पोर्तुगिजांना शह देण्यासाठी दुसरे फोंड सावंत यांनी हळर्ण येथे शापोरा नदीच्या काठावर भुईकोट बांधला होता. पुढे यावर पोर्तुगिजांनी वर्चस्व ठेवले. प्रामुख्याने जांभा दगडाचा बांधकामासाठी वापर केलेल्या या किल्ल्याने बरेचसे अवशेष आजही शाबूत आहेत. पोर्तुगिजांनीही पुढे त्याचे नुतनीकरण केल्याचे संदर्भ मिळतात. याला अलोर्णा किल्ला म्हणूनही संबोधले जाते. चार बुरूज, चारही बाजूनी तटबंदी, त्यावर तोफा चढवण्यासाठीचा मार्ग अशी याची रचना आहे..
सिंधुदुर्ग सावंतवाडी संस्थानचे राजे रामचंद्र सावंत आणि त्यांचे काका जयराम सावंत महाराज यांच्या सुरवातीच्या स्वतंत्र कारभार काळात गोव्यात स्थिरावलेल्या पोर्तुगीजांची पिछेहाट झाली; मात्र पोर्तुगीजांचा गव्हर्नर बदलला आणि परिस्थितीही बदलून गेली. पोर्तुगीजांनी सावंतवाडीकरांना शह देत जोरदार 'कम बॅक' केले. यात हळर्ण येथील लढाई सावंतवाडीकरांना धक्का देणारी ठरली..
पोर्तुगीजांसाठी १७३७ ते १७४० ही दोन वर्षे नुकसानकारक ठरली होती. वसई भागात पेशव्यांनी आणि गोव्यात सावंतवाडीकरांनी त्यांचा बराचसा मुलुख ताब्यात घेतला होता. १७४४ मध्ये गोव्यात "कोंद दी अशुमर' हा नवा गव्हर्नर जनरल पोर्तुगिज सरकारने नेमला. त्याने पोर्तुगीजांचे वर्चस्व पुन्हा राखण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. हळर्ण (गोवा) येथे झालेली लढाई यात महत्त्वाची ठरली. किल्ल्यावर वर्चस्वासाठी झालेल्या या लढाईचे सविस्तर वर्णन पोर्तुगीजांच्या एका संदर्भ पत्रात आढळते. हे पत्र गव्हर्नर जनरल अशुमर यानेच आपल्या पोर्तुगाल मधील शासनकर्त्यांना पाठवले होते..
याच किल्ल्यावर नवा गव्हर्नर जनरल कोंद दी अशुमर याने पहिला हल्ला केला. याबाबत पोर्तुगीजांनी ठेवलेल्या नोंदीमधील हळर्ण किल्ल्यावरील लढाईचे वर्णन खूप रोचक आहे. ५ मे १७४६ ला पोर्तुगीजांनी लढाई करून सावंतवाडी करांकडून हा किल्ला हस्तगत केला. पोर्तुगीजांनी हल्ल्या साठी हळर्ण किल्लाच पहिल्यांदा का निवडला याचीही कारणे होती. कोलवाळच्या किल्ल्याजवळून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या किनाऱ्यावरच हा किल्ला आहे. तिथे याला पोरोकाव नदी असेही म्हणायचे. सावंतवाडीकरांचा हा या भागातील सगळ्यात मजबूत किल्ला होता. तो मिळवला तर रेडी आणि डिचोली किल्ल्यावर हल्ला करणे सोपे जाणार होते, पण तो मिळवण इतक सोप नव्हत. यात मुख्य अडचण होती ती दुर्गमतेची. या किल्ल्याजवळ दारूगोळा नेण्याचे आव्हान होते. त्यासाठी गाड्या, ओझी वाहणारे बैल मिळणे मुश्कील होते. त्यामुळे माणसांनी हे साहित्य नेणे हाच पर्याय होता. इतके मनुष्यबळ मिळणेही कठीण होते. अशा स्थितीतही गव्हर्नर जनरल अशुमर याने हल्ल्याचा नियोजित आराखडा बनवला. त्याने सैन्याची दोन टप्प्यात विभागणी केली. आधी जमिनी वरील सैन्याचा अधिकारी पेटीपॉटल यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी हळर्णनकडे नेण्याचा आदेश दिला..
पूर्व हळर्णला वेढा घालून थांबण्यापेक्षा पोर्तुगिजांनी एकदम हल्ला करून किल्ल्यापर्यंत मजल मारण्याची रणनिती आखली व ते त्यात यशस्वी झाले. पुढे किल्ला मिळवण्यासाठी खटाटोप सुरू झाला. ५ मे १७४६ ला पहाटे तीन वाजता पोर्तुगिज सैन्याने किल्ल्यावर एकदम हल्ला चढवला. किल्ल्याच्या पहिल्या मोठ्या प्रवेशद्वारावर एक कुलपी गोळा ठेवून तो दरवाजा उडवून दिला, मात्र सावंतवाडीकरांच्या किल्लेदाराने जोरदार प्रतिकार केला. यात पोर्तुगिज सैन्याचे बरेच नुकसान झाले. अनेक सैनिक घायाळ झाले. मृत्यू झालेल्यांची संख्याही मोठी होती. यात पेरीपॉटल हाही जखमी झाला मात्र त्याने शौर्य दाखवत आपल्या सैन्याला उत्तेजन दिले. आत आणखी दोन दरवाजे होते. ते पार करणे कठीण बनले..
शेवटी पोर्तुगिज सैन्याने तटबंदिला शिड्या लावून वर चढत आणि खालून हल्ला सुरूच ठेवला. हा हल्ला तसाच काही काळ चालल्यानंतर किल्लेदाराला शरण यायला सांगण्यात आले पण त्याने याला नकार देत पोर्तुगीजांना धुळ चारण्याचा इशारा दिला. यामुळे उरले सुरले पोर्तुगिज सैन्य आणखी निकराने लढू लागले. आतील दरवाजावर हल्ला सुरू केला. सैनिक तटावर चढू लागले पण बळकट तटबंदीमुळे हे सैनिक खाली कोसळू लागले. यात पोर्तुगीजांचे आणखी नुकसान झाले. किल्लेदाराच्या प्रतिहल्ल्यात पोर्तुगीजांची मोठी कत्तल झाली. कित्येक अंमलदार मृत्यूमुखी पडले. यातच हळर्ण किल्ल्याचे बुरूज दारूगोळ्याच्या मोठ्या साठ्याने भरल्याची अफवा पोर्तुगिज सैन्यात पसरली. ते घाबरून पळू लागले; मात्र यावेळी पोर्तुगिज सैन्य अधिकारी सार्जंट मेजर पेट्रो व्हिसेंत याने मोठा पराक्रम दाखवत युद्धाचे चित्रच पालटले. आतील दरवाजाच्या समोर लागलेल्या आगीतून वाट काढत त्या दरवाजाखा ली कुलपी गोळा ठेवला आणि दरवाजा उडवून दिला. यामुळे पोर्तुगीज सैन्याला किल्ल्यात घुसायला मार्ग मोकळा झाला..
दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली. यात पोर्तुगीजांची सरशी झाली मात्र युद्ध इथे संपले नाही. आत त्याहून मजबूत दरवाजा होता. तोही कुलपी गोळ्याने उडवण्यात आला. किल्लेदार, किल्ल्यावरचे लोक, अंमलदार यांना पोर्तुगिज सैन्याने अक्षरशः कापून काढले. यावेळी या सैन्याने क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा उल्लेख पोर्तुगीजांनीच आपल्या पत्रात केला आहे. ही लढाई पाच तास चालली. पोर्तुगिज शिपायांनीच या किल्ल्याला 'सान्ता क्रूझ दी अलर्न' असे नाव दिले. विजयाचे प्रतिक म्हणून समोर एक क्रूझ उभा केला. पुढे किल्ल्याची दुरूस्ती करून याचा किल्लेदार म्हणून जुजे लोपेस याला नेमण्यात आले..
या मोठ्या विजयामुळे पोर्तुगिज सरकारने गव्हर्नर जनरलला 'मार्क्किस दी अलर्न' हा किताब दिला. पुढे त्याने तेरेखोल, निवती हे किल्लेही सावंतवाडीकरांकडून जिंकले. २६ ऑक्टोबर १७४६ ला डिचोली आणि साखळी या प्रांताच्या देसाईंनी पोर्तुगीजांचे मांडलीकत्व पत्करले. पोर्तुगीजांनी त्यांना सावंतवाडीकरांकडून मिळत असलेले हक्क अबाधित ठेवण्याबरोबरच त्यांचे पूर्वीचे गमावलेले हक्कही प्रदान केले. शिवाय त्यांना आठशे शिपायांची फौज बाळगायला परवानगी दिली..
साभार : शिवप्रसाद देसाई.
――――――――――――
दिग्विजय सिंग
No comments:
Post a Comment