विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 14 April 2019

मानाजी फांकडे

मानाजी फांकडे-
हा कन्हेरखेडच्या शिंद्यांपैकी एक असून राघोबादादा पेशव्यांचा पक्षपाती होता. महादजीला शिंद्याची सरदारी न देतां ती याला द्यावी अशी दादांची खटपट होती. महीनदीच्या कांठी राघोबाचा पराभव झाला, त्यावेळीं हा जखमी झाला होता. मराठेशाहींतील तीन प्रसिध्द फांकडयापैकीं हा एक असून तो फार शूर व धाडसी असे. हा कधीहि कोणास न दबणारा, परंतु थोरल्या माधवरावांनां वचकत असे. पुढें पुरंदरच्या तहामुळें हा पुणें दरबारच्या सैन्यास येऊन मिळाला. त्यावेळीं तो पेशव्यांच्या भेटीस आला असतां, किती बंदोबस्त ठेवला होता तो वाचण्यासारखा आहे. हरिपंत फडक्याच्या हैदर अल्लीवरील स्वारींत (१७७७) हा पंताच्या सैन्यांत होता. परंतु कर्नाटकांत आल्यावर बाजीपंत बर्वे म्हणून जो रोघाबाचा सरदार हैदरकडून लढत होता त्यानें त्यास हैदरअल्लीच्या बाजूस वळवून घेतलें. यानें घाशीरामाचा अन्याय उघडकीस आणला. रावबाजी सन १७९६ मध्यें दौलतराव शिंद्यांच्या गोटांत अटकेंत असतां हा त्याच्या बरोबर होता. नाना फडणविसानें पुरविलेल्या पैशावर यानें शिंद्यांच्या गोटांतच सैन्य जमविण्याचें काम चालू केलें. बाळोबा तात्यास हें कळतांच त्यानें शिंद्यांच्या गोटांतील रावबाजीच्या छावणीस घेरा घालून पाणी बंद केलें. तेव्हां मानाजीनें तेथून निघून नानाच्या तर्फेने साल्पेंघाट ताब्यांत घेतला. मानाजी फांकडयास आनंदराव (शिंदे) नांवाचा एक पुत्र होता. यानेंच पुढें सर्जेराव घाटग्यास ठार करून दौलतराव शिंद्यास त्याच्या जाचांतून मुक्त केलें.

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....