विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 February 2019

पोर्तुगीजांचे ‘धर्मवेड'

पोर्तुगीजांचे ‘धर्मवेड'
लेखक :सतीश शिवाजीराव कदम




(लेखात अत्यंत महत्वाची माहिती आहे. सर्वानी वाचावे हि विनंती.)
यूरोपातील लोकांपैकी सगळ्यात पहिले भारतात आले ते पोर्तुगीज.
पोर्तुगीज भाषेत 'फिडलगी' Fidalgo (Portuguese:
[fiˈðaɫɣu] शब्दाचा अर्थ म्हणजे ‘सभ्य गृहस्थ.’
आपल्या लोकांनी ह्या 'फिडलगी' शब्दाचा अपभ्रंश 'फिरंगी' असा केला. आता आपले लोक पोर्तुगीजांना ‘फिरंगी' असे म्हणू लागले.
पोर्तुगीजांपैकी प्रथम भारतात आला तो ‘वास्को दि गामा.' तो आला इसवीसन १४९८ मध्ये. म्हणजे आजपासून बरोबर ५१९ वर्षांपूर्वी. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात तो पहिल्यांदा आला.
इ.स.१५०३ मध्ये कोचीन बंदर घेऊन पोर्तुगीजांनी तेथे वखार घातली. आणि किल्ला बांधला.
इ.स.१५०४ मध्ये आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांजीबार बंदरावर पोर्तुगीजांनी ताबा मिळविला. (ह्या झंजीबारवर नंतर ओमानच्या सुलतानाने राज्य केले.)
इ.स.१५०६-०७ मध्ये त्यांनी अरबस्तानातील मस्कत घेतले.
इ.स.१५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवे घेतले व तेथून पुढे जाऊन इ.स. १५११ मध्ये मलाक्का व इ.स.१५१८ त श्रीलंकेतील कोलंबो बंदर काबीज केले.
इ.स.१५१० मध्ये गोव्यात पाय रोवल्यावर इ.स. १५३४ मध्ये मुंबई व वसई व त्या भोवतालचा वांद्रे, ठाणे इत्यादी प्रदेश गुजराथचा सुभेदार बहादुरशहा यापासून मिळविला.
इ.स. १५३५ मध्ये दीव बेट घेऊन इ.स. १५५९ मध्ये त्यांनी दमनही हस्तगत केले. अश्या रीतीने केवळ अर्ध्या शतकातच पोर्तुगीजांनी आफ्रिका व आशिया या दोन खंडांत आपले हात पाय पसरले. व्यापाराच्या नावाखाली येऊन आता त्यांनी आपली राजसत्ता स्थापन केली.
हद्द तर पुढे झाली. इ.स. १५१७ त चीन देशात जाऊन त्या देशाशीही पोर्तुगीज व्यापार करू लागले. अश्या रीतीने समुद्रतीरावरील बहुतेक आशियाखंड त्यांनी व्यापला.
ह्या पोर्तुगीजांत एक फार महत्वाचा अधिकारी होता त्याच नाव अल्फान्सो अल्बुकर्क (alfonso albuquerque). याच अल्फान्सो अल्बुकर्कच्या नावावरून आपल्या हापूस आंब्याला भारताबाहेर ‘अल्फान्सो मँगो' असे म्हणतात.
ह्या ‘अल्फान्सो अल्बुकर्कने' इसवीसन १५१० मध्ये गोवा घेतले. त्यापूर्वी गोवा हे विजापूरच्या आदिलशहाच्या अमलाखाली यायचे. इसवीसन १५६९ मध्ये पोर्तुगीजांनी १३० लढाऊ जहाजे आणि ३ हजार शिपाई यांसह ‘होनावर' शहरावर हल्ला करून ते काबीज केले. गोव्याभोवतालचा अधिक प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी साष्टी आणि बार्देश हे प्रांत आपल्या राज्यास जोडले. उत्तर कोकणातील चौल बंदर त्यांनी इसवीसन १५०८ मध्येच घेतले होते.
मुसलमानांप्रमाणे पोर्तुगीजांच्या डोक्यातही प्रचंड धर्मवेड होते. आपला धर्म तेवढा चांगला व दुसऱ्याचा वाईट अशी त्यांची समजूत होती. ह्या त्यांच्या समजुतीमुळेच त्यांच्या हातून घोर जुलमी कृत्ये घडलेली आहेत. पोर्तुगीज विशेषतः महाराष्ट्रात अप्रिय होण्यास व लोकमत पोर्तुगीजांच्या विरोधात जाण्यास हीच जुलमी करणे आहेत.
त्यातील काही उदाहरणे आता आपण पाहू.
ह्या ‘अल्फान्सो अल्बुकर्कने' इसवीसन १५१७ मध्ये गोव्याभोवती तट बांधला. आपण ह्या देशात पाहुण्यासारखे राहिल्यास एत्तद्देशीय लोकांत आपल्याविषयी जिव्हाळा उत्पन्न होणार नाही याची जाणीव त्याला झाली. म्हणून मग त्याने एक युक्ती काढली. भारतात जे पोर्तुगीज येत त्यातील बहुतेकांची लग्ने झालेली नसत. या तरुण पोर्तुगीज सैनिकांचे अनैतिक संबंध इकडील स्त्रीयांशी होत. ह्या संबंधांतून जी संतती जन्माला येत ती धड हिंदूहि नसायची आणि पोर्तुगीजही नसायची. अशी अनावस्था सारखी घडू लागल्यामुळे ह्या पोर्तुगीज सैनिकांची आणि हिंदू स्रियांची चर्च मध्ये नेऊन सामुदायिक लग्ने लावली जायची.
त्यातीलच एक मार्मिक किस्सा.
ज्या वेळी गव्हर्नर ‘अल्फान्सो अल्बुकर्कने' सामुदायिक लग्ने उत्साहपूर्वक लावली त्यावेळी कृष्णपक्ष होता. हि लग्ने चर्च मध्ये लागली व ती लागल्यावर हि नवविवाहित जोडपी चर्चमधून घरी जाते वेळीच चर्च मधील दिवे वाऱ्याने विझले. ह्यामुळे अंधारात जोडप्यांची फाटाफूट झाली. घरी जाताना झालेल्या अंधारामुळे भलत्याच पुरुषाने भलत्याच स्त्रीचा हात हातात धरला व तिला आपल्या घरी नेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उजाडल्यावर नव विवाहितांच्या लक्षात आले कि आपली अदलाबदल झालेली आहे. आता असा घोटाळा झाल्यावर त्यावर ह्या अल्बुकर्कने तोडगा काढला. 'गतरात्री चुकीमुळे जी स्त्री ज्या पुरुषाची शयनसखी झाली तिजवर त्या पुरुषाने चर्चमधील लग्न झालेल्या कराराकडे लक्ष न देता संतुष्ट राहावे' असा त्याने हुकूम काढला.
हिंदू लोकांना बाटविण्यात ख्रिस्ती पाद्री (धर्मगुरू) हे मोठा पुढाकार घेत असत. त्यांच्या आज्ञेवरून गोवे सरकारने ३० जून १५४१ रोजी एक फर्मान काढले. ते असे. 'आकाशातील देवाने हिंदूंची सर्व देवालये जमीनदोस्त करण्याची आम्हास आज्ञा केली आहे.' ह्या फर्मानास अनुसरून ह्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी असंख्य हिंदू मंदिरे पडून त्या जागी चर्च उभी केली. जे हिंदू ख्रिस्ती होण्यास तयार झाले नाहीत त्यांजवर धार्मिक डोईपट्टीसारखा कर बसविण्यात आला.
तारीख ८ मार्च १५४६ मध्ये पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. 'गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.'
ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली.
इसवीसन १५४८ मध्ये गोव्यात 'दो फे जुबाव द अल्बुकर्क' हा हिंदू धर्माचा कट्टर विरोधक धर्मगुरू आला होता. हा 'दो फे जुबाव' ह्या गव्हर्नर असलेल्या 'अल्फान्सो अल्बुकर्क' याहून अर्थातच निराळा होता. ह्या 'दो फे जुबाव' ला असे वाटे कि जर ब्राम्हणांना गोव्यातून हद्दपार केले तर हिंदू धर्मच नाहीसा होईल. असे वाटून त्याने शोध घेऊन सगळे ब्राम्हण गोव्याबाहेर हुसकून लावले. हिंदूंची पोथ्या पुस्तके शोधून काढून ती त्याने जाळून टाकली.
ह्या पाद्रयांत ( धर्मगुरूंत) 'जेसुइट' नावाचा एक कट्टर पंथ होता. हे 'जेसुइट' फार कडवे असत. इसवीसन १५४८ मध्ये 'बॅरेट' नावाचा एक जेसुइट पाद्री गोव्याचा धर्मोपदेशक म्हणून नियुक्त झाला. हा फारच विचित्र होता. रस्त्यात जाताना जो हिंदू भेटेल त्यास पकडून त्या हिंदूस तो लागलीच 'बाप्तिस्मा' देई. ह्या त्याच्या उद्योगाने गोवेकर हिंदू फारच हैराण झाले.
पुढे इसवीसन १५६० मध्ये हा 'बॅरेट' जाऊन त्याच्या जागी 'गॅस्पर' नावाचा जेसुइट धर्मगुरू नियुक्त झाला. ह्या 'बॅरेटने' साष्टी प्रांतातील ४०९ हिंदू लोकांना पकडून त्यांना बाटवून एकाच दिवसात ख्रिस्ती केले.
त्यावेळी गोवे बेटांतील सर्व हिंदू इतके भीतीग्रस्त झाले कि त्यांपैकी कित्येकजण आपापली कुलदैवते घेऊन अन्य प्रांतात निघून गेली. साष्टी प्रांतात एका पाद्रीने तर १२०० हिंदू देवालये मोडून लोकांना बाटविले आणि नवीन मंदिरे बांधण्यास व मूर्तिपूजा करण्यास मनाई करणारा वट-हुकुमच काढला. साष्टी प्रांत बाटविल्यानंतर पुढील ५० वर्षात त्यांनी बार्देश प्रांत बाटवीला.
प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मप्रसारक 'सेंट झेवियर' हा मलाक्का, श्रीलंका, व तिथून पुढे जपान देशात गेला होता. वाटेत जात जात त्याने लाखो लोक बाटवून ख्रिस्ती केले. हा 'सेंट झेवियर' १५४२ मध्ये भारतातही आला होता. त्याने सर्व ठिकाणचे मिळून १२ लाख लोकांना बाटवून ख्रिस्ती केले. ह्याच 'सेंट झेवियर'च्या नावाने मुंबई आणि कलकत्ता येथे आज कॉलेजेस आहेत.
हिंदू मनुष्य मेला कि त्याची बायको मुले अनाथ होत. त्यांना बाटविण्यासाठी १५५९ मध्ये एक हुकूम काढण्यात आला. तो असा. ' जे हिंदू ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांना त्या मयत झालेल्या हिंदू मनुष्याची मालमत्ता देण्यात येईल. नाहीतर ती मालमत्ता सरकार जमा करण्यात येईल.
पुढे १५७४ मध्ये तर आजून विलक्षण कायदा करण्यात आला. ह्या कायद्यान्वये कोणाही हिंदू पंडितास आणि हिंदू वैद्यास गोव्यांतील रस्त्यावरून जाताना घोड्यावर, पालखीत, व मेण्यांत बसून जाण्यास बंदी करण्यात आली. हा कायदा मोडणारास त्या काळी १० हजार रुपये इतका दंड करीत.
२५ मार्च १५५९ रोजी पोर्तुगीजांनी नवीन फर्मान काढले ते असे. ' गोवे व त्या जवळील बेटे यांतील घरांत वा बाहेर मंदिरे किंवा मूर्ती असतील तर त्या जाळून उध्वस्त कराव्यात. खाजगी किंवा जाहीर हिंदू धर्मोत्सव करू देऊ नये. एखाद्याच्या घरात देव किंवा मंदिर वा मूर्ती असल्याचा संशय आल्यास त्याची ताबडतोब वर्दी सरकारांत देण्यात यावी. म्हणजे मग त्या घराच्या मालकीची सर्व मिळकत जप्त करून त्यातील अर्धी मिळकत हि सरकारला व अर्धी मिळकत हि वर्दी देणाऱ्याला दिली जाईल.'
इ.स. १५६३ मध्ये पोर्तुगीजांनी नवीन राजाज्ञा काढली कि हातांनी जमीन पिकविणारे शेतकरी, वैद्य, सुतार , लोहार, भंडारी ह्यांखेरीज इतर हिंदूंनी आपली घरे व जमिनी विकून गोवे बेटांतून एका महिन्याच्या आत निघून जावे. नाहीतर त्यांना पकडून जहाजावर बंदी म्हणून पाठवून त्यांच्या जमिनी सरकारजमा होतील.
पोर्तुगीजांकडून आता स्वधर्मप्रसार व परधर्म-संहार यांचे धोरण ठरविण्याकरिता गोव्यात धर्मपरिषद भरविण्यात येऊ लागल्या. पहिली परिषद १५६७ साली भरली. या परिषदेत पन्नास ठराव संमत झाले.
ह्या ठरावांत मुसलमानांचे काजी, हिंदूंचे भटजी,जोशी, गुरव ह्यांना हाकलून द्यावे. हिंदूंचा देव केवळ देवळात नसून वड, पिंपळ, औदुंबर अश्या झाडांवरही वास करतो. म्हणून अशी झाडे जिथे दिसतील तिथेच लगेच तोडून टाकावीत. हिंदू वैद्याकडून औषध घेऊ नये. वसईत कायस्थ प्रभूंना नोकरीस ठेऊ नये. हिंदू माणसांना सरकारी नोकरी देऊ नये असे अनेक ठराव संमत करण्यात आले.
पहिल्या ठरावातील नवव्या आणि तिसऱ्या परिषदेतील पाचव्या ठरावात तर हिंदू लोकांना त्यांच्या धर्माचे चिन्ह वापरण्याची बंदीच घालण्यात आली. हिंदूंनी कपाळाला व छातीला गंध लावण्याची मनाई करण्यात आली. या ठरावातून तर डोक्याची शेंडीही सुटली नाही. शेंडीवरही कर बसविण्यात आला. १४ ऑगस्ट १७३२ च्या ह्या शेंडीच्या ठरावाचे हस्तलिखित पोर्तुगालच्या 'ऍव्होर' येथील संग्रहालयात आहे.
आजून एक किस्सा सांगतो. हा किस्सा 'फ्रन्सिस द सौझ' ह्या इतिहासकाराने लिहून ठेवला आहे. इ.स. १५६४ च्या सुमारास वसई जवळ गोकुळाष्टमीच्या दिवशी मोठी तीर्थयात्रा भरत असे. गावो-गावचे हिंदू त्या यात्रेस येत असत. ह्या दिवशी ते उपवास करत. ब्राम्हणांना दान व भिकार्यांना भिक्षा करून हे हिंदू लोक नदीत नारळ अर्पण करीत असत. येथे स्नान केल्याने आपली सगळी केलेली पापे नष्ट होतात असे हिंदू मानीत. हि हजारोंची गर्दी पाहून ख्रिस्ती पाद्री 'क्रिस्ताव द कोस्ट' ह्याने वसईच्या कॅप्टनकडे ह्याची तक्रार केली. ह्या कॅप्टनने यात्रेच्या दिवशी ५० बर्कंदाज (बाण चालविणारे) व ५० घोडेस्वार पाठवून यात्रेवर अचानक हल्ला केला आणि हिंदू लोकांची एकच कापाकाप सुरु केली. ह्याने घाबरून जाऊन लोकांची पळापळ सुरू झाली. असंख्य लोक ह्या चेंगराचेंगरीत मेले. यात्रेकरुंपैकी एक साधू मात्र जागेवरून हलला नाही. त्याला पकडून तिथेच फाशी दिले. मंदिर उध्वस्त केले आणि मूर्ती जाळून टाकण्यात आल्या. एक गाय मारून तिचे रक्त्त सर्वत्र शिंपडण्यात आले आणि गाईच्या मांसाचे तुकडे आसपास आणि तळ्यात फेकण्यात आले.
तर असा हा किस्सा ह्या 'फ्रन्सिस द सौझ' ह्याने लिहून ठेवला आहे.
इ.स. १५६३ ते ६५ ह्या तीन वर्षात ठाणे गावात ६ हजार लोकांना व वसईत ७००च्या वर लोकांनां बाप्तिस्माचे पाणी पाजून बाटविण्यात आले.
इ.स. १५३४ ते १५५२ च्या दरम्यान वसई, आगाशी, व ठाणे या भागात 'आंतोनियुद पोर्तुं ' ह्या फ्रान्सिस्कन पादऱ्याने दोनशे देवळे जमीनदोस्त केली आणि दहा हजारांवर लोकांना बाटविले. कान्हेरीच्या तिसऱ्या लेण्याचे ह्या 'आंतोनियुद पोर्तुं ' ने 'सेंट मायकल' चर्च बनविले. मंडपेश्वर लेण्याचे ' अवर लेडी ऑफ कन्सेप्शन' चर्च बनविले.
दक्षिण गोव्या जवळच्या साष्टीत इ.स. १५६७ साली २८० देवळे जमीनदोस्त करण्यात आली. श्री मंगेश, श्री शांतादुर्गा, श्री म्हाळसा, श्री लक्ष्मी वगैरे देवता त्यांच्या भक्तांनी पळवून नेऊन फोंडे महालांत त्यांची स्थापना केली. ह्यावेळी फोंड्यावर पोर्तुगीजांची सत्ता नव्हती. यांपैकी दोघा देवांना म्हणजे श्री मंगेश व श्री म्हाळसा याना प्रियोळ येथे आसरा देण्यात आला. येथील काही देवदेवता तर भक्तांनी होडीत घालून कोचिनला नेल्या.
इ.स. १५३१ च्या मार्च महिन्यात 'निनो द कुन्हा ' ह्याने बलसाड, तारापूर, माहीम, केळवे, व आगाशी यांची जाळपोळ करून ठाणी लुटली.
छत्रपती शिवाजी महाराज गोव्याच्या स्वारीवर असताना त्यांना लोकांनी हा सगळं जुलूम अन्याय सांगितला. वाटेत जात असताना शिवाजी महाराजांना रस्त्यात चार जेसुइट पाद्री सापडले. त्यांना पकडून महाराजांसमोर उभे करण्यात आले. महाराजांनी त्यांना ‘तुमचा ख्रिस्ती धर्म बदलून हिंदू होत असाल तर जीवदान देतो’ असे म्हंटले.
पण त्या ज्येसुइट पादऱ्यांनी काही हे ऐकले नाही. तिथंच ह्या चौघांची मुंडकी महाराजांनी धडावेगळी केली आणि पिंजऱ्यात घालून गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरला पाठवून दिली. आणि बरोबर असा निरोप दिला कि ' आजपासून पुढे जर एका जरी हिंदूची कत्तल केली किंवा धर्मपरिवर्तन केले तर एकही पोर्तुगीज मी जिवंत ठेवणार नाही.'
गोव्याच्या गव्हर्नरने ती रक्ताने माखलेली पाद्रयांची मुंडकी पाहून आणि शिवाजी महाराजांचा निरोप ऐकून घाबरून जाऊन मोठी दहशतच खाल्ली. मग मात्र पोर्तुगीज एकदम सुतासारखे सरळ झाले आणि त्यांनी हिंदूंवरील अन्याय थांबविला.
लेख समाप्त.
श्री भवानीशंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...