विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 February 2019

_*"राजमाता जिजाऊ "*_

_*"राजमाता जिजाऊ "*_

आपल्या मातीच्या स्वाभीमानासाठी अन् अभिमानासाठी शेतकर्यांसाठी, कष्टकर्यांसाठी लढणारे रयतेचे राजे *"छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजीराजे"* यांना घडविणार्या राष्ट्रमाता, *"राजमाता जिजाऊ माँ साहेब"*

राजमाता जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.
*राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला.*
लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.
जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती. शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.
अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. जिजाऊमातेने स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, विठोजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊमातेने आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ या स्वराज्यमाता झाल्या.
स्वराज्यावर अनेक संकट आली, अफजलखान, दिलेरखान, शाईस्तेखान, सिद्धी जौहर याप्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या, रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते. कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट-किल्ले पायदळी घाला, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.
आणि अशी शिकवण संभाजीराजेंना देखील महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर दिली.
स्वराज्यासाठी एक नाही तर दोन-दोन छत्रपती देणाऱ्या या पहिल्या महिला राजमाता झाल्या.
आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे. राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत, *शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत.* यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.
जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे चालते बोलते विद्यापीठ होत्या. शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्यामध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.
विखुरलेला समाज एक करावा म्हणून शहाजीराजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले. त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला. सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं, विकासाचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारला पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वाची महिलांनी नुसती दखलच नाही तर प्रेरणा देखील अंगिकारली पाहिजे..!!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...