विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 24 March 2019

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ४

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती

भाग ४

या दत्तकविधान समारंभात छत्रपती घराण्याशी संबंधित अनेक पाहुणे , सरदार , राजेरजवाडे , जहागीरदार , मानकरी येणार होते त्यामुळे प्रत्येकाच्या मानमरातब , इशारत , आदब यांची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करणेत आलेली होती .... येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची तसेच जहागीरदार , सरदार , मानकरी हे शहरात जिथे रहाण्यासाठी उतरले असतील तेथे पाण्याची व्यवस्था पाहणेची जबाबदारी ओव्हरसियर रावसाहेब रघुनाथराव रामचंद्र शिरगावकर यांच्यावर होती .... संस्थानचे सिटी सर्व्हे मामलेदार रावसाहेब विनायक धोंडदेव बावडेकर यांच्यावर जे जहागीरदार , संस्थानिक , सरदार कार्यक्रमाला येतील त्यांना रहाण्यासाठी व्यवस्था पहाणेकामी आणी त्यांची सरबराई करणेकामी नियुक्ती केलेली होती ....

दत्तक समारंभास सर्व सरंजामानिशी येण्याबद्दलचे आज्ञापत्र श्रीमन्महाराज सकवारबाई राणीसाहेब यांच्यानावे करवीर संस्थान कडून व मेहेरबान पॉलिटीकल एजंट यांचेकडून मिळालेमुळे सरसेनापती संताजीराव घोरपडे कापशीकर हे त्यांच्या हिंमत बहाद्दर परिसरातील स्वतःच्या बंगल्यात उतरणार होते .... पंतप्रतिनिधी , पंतअमात्य वगैरे खासे मानकरी त्याच परिसरात उतरणार असल्याने त्या भागात स्वच्छता , पाणीपुरवठा वगैरे सोबत नोकरचाकर , दरबार संरक्षक वगैरे विशेष सुविधा देणेत आल्या होत्या ... त्याबाबत वर्दी नारायण सदाशिव देसाई या शहर फौजदारांनी छत्रपती महाराजांचे खाजगी कारभारी यांना तसेच मेहेरबान दिवाण बहाद्दर मेहेरजी कुंवरजी यांना दिलेली होती .... तसेच दत्तकविधान समारंभ फाल्गुन वद्य पंचमी सोमवार दिनांक 17 मार्च 1884 रोजी सकाळी 7.30 वाजता झाल्यानंतर लगेच जो दरबार अंबाबाई मंदिराच्या चौकात भरणार होता त्यास रिवाजाप्रमाणे दरबारी पोशाख करुन येणेविषयी दिनांक 16 मार्च 1884 रोजी पत्र भालदाराकरवी सरसेनापतींना प्राप्त झाले ....

फाल्गुन वद्य पंचमी सोमवार दिनांक 10 मार्च 1884 रोजी सकाळी 7.30 वाजता शास्त्रशुद्ध दत्तकविधान झाल्यानंतर छत्रपती महाराज कोल्हापूरच्या प्राचीन राजगादीवर विराजमान होताच 19 तोफांची सलामी देणेत येणार होती व त्यानंतर सर्व जहागीरदार , संस्थानिक , सरदार वगैरे खासे आपआपल्या सांप्रदायाप्रमाणे त्यांना पोशाख , नजराणे व सतके देणार होते ... संस्थान दिवाण ऑफिस , संस्थान सरन्यायाधीश ऑफिस , संस्थान खाजगी कचेरीतील एकंदर दहा कारकून हे दरबार चौकात येणाऱ्या सर्व मानकरी लोकांना सन्मानाने त्यांच्या दरबारातील आसनाकडे बसवण्यासाठी उभे होते ......

पन्हाळगडाचे तटसरनौबत ..... कोल्हापूर प्रांताचे सरदेशमुख वतनदार ..... हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती ..... हिंदूराव ममलकत मदार श्रीमंत संताजीराव घोरपडे कापशीकर सेनापती यांचे दरबारात आगमन होताच सर्व लष्करफडातील कारकूनांनी त्यांना मुजरे करुन खडी ताजीम दिली ..... शिरोळ मामलेदार रघुनाथराव वेचलेकर यांनी अतिशय अदबीने सेनापतींना त्यांच्या आसनाकडे नेले .... कोल्हापूर संस्थानचे दिवाण खान बहाद्दर मेहेरजी कुंवरजी यांनी त्यांचा सत्कार केला ... त्यानंतर दरबारात अनेक जहागीरदार , सरदार , मानकरी वगैरे आल्यावर सगळ्यांना मानाच्या जागा दिल्या गेल्या .....

मेहेरबान पॉलिटीकल एजंट साहेब बहाद्दर यांचे आगमन झाले .... पाठोपाठ आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर हे त्यांचे चिरंजीव व भावी कोल्हापूर छत्रपती यशवंतराव बाबासाहेब यांना घेऊन दरबारात आले ... श्रीमंत आबासाहेब घाटगे कागलकर यांच्या सन्मानार्थ नऊ तोफांची सलामी देणेत आली .....

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...