लेखन :शुभम सरनाईक
पौराणिक
ग्रंथ अर्थात् वैदिक लोकांना पूजनीय असलेली मुख्य अशी १८ पुराणं आणि
रामायण, महाभारतादि वंदनीय महाकाव्यांचा विचार केला असता त्यामध्ये
आपल्याला महाराष्ट्र
असा शब्द आजच्या परिपेक्षात कुठेही आढळत नाही. पण याचा अर्थ आजच्या
महाराष्ट्रामध्ये त्या काळात वस्ती नव्हती का? तर या काळात महाराष्ट्रात
वैदिक लोकांची वस्ती होती पण वेगवेगळ्या काळामध्ये या भागाला वेगवेगळ्या
नावांनी संबोधले जात.
सर्वप्रथम रामायणाचा संदर्भ घेतला असता रामायणामध्ये दक्षिणापथात स्थित असलेले दंडकारण्य
हे आजच्या महाराष्ट्रातील बहुतांश भूभागाला व्यापणारे होते असे निदर्शनास
येते. हे दंडकारण्य सूर्यवंशातील दंडक नामक राजाचे राज्य असून गुरूंच्या
शापामुळे त्याच्या राज्याचे अरण्य झाले होते असे उल्लेख आपल्याला
पुराणांमध्ये बघायला मिळतात. याचा अर्थ असा की पूर्वी या भागामध्ये वस्ती
होती पण पुढे त्याचे अरण्यात रूपांतरण झाले आणि पुनश्च वैदिक लोकांची वसाहत
झाल्यावर अरण्य नामशेष होऊन येथे निरनिराळी जनपदं उदयाला आली.
आता महाभारत आणि पुराणांचा विचार केला असता आपल्याला या भागामध्ये विदर्भ, अपरांत, कोकण, अश्मक, मूलक, हृषिक, गोवर्धन, गोपराष्ट्र, पांडुराष्ट्र, मल्लराष्ट्र, कुंतल इत्यादि वेगवेगळी जनपदं बघायला मिळतात ज्यांचा कमी-अधिक प्रमाणामध्ये भौगोलिक विस्तार आजच्या महाराष्ट्रात होता.
पुरातन भारतवर्ष
[1]
आता वळू महाराष्ट्र या शब्दाकडे, महाराष्ट्र हा शब्द ख्रिस्तपूर्व वाङ्मयांत कोठेही सापडलेला नाही. परंतु त्याचे प्राकृत स्वरूप महारठी
हे मात्र आपल्याला सम्राट अशोक (ख्रिस्तपूर्व २ रे शतक) आणि सातवाहन
राजांच्या शिलालेखांमध्ये आढळते. ज्या अर्थी प्राकृत स्वरूप उपलब्ध आहे
त्या अर्थी त्याचे महाराष्ट्र हे संस्कृत रूप निश्चितच तितके मागे नेता
येईल.
कात्यायनाच्या प्राकृतप्रकाशांत शेषं महाराष्ट्रवित् असा
महाराष्ट्री भाषेचा निर्देश आढळतो. त्या सुमाराच्या वाङ्मयात महाराष्ट्र
हा शब्द देशवाचक म्हणून येऊ लागला. पुढे भरतमुनींच्या नाट्यशास्त्र (२ रे
शतक), वात्सायनकृत कामसूत्र (४ थे शतक), वराहमिहीराच्या बृहत्संहिता (४ ते
शतक), दंडीकृत दशकुमारचरित (७ वे शतक) इत्यादि पुरातन ग्रंथांत
महाराष्ट्र हे नाव स्पष्ट आढळते.
ख्रिस्ताब्द
३६५ मध्ये मध्यप्रदेशाचा राजा श्रीधरवर्म्याच्या सत्यनाग नामक प्रधानाने
एरण (सागर जिल्हा) येथील सुप्रसिद्ध शिलालेखात स्वतःस महाराष्ट्रप्रमुख म्हणवले आहे. तसेच एहोळे येथील शिलालेखामध्ये चालुक्य राजा द्वितीय पुलकेशी ख्रिस्ताब्द ६३४ मध्ये स्वतःस त्रिमहाराष्ट्रक (विदर्भ, अश्मक आणि कुंतल हे एकत्रित त्रिमहाराष्ट्र देश होय) देशाचा स्वामी बनला असल्याचे सांगतो.
उपरोक्त
उल्लेख बघता यापूर्वी महाराष्ट्र नाव अस्तित्वात असल्याचे सिद्ध करणारे
पुरावे किमान आज तरी उपलब्ध नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये वसाहत मात्र अति
प्राचीन काळापासून आपल्याला आढळते
No comments:
Post a Comment