मराठा सेनापती ‘बहिर्जी हिंदुराव घोरपडे’ व त्यांचे गुणवैशिष्ट्ये....
बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांची लष्करी कामगिरी मुख्यतः मोगलांविरुद्ध चाललेल्या लढायांतून दिसून येते. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांनी ताराराणी बाईंसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे अभूतपूर्व स्वातंत्र्ययुद्ध चालू ठेवले त्यात राजे बहिर्जीचा वाटा मोठा होता. हे युद्ध सन १७०० ते सन १७०७ पर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागात अत्यंत ईर्षेने लढले गेले. त्यात धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, प्रतापराव मोरे, संताजी पांढरे, नेमाजी शिंदे अशा अनेक नामवंत सेनानींचा समावेश होता. बहिर्जी हिंदुराव यांनी तर त्याकाळी अनेक मोक्याच्या लढाया करून मोलाची कामगिरी बजावली. राजे बहिर्जी हिंदुराव यांनी त्या काळात कोणत्या लढायात भाग घेतला आणि कसे पराक्रम केले यासंबंधी फार्सी इतिहासात अनेक उल्लेख सापडतात..
बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांच्या राजकीय कामगिरीचे उल्लेख करणारी बरीच पत्रे आढळतात. हे उल्लेख प्रामुख्याने कोकण, सागरी किनारा आणि गोवा या प्रदेशांशी संबंधित आहेत. बहिर्जीनी बहुधा याच प्रदेशात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला होता असे दिसते. हे संबंध पुढच्या काळात राजे सिधोजीराव हिंदुराव घोरपडे यांनीही टिकवले आणि वाढवले. या राजकीय संबंधांचा उपयोग हिंदुराव घोरपडे घराण्याला कर्नाटकात आपले राज्य बळकट करण्यासाठीही झाला असे पुढील इतिहासावरून दिसून येते. बहिर्जी हिंदुराव केव्हा निधन पावले यासंबंधी निश्चित तारीख उपलब्ध नाही. पण काही कागदपत्रातील उल्लेखावरून ते सन १७०७-१७०८ पर्यंत जिवंत असावेत असे दिसते..
ताराबाईंसाहेबांनी संताजींची पत्नी द्वारकाबाईची समजूत घालण्यासाठी लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. द्वारकाबाईंनी आपल्या नातवाला सेनापतीपद मिळावे अशी मागणी केली होती. हिंदुरावांचाही त्या मागणीला पाठिंबा होता. घोरपडे घराण्यात सेनापतीपद रहावे अशी त्यामागची भूमिका. पण संताजींच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी सेनापतीपद धनाजी जाधवाला दिले होते. ताराबाईंसाहेबांनी खेडच्या लढाईपर्यंत तीच व्यवस्था कायम ठेवली. पण सेनापती संताजींच्या घराण्याची बूज राखली जावी अशीही त्यांना इच्छा असावी. म्हणून त्यांनी द्वारकाबाईंचीही समजूत पटवून सरंजाम करून दिला (सन १७०७)..
――――――――――――
No comments:
Post a Comment