राजकीय मुत्सद्दी शहाजीराजे भोसले
भाग २
ही धांदल सुरू असतानाच मनचेहर नावाचा मोगल सरदार त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला. मनचेहर यास पाहून महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे इत्यादी सर्व भोसल्यांनी पुन्हा शत्रूची कापाकापी सुरू केली. युद्धात शरीफजीराजे भोसले यांनी भाल्याच्या फेकीने हत्तीदळावर हल्ला चढवला होता, याप्रसंगी शत्रूच्या बाणाच्या हल्ल्याने शरीफजीराजे भोसले धारातीर्थी पडले. आपला धाकटा भाऊ शरीफजीराजे धारातीर्थी पडलेले पाहून महाबली शहाजी महाराज मनचेहर व त्याच्या सैन्यावर वेगाने चालून गेले. महाबली शहाजी महाराज यांच्या भीतीने मनचेहर हा मोगल हत्तीदळासह पळून जाऊ लागला, तेंव्हा शहाजीराजे यांनी पळणाऱ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि मनचेहरसहित अनेक लोकांना कैद केले..
भातवडीच्या युद्धानंतर महाबली शहाजीराजे आणि मलिक अंबर यांच्यातील मतभेद तसेच निजामशाही दरबारातील अंतस्थ राजकारणामुळे शहाजीराजे हे १६२५ मध्ये आदिलशाहीमध्ये गेले होते. आदिलशाहीत महाबली शहाजीराजे यांना मानसन्मान देऊन सरलष्कर पद देण्यात आले. आदिलशाहीमध्ये देखील शहाजीराजांनी पराक्रम गाजवला, केरळ व कर्नाटक प्रांत जिंकून शहाजी महाराजांनी इब्राहिम आदिलशहाच्या खजिन्यात भर घातली. याविषयी कवी परमानंद म्हणतात " त्या इब्राहिम आदिलशहाने संतुष्ट होऊन आपल्या शत्रूंचा विध्वंस करणाऱ्या शहाजीराजाला आपले अर्धपद दिले असे मला वाटते "
१६२८-१६२९ मध्ये महाबली शहाजी महाराज हे निजामशाहीत आलेले दिसतात पण २५ जुलै १६२९ रोजी निजामशाहने कपटाने आपल्या दरबारात लखोजीराजे जाधव आणि त्यांच्या पुत्र व नातू यांची हत्या केल्यावर मात्र रागाने निजामशाहीस सहाय्य करण्याचे सोडून दिले. शहाजी महाराजांनी निजामशाहीतील काही भागांवर आक्रमण करून तो मुलुख देखील काबीज करत आपल्या स्वातंत्र्याची पहिली ठिगणी टाकली..
१६३३ साली शहाजीराजेंनी निजामशहाचा एक १० वर्षाचा वारसदार गादीवर बसवून दुसरा मुर्तुजा म्हणून त्याचा राज्यरोहण संस्कार केला. पेमगिरी या किल्ल्यावरुन या नामधारी निजामशाहाच्या नावे शहाजीराजे राज्यकारभार पाहू लागले. तेंव्हा मोगल आणि आदिलशाह यांनी शहाजीराजेंचा बंदोबस्त करण्यासाठी संयुक्त मोहीम काढली होती त्यासमयी शहाजीराजे यांनी तीन वर्ष लढा दिला होता. शहाजीराजेंनी जो लढा दिला होता त्याबद्दल शिवभारतकार कवी परमानंद लिहतात
" सूर्याप्रमाणे प्रतापी शहाजीने शाहजहान आणि आदिलशाह यांच्या सैन्याबरोबर तीन वर्षे युध्द केले. तेंव्हा शहाजीने आपला देश वगळून राहिलेल्या निजामशाहीच्या राज्यापैकी काही मुलुख दिल्लीच्या बादशाहास आणि काही मुलुख आदिलशाहिस दिला "
दक्षिणेतील राजकारणात एका मोठ्या मराठा सरलष्कराने केलेले हे अभूतपूर्व धाडस होते त्याचा शेवट जरी चांगला नसला तरी मराठ्यांच्या दृष्टीने तो एक मैलाचा दगड होता. कवी परमानंद यांनी केलेले वर्णन हे अतिशय महत्वाचे आहे. शहाजीराजे आपल्या स्वतंत्र अस्तित्व आणि राज्यसाठी तीन वर्ष झुंजारपणे लढत होते. समोरील परिस्तिथितीचा शहाजीराजे यांनी विचार करून योग्य निर्णय घेण्यात वाकबगार असलेल्या शहाजीराजेंनी शत्रुपक्षाशी तह केला हे राजकीय मुत्सद्दीपणा आणि दूर दृष्टीकोणातुन योग्यच होते, यात शहाजी महाराजांचा प्रसंगावधानता आणि शत्रूच्या आंतरिक स्तिथीचा विचार करत योग्य निर्णय घेण्याचा एक पैलू दिसून येतो. तह झाल्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीत गेले, शहाजीराजे यांच्यासारखे मातब्बर योद्धे पुणे प्रदेशात राहिले तर ते पुन्हा उपद्रव करतील याची मोगलांना भीती होती आणि ते संकट दूर करण्यासाठी शहाजी महाराजांना कर्नाटक प्रदेशात जहागीरी द्यावी असे आदिलशाह आणि मोगल यांच्यात करार झाला असावा ही शक्यता नकारता येत नाही यावरून शहाजीराजे यांचा तत्कालीन राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीवर किती दबदबा आणि दरारा होता हे दिसून येतो ...
No comments:
Post a Comment