट पहात आहेत.एक मात्र नक्की अस्सल कागद घरातून बाहेर जाऊ न देता त्यांच्या आमच्या समोर,आमच्या घरातच नकला करुन घ्या अशी अट संशोधकांना अशा घराण्यांनी घातली असती तर आज ही हळहळण्याची वेळ आली नसती असे मला वाटते. अशा अनेक कारणांमुळे समाधी निश्चितीमधे कागदपत्रांची उणीव जाणवते.
छत्रपती शाहूमहाराज (सातारा) यांच्या कारकिर्दीत (१७०७-१७४९) मराठ्यांचे राज्य महाराष्ट्रात भक्कमपणे स्थिराऊन पुढे भारतभर पसरले. इथून पुढच्या काळातील व्यक्तींच्या समाधीस्थानांविषयी शिवकालीन समाध्यांइतकी अनिश्चितता आढळत नाही. हा महाराष्ट्रातील स्थैर्याचा, सुबत्तेचा, निश्चिंततेचा परिणाम होय. मात्र अंदाजे १७१० पर्यंतच्या बहुतांश समाध्यांच्या बाबतीत घराण्यातील परंपरागत माहिती, पूर्वापार पूजेची वहिवाट, मृत्यूच्या वेळची परिस्थिती व ठिकाण अशा अनेक बाबींवरूनच समाधीस्थान कोणाचे हे निश्चित होत आले आहे.
समाधीची नावनिश्चिती करताना त्या व्यक्तींच्या वंशजांकडील माहिती व त्यांचे या बाबतीतील मत हे महत्वाचे ठरते. प्रत्यक्ष वंशज आणि समाधीस्थळ ज्या गावात आहे तेथील ग्रामस्थांची व समाधीची पूर्वापार पूजा करणाऱ्या व्यक्तींची समाधीस्थळाविषयी खात्री असेल तर हा पुरावा महत्त्वाचा मानला पाहिजे. याला आधार म्हणून समाधीचा जुनेपणा व
बांधकामाची पद्धतसुद्धा महत्त्वाची ठरते. अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींची समाधीस्थाने अशाच प्रकारे निश्चित झालेली आहेत.
आपल्या पराक्रमी, कर्तबगार व मातृभूमीसाठी लढलेल्या पूर्वजांची समाधीस्थाने ही त्या घराण्यातील व्यक्तींसाठी, त्यांच्या वंशजासाठी पवित्र व परंपरेने कुलाचार,
पूजाअर्चा करावयाची व अभिमान बाळगण्याची स्थाने तर आहेतच. पण इतर लोकांसाठी सुध्दा ती महाराष्ट्राच्या या सुपुत्रांची स्मृती जागृत ठेवणारी, प्रेरणा देणारी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यासाठी हक्काची जागा असणारी अशी आहेत. ही
आपली ऐतिहासिक वारसास्थळे असून त्यांचा जीर्णोद्धार, संवर्धन व्हावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष स्मारक नीटपणे जतन करून त्या व्यक्तीच्या चरित्राची, कर्तबगारीची समग्र माहिती देण्याची व्यवस्था करणे हे लोकांबरोबरच
शासनाचेसुद्धा एक महत्त्वाचे कार्य आहे. पर्यटनवाढीच्या प्रयत्नात ही समाधीस्थळे पर्यटन नकाशात समाविष्ट करून त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, पर्यटनाच्या
अनुषंगाने हि परिसर विकसित होणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. ही सर्व शासनाच्या अखत्यारीतील कामे आहेत.
समाधीस्थानांच्या माझ्या दर्शनयात्रेत अनेक बाबी लक्षात आल्या. अनेक समाध्यांची दुरावस्था केवळ दुर्लक्षामुळे आणि वेळेवर डागडुजी न केल्याने झालेली आहे. उन,पाऊस,थंडी,वारा,तापमानातील बदल यांनी अतोनात नुकसान झाले आहे.बांधकामातील फटी उघड्या पडून झाडाझुडपांना रूजायला वाव मिळतो.ही झाडी आणि गवत समाध्यांना अक्षरशः खाऊन टाकतात. यांच्या वाढणाऱ्या बुंध्यानी बांधकाम दुभंगून दगड खाली पडतात. काही नीच प्रवृत्तीच्या लोकांनी गुप्तधनाच्या आशेने समाध्यांची तोडफोड,उकराउकरी केल्याचीही उदाहरणे आढळतात. तसेच ह्या समाध्यांचे पावित्र्य व महत्व अजून त्या व्यक्तींच्या बहुतांश वंशजांना व सामान्य लोकांना जाणवलेले नाही हेदेखील अनेक ठिकाणी अनुभवाला आले. रोज सतत पाहून या वास्तूविषयी काहीवेळा अनास्था निर्माण होते.याला 'अतिपरिचयात अवज्ञा' असेही म्हणता येईल. अशा एकंदर परिस्थितीमुळे ह्या दुर्लक्षित आणि उध्वस्त समाध्यांच्या
जीर्णोद्धाराचे प्रयत्न ही खूप लांबची बाब वाटत होती. ह्यातून आपण वैयक्तिकरित्या ह्यासाठी काय करु शकतो हा विचार मनात येऊ लागला. समाधीस्थानांना पुस्तकातून प्रसिद्धी मिळवून देण्याबरोबरच प्रत्यक्ष जीर्णोद्धार कार्य करण्याची उर्मी जागी झाली.यापैकी काहींची माहिती तुम्ही माझ्या यापूर्वीच्या पोस्टसमधून वाचलेलीच आहे.
समाध्यांचे दर्शन घेतानाच इंजिनिअर ह्या नात्याने त्यांच्या जीर्णोद्धारासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचे कच्चे आराखडे मनात तयार होत होते. जाईल तिथे ह्या समाध्यांच्या जीर्णोद्धाराला चालना मिळावी ह्यासाठी त्या व्यक्तींच्या वंशजांना, ग्रामस्थांना व ह्या विषयात रस असणाऱ्या, प्रत्यक्ष कार्य करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना भेटून त्यांना त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची माहिती देऊन समाधी जीर्णोद्धार करणे का महत्वाचे आहे हे सांगतानाच जीर्णोद्धार कसा करावा ह्याबद्दलही माहिती देत राहिलो.
मूळ स्वरुपात समाधी पूर्वी होती तशीच ठेवणे महत्त्वाचे आहे. डागडुजी करताना समाधीस्थान रंगवणे, टाईल्स लावणे, मूळ शैली व बांधकाम पद्धतीपेक्षा वेगळ्या रीतीने जीर्णोद्धार करणे हे कसे अयोग्य आहे हेसुद्धा लोकांना पटवून देणे गरजेचे असते. समाधीस्थान देखणे व्हावे म्हणून मूळच्यापेक्षा
चांगले पण वेगळे साहित्य वापरून, नक्षीकाम व कलाकुसर करुन समाधीचे रुप पालटणे हेसुद्धा कसे चुकीचे आहे हेही सांगावे लागते. अश्या चुका केल्यास त्या समाधीची अस्सलता,जुनेपणा आणि ऐतिहासिक वास्तूस्मारक म्हणून असलेले मोल धोक्यात येते.तेव्हा हूबेहूब मूळच्या बांधकामाप्रमाणेच व मुळात वापरलेलेच साहित्य वापरून जीर्णोद्धार केला पाहिजे. काही ठिकाणी समाधीशिळा जतनासाठी मूळ ठिकाणावरून उचलून दुसरीकडे ठेवल्याचे आढळते. हेदेखील चुकीचे आहे कारण या समाधीशिळांच्या खाली जमिनीत बहुधा अस्थीकलश पुरलेला असतो.तसेच या शिळा त्या जागेवर विधीवत पूजा करून स्थापलेल्या असतात. यामुळे अशा शिळा जागेवरून हलवू नयेत.जिथे समाधीचे बांधकाम डागडुजी करण्याच्या पलीकडे गेले आहे तिथे हे बांधकाम पूर्ण उकलून पुन्हा त्याच जागेवर पहिल्याप्रमाणे बांधणे हाच उपाय असतो. मात्र अशावेळी आतील अस्थीकलश अत्यंत काळजीपूर्वक हाताळला पाहिजे आणि तो बांधकामात पूर्ववत ठेवला पाहिजे. अशाप्रकारे इतिहास अभ्यासक, समाधी संशोधक व बांधकाम अभियंता म्हणून अनेक ठिकाणी मार्गदर्शन करता आले. दगडी बांधकाम जुन्या पद्धतीने करण्याची कामे मी केलेली असल्याने ह्या तंत्राची माहिती व प्रत्यक्ष कामाचा अनुभव समाध्यांच्या जीर्णोद्धारांची रुपरेषा व आराखडे तयार करताना मला फार उपयुक्त ठरला.शेकडो समाध्या प्रत्यक्ष पाहिल्याचा माझा अनुभव सुध्दा यात मोलाचा ठरला.
मराठा वीरांच्या शेकडो समाध्यांपैकी फार थोडी समाधीस्थाने चांगल्या अवस्थेत
आहेत. परराज्यांतील, परसत्तांतील, परधर्मातील तत्कालीन इतिहासातील व्यक्तींची
समाधीस्थाने, कबरी इत्यादी स्मारके जपली जात असताना मराठा वीरांची बहुतांश समाधीस्थाने मात्र दुर्लक्षित, दुरावस्थेत आणि मराठी जनांच्या संपर्कापासून,प्रसिद्धीपासून
दूर एकाकी अवस्थेत आहेत. आपण मराठी लोक कुणाचे वंशज आहोत, कोणता पराक्रमी व उज्ज्वल वारसा आपल्या पाठीशी आहे ह्याची जाण करुन देणारी, पुढच्या पिढीसाठी एक ऐतिहासिक, अमूल्य व पवित्र ठेवा असणारी ही धारातीर्थे जपणे आपले एक महत्वाचे कर्तव्य आहे. शिवछत्रपतींनी मावळ्यांच्या निष्ठेची स्वराज्याच्या सिंहासनाशी
घातलेली सांगड तेव्हाही अतूट होती आणि आजही आहे. ह्या मावळ्यांची चरित्रे हा आपणा मराठी जनांच्या प्रेरणेच्या अखंड, अक्षय असा स्त्रोत आहे. आपल्या शूर पूर्वजांचा
वारसा जपण्याचे आवाहन करण्यासाठी ह्या स्थानांची व त्या व्यक्तींच्या चरित्राची माहिती देण्याकरीता फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे ही आजची गरज आहे.
एखाद्या समाधीबद्दल काहीवेळा वादाचे मुद्दे उपस्थित होतात.अशावेळी "हीच समाधी खरी कशावरून?"यावर वादविवाद करण्यापेक्षा जोपर्यंत त्याच व्यक्तीची दुसरी एखादी समाधी पुराव्यासह समोर येत नाही किंवा आपण जी समाधी मानतो ती पुराव्यानिशी दुसऱ्याच व्यक्तीची आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आहे हीच समाधी खरी मानून तिच्या जीर्णोद्धार, प्रसाराचे कार्य करायचे कि ती समाधी खरी नाहीच असं म्हणून तिला तशीच नष्ट होण्यासाठी सोडून द्यायचे?आणि ही खरी समाधीच असेल तर हा दुराग्रह आणि दुर्लक्ष किती वाईट ठरेल?आपण या महाराष्ट्राच्या पराक्रमी पुत्रांच्या आपल्यावर असलेल्या उपकाराची काही अंशी परतफेड समाधी जीर्णोद्धार करुन,त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहोचवून करणार की शंका घेत आणि वादच घालत बसणार? इथे शंका घेणाऱ्याच्या हेतूवरच शंका येणार हे नक्की.स्वराज्यद्रोही,शिवद्रोही असली विशेषणे लावून घ्यायची नसतील तर एखाद्या चालू जीर्णोद्धार कार्यात स्वतःकडे अस्सल, समकालीन पुरावे नसताना वादाचे मुद्दे उपस्थित करणे,दिशाभूल करायचा प्रयत्न करणे हे टाळायला पाहिजे. वादाचे मुद्दे निर्माण करण्यात, त्यांना खतपाणी घालण्यात आणि आपली असलेली/नसलेली अक्कल पाजळण्यासाठी आपलाच मराठ्यांचा इतिहास आणि समाधी जीर्णोद्धार कार्ये काही विघ्नसंतोषी लोक हेतूपूर्वक निवडतात. अगोदरच आपल्या इतिहासात बरेच वादाचे मुद्दे जाणीवपूर्वक निर्माण केले गेले आहेत. अशांची री ओढाल तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल.कारण जीर्णोद्धार करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांनी समाधीस्थळाच्या व त्या जमिनीच्या मालकाची परवानगी घेतलेली असते.संबंधित ऐतिहासिक व्यक्तीच्या वंशजांची संमती घेतलेली असते.आवश्यक निधी उभा केलेला असतो.प्रत्यक्ष कामाची व्यवस्था करून त्यावर देखरेख या व्यक्ती अथवा संस्था करीत असतात. त्यांच्या श्रद्धा तिथे जडलेल्या असतात.तिथे इतर शंकेखोरांनी लुडबूड करुच नये.उलट त्या ऐतिहासिक व्यक्तीबद्दलचा आदर व अभिमान व्यक्त करण्यासाठी श्रमदान अथवा इतर स्वरूपात मदत करुन आपलेही योगदान त्यात द्यावे आणि मगच स्वतःला शिवस्वराज्यभक्त म्हणवून घ्यावे.उगाच राजकारण,श्रेयवाद आणि वादविवादाची धुळवड खेळून आपण आपलाच इतिहास डागाळतोय हे लक्षात आले पाहिजे.एकीऐवजी बेकीचं प्रदर्शन होईल असे काही करणे टाळायला हवे.
याही पुढचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीची समाधीच उपलब्ध नसेल किंवा समाधीच्या खरेखोटेपणाबद्दल वाद असेल तरी त्यामुळे त्या व्यक्तीचा सिध्द झालेला इतिहास, चरित्र,शौर्य, प्राणार्पण खोटे ठरत नाही.मग अशा व्यक्तीच्या पराक्रमाला,योगदानाला साजेसे स्मारक बांधायला कोण हरकत घेईल? असे स्मारक तत्काळ बांधणे हेच इथे आपले आद्य कर्तव्य असते.आपण एखाद्या मूर्तीला नमस्कार करतो.तो त्या मूर्तीच्या दगडाला,शिल्पकलेला,त्यातून दिसणाऱ्या मनुष्याकृतीला असतो का? माझ्या मते तो नमस्कार असतो त्या व्यक्तीमत्वाच्या महान कार्याला,त्याच्या स्मृतीला आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेला.समाध्या नसलेल्या वीरांची स्मारके बांधण्यातून नेमके हेच साधायचे असते.तिथे स्मारकाची वास्तू हे फक्त नतमस्तक होण्यासाठीचे,श्रध्दांजली वाहण्याचे,पूजन करण्याचे ठिकाण असते.आपल्या धार्मिक परंपरेनुसार आपल्याला पूजनासाठी मूर्त स्वरूपात काही ना काही लागतेच.स्मारक हे साधन तर त्या व्यक्तीच्या कार्याचा,शौर्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचा आदर आणि प्रसार हे साध्य आहे.बरोबर आहे ना हा मुद्दा?
ही समाधीस्थाने जीर्णोद्धारीत करणे व जपणे हे काही फार मोठे खर्चाचे व श्रमाचे कार्य आहे असे नाही. समाधी पूर्ववत बांधणे, गरज असेल तर वर छत घालणे,भोवताली संरक्षक भिंत किंवा कुंपण घालणे, शेजारी त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या माहितीचा फलक लावणे,स्वराज्याचे निशाण असलेला भगवा ध्वज स्थापणे व समाधीच्या नित्यपूजेची व्यवस्था करणे ही समाधी जीर्णोद्धार कार्यातील मूलभूत कामे आहेत.ही कामे काही फार खार्चिक नसल्याने लोकसहभागातून (आणि गरज पडली तर शासनाच्या मदतीने) अशी कामे करणे सहज शक्य आहे.
महाराष्ट्राच्या व भारताच्या पर्यटन नकाशात ह्या समाधीस्थानांना ठळक स्थान मिळवून देणे हा प्रसिद्धीचा भागसुद्धा महत्वाचा आहे.समाधी दर्शनासाठी आलेल्यांना सविस्तर माहिती देऊन, पुस्तिका छापून, दरवर्षी अभिवादनाचा कार्यक्रम करुन व या समारंभाच्या बातम्या प्रसारीत करुन हे करता येते.मराठ्यांच्या इतिहासातील या स्वराज्यवीरांच्या शौर्यगाथेतून प्रकट होणारी स्वातंत्र्याच्या ओढीची, आपल्या मुलूखाच्या व लोकांच्या उत्कर्षाची, मातृभूमीभक्तीची, राष्ट्रप्रेमाची आणि आपल्या संस्कृतीच्या अभिमानाची जाणीव खोलवर रुजण्यासाठी ही समाधी जीर्णोद्धार कार्ये अत्यंत मोलाची भूमिका निभावतील हे निश्चित आहे.
सध्याच्या तरुण पिढीत इतिहासाची ओढ मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेली दिसून येत आहे. सोशल मीडियाचे माध्यम यात मोठे महत्वाचे ठरते आहे. अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज आपल्या घराण्याचा साधार इतिहास प्रकाशित करीत आहेत.अनेक शिवस्वराज्यभक्त संघटना गडकिल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी मोठ्या उत्साहाने व ताकदीने प्रत्यक्ष गडावर कामे करीत आहेत. समाधीस्थळांची माहिती अशा शिवभक्तांपर्यंत पोहोचविणे सध्या सोशल मीडियामुळे खूपच सोपे झाले आहे.अशा या अनुकूल परिस्थितीत आपला हा इतिहास प्रत्यक्ष ज्यांनी घडविला त्या वीरांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार हे किती महत्त्वाचे व प्राधान्याने करावयाचे कार्य आहे हे सतत सर्व माध्यमांतून सर्वांसमोर मांडले पाहिजे.
प्रसिद्ध व्यक्ती आणि वीरांसोबतच आजवर अज्ञात राहिलेल्या सामान्य घरातील, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील, प्रत्यक्ष लढाईत मावळे, शिपाई म्हणून लढलेले अप्रसिद्ध वीर हे मराठ्यांच्या स्वराज्याचे जणू पायाचे मजबूत चिरेच होते. ह्यांच्या शौर्यावर, बलिदानावर स्वराज्याची भक्कम,डौलदार आणि उत्तुंग इमारत उभी राहिली पण हे पायाचे दगड विस्मृतीच्या मातीत पायाखाली अंधारातच राहिले. शिवरायांच्या सिंहासनारुढ मूर्तीकडे पाहताना आपोआपच ह्या अधिष्ठानाच्या खालील सामान्य मावळ्यांच्या पराक्रमाचे स्मरण होते. ज्या निष्ठेने ह्या मावळ्यांनी स्वराज्य जपले, वाढवले, रक्षण केले ती निष्ठा केवळ अद्वितीय आहे. शिवरायांच्या अलौकिक व्यक्तीमत्वाने आणि उच्च ध्येयाने भारावून जाऊन स्वराज्यस्थापनेसाठी लढलेल्या, प्राणार्पण केलेल्या मावळ्यांनी हे मराठ्यांच्या स्वराज्याचे सुवर्णस्वप्न साकार करण्यात सर्वात मोठा वाटा उचलला आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन जीवाची बाजी लावणाऱ्या सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम व कर्तृत्व गाजवून जगाला आश्चर्यचकित करणारा हा इतिहास घडविला आहे. मावळ्यांच्या आत्यंतिक निष्ठेची सांगड स्वराज्यनिर्मितीशी शिवरायांनी घातल्याने महाराष्ट्राच्या ह्या महाभारतात,नव्हे, शिवभारतात हे वीर आपल्या कर्तबगारीच्या वलयाने तेजोमय ताऱ्यांप्रमाणे इतिहासाच्या पानापानांत चमकत आहेत. ह्या महाराष्ट्रपुत्रांच्या जिद्दीला, शौर्याला आणि निष्ठेला जोड मिळाली ती सह्याद्रीच्या रांगड्या, रौद्र भूरुपाची आणि सागराच्या नैसर्गिक सुरक्षेची. ह्याच मातीतल्या ह्या काटक, चपळ आणि शारीरिक श्रमाला मागे न हटणाऱ्या मावळ्यांनी, सेनानींनी आपल्याहून कैक पटींनी सामर्थ्यवान शत्रूंना धूळ चारली. मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा इतक्या उत्तुंग उंचीवर पोहोचली होती की लढाईत प्राण देणे कस्पटासमान नव्हे तर अत्यंत अभिमानास्पद आणि दिगंत किर्ती मिळवून देणारे आहे ही ठाम भावना मनात ठेवून ताठ मानेने, छाती पुढे काढून हे वीर बेधुंद होऊन रणसंग्रामात मृत्यूला सामोरे गेले. हीच प्रखर स्वराज्यनिष्ठा शिवराय व शंभूराजांच्या मृत्यूनंतरसुद्धा
औरंगजेबासारख्या महाबलाढ्य बादशहाला महाराष्ट्रातच मातीआड करायला कारणीभूत ठरली. इतिहासात दोन-चार ओळीत उल्लेखला गेलेला त्यांचा पराक्रम त्यांच्या मूळ नावगावासह, अधिक माहितीसह प्रकाशात आणणे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.तरच या अनेक अज्ञात वीरांच्या समाधी जीर्णोद्धाराला चालना मिळून त्यांच्या आपल्यावर असलेल्या उपकारातून थोडेतरी उतराई व्हायची संधी आपल्याला मिळेल.
शूर मावळ्यांबरोबरच त्या काळातील मातब्बर घराण्यातील कर्तबगार व्यक्तीसुद्धा शिवरायांच्या कार्यात हिरीरीने सहभागी झाल्या. मावळातले देशमुख व इतर घराणी
आपल्या पदरच्या सैन्यासह ह्या स्वातंत्र्यसंग्रामात शिवरायांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. अनेक शतकांची आपली सुलतानी सत्तांची गुलामगिरी सोडून देऊन मराठी मुलूख,महाराष्ट्रधर्म आणि संस्कृती रक्षणासाठी ह्या व्यक्तींनी आपली रग, पराक्रम आणि कर्तबगारी स्वराज्यनिर्मितीच्या उच्च ध्येयप्राप्तीसाठी कारणी लावली. ह्याच्या पराक्रमाने मावळ,सह्याद्री आणि कोकण हा स्वराज्याचा गाभा बनला. सह्याद्रीच्या कठीण कातळाप्रमाणे टणक आणि सागराच्या अथांगतेप्रमाणे अमर्याद अशी ह्या वीरांची स्वराज्यनिष्ठा होती.या त्यांच्या निष्ठेला प्रणाम म्हणून त्यांची समाधीस्थळे जपली पाहिजेत.
स्वराज्यासाठी लढलेल्या, प्राणार्पण केलेल्या वीरांमधे मराठा, ब्राम्हण, प्रभू, न्हावी, धनगर, महार, मांग, रामोशी, बेरड, भिल्ल, महादेव कोळी, भंडारी, आगरी,माळी, कोळी, लिंगायत अशा अठरापगड जातीतील वीरांचा समावेश ह्या स्वराज्यकार्यात आहे. 'मराठा' हा शब्द ह्या लेखात केवळ एका विशिष्ट जातीचा वाचक म्हणून वापरलेला नाही.महाराष्ट्र ही मातृभूमी आणि मराठी ही मातृभाषा असणारा, शिवरायांना दैवत मानून मराठ्यांच्या स्वराज्याचा सार्थ अभिमान बाळगणारा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाईक असणारा आणि अशा सर्व मराठी जनांना आपले लोक मानणारा तो मराठा असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. मग हा 'मराठा' कोणत्याही जातीचा असो तो मराठाच.
याच मराठ्यांचा इतिहास जपण्याची, जगासमोर आणण्याची आणि पुढच्या पिढीकडे नीट अवस्थेत हा आपला ऐतिहासिक वारसा सोपविण्याची जबाबदारी आपल्या इतिहासाचे वारसदार म्हणून आपल्यावरच आहे.हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मराठा स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार करणे हाच खरा मार्ग आणि खरे कार्य आहे.
प्रवीण भोसले
लेखक-मराठ्यांची धारातीर्थे
9422619791(वाटसप)
* लेखासोबत काही समाधी जीर्णोद्धार कार्यांबरोबर इतरही फोटो जोडले आहेत. दुरावस्थेतील समाधीस्थळे कोणाची आहेत हे सांगणे मला योग्य वाटत नाही. तुम्हीही विचारु नये ही विनंती.
* फोटोमधील माहिती ओळी आवर्जून वाचाव्यात.
* माहिती आवडली तर जरूर शेअर करावी.(लेखकाचे नाव न वगळता)
* सर्व छायाचित्रे मी स्वतः काढलेली आहेत.नेटवरुन घेतलेली नाहीत.
* आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.
* शंका,प्रश्न बिनधास्त विचारा.
एक सूचना- फेसबुकवरील माझी मित्रयादी मर्यादा संपल्याने मी नवीन मित्रविनंती स्वीकारू शकत नाही. आपण मला किंवा ' मराठ्यांची धारातीर्थे' या माझ्या पेजला फॉलो करु शकता.यामुळे सर्व लेख तुमच्या पर्यंत थेट पोहोचतील.शिवाय महत्वाच्या २२ स्वराज्यवीरांची शौर्यगाथा व समाधीस्थळे यांची सविस्तर माहिती माझ्या 'मराठ्यांची धारातीर्थे-प्रवीण भोसले' या युट्यूब चैनैलवर आपण पाहू शकता.
*यापूर्वीचे लेख*
१. प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा.
२.होय ! आम्ही प्रतापगड पुन्हा चुन्यात बांधलाय.
३. गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांच्या समाधीचा जीर्णोद्धार.
४.सेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार.
५. शिवछत्रपतींचे पहिले मंदिर कर्नाटकात.
६.बाजीराव-मस्तानीपुत्र,पानिपतवीर
समशेर बहादूरांच्या समाधीचा शोध.
७. पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?
८.छत्रपती शंभूराजांच्या रक्षणार्थ प्राणार्पण करणारे सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची समाधी.
९. पद्मदुर्ग व खांदेरी किल्ल्यांची त्रिमितीय सफर व इतर लेख.१. प्रतापगडाजवळ नवीन बांधलेला पाटलांचा जुना वाडा.
२.होय ! आम्ही प्रतापगड पुन्हा चुन्यात बांधलाय.
३. गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांच्या समाधीचा जीर्णोद्धार.
४.सेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या कर्तबगार पत्नी द्वारकाबाईसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार.
५. शिवछत्रपतींचे पहिले मंदिर कर्नाटकात.
६.बाजीराव-मस्तानीपुत्र,पानिपतवीर
समशेर बहादूरांच्या समाधीचा शोध.
७. पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?
८.छत्रपती शंभूराजांच्या रक्षणार्थ प्राणार्पण करणारे सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची समाधी.
९.शिवरायांच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले अखेरचे वीर पंचहजारी सेनानी सिदोजीराव निंबाळकर शौर्यगाथा व समाधीस्थळ.
९. पद्मदुर्ग व खांदेरी किल्ल्यांची त्रिमितीय सफर व इतर लेख.
No comments:
Post a Comment