कृष्णराव खटावकर- 
हे  खटावचे रहाणारे असून मराठी साम्राज्यांत धुमाकूळ घालणारे म्हणून प्रख्यात  होते. यांचे पूर्वज निजामशाहींत बाराहळ्ळी येथें रहात असत. येथील पाटिलकी  त्यांची होती. वडिलांचें नांव मंबाजी. त्यांनां दोन मुलें झालीं. राघो व  कृष्ण. हे धार्मिक असल्यानें व्यंकोबाचे गिरीवर त्यानीं अनुष्ठान केलें. हे  माध्वमतानुयायी देशस्थ होते. दिल्लीकर मोंगलाने कृष्ण यास खटावची ठाणेदारी  दिली. परंतु त्यांचा वंश परत बाराहळ्ळी येथें गेला. राघोपंत खटावास  राहिले. त्यांचा पुत्र भगवंत व त्यांचा प्रसिद्ध कृष्णराव. हे फार शूर  होते. यांनीं खटाव येथील कोटांतील मशीद पाडली व दत्ताचें मंदिर बांधलें. या  मंदिरांत त्यांची पुस्तकशाळा होती. ते विद्वान् होते. त्यांनीं १२ लेखक  (नवीन ग्रंथ उतरून घेण्यासाठीं) पदरीं बाळगले होते. ते स्वतः न्याय व  व्याकरण यांत पारंगत होते. यांचें कुलदैवत खंडोबा. त्यांनीं जेजूरींचें  देऊळ बांधिलें. हल्लींचे खंडोबांचें जें मुख्य देऊळ ते यांच्या हातचें असून  भोंवतालचा प्राकार होळकर वगैरेंनीं बांधलेला आहे. चंपाषष्ठीच्या दिवशीं  पहिला नैवेद्य यांच्याकडील असतो. शाहु महाराज दक्षिणेंत उतरले व सातार्यास  येऊन गादीवर बसले त्यावेळीं कृष्णराव हे ताराबाईच्या बाजूस होते. त्यांनीं  नांवाला मोंगलांच्या तर्फेचें निमित्त करून सर्व माणदेश हाताखालीं घातला  (१७०८). संभाजी महाराजांच्या वधानंतर हे मोंगलास मिळाले होते व त्यांच्या  आश्रयानें मराठी साम्राज्यांत लुटालूट करीत असत. मोंगलानें यांना राजा हा  किताब दिला होता. यांनीं मोंगलाचें अनुकरण गोषाच्या चालीपर्यंत केलें  होतें. शेजारच्या बुध व मलवडीच्या घाटग्यांचें कांहीं देशमुखी उत्पन्न  यांनीं दाबलें. मोंगलानें खटाव परगणा यांनां जहागीर दिला. स्वराज्याविरुद्ध  यांनीं मोंगलास पुष्कळ वर्षें मदत केली. मुळापासून हे बंडखोरच. पुढें शाहू  महाराजांनीं बाळाजी विश्वनाथ व श्रीपतराव प्रतिनिधी यांस त्यांच्यावर  पाठविलें. कृष्णराव शौर्यानें लढले. परंतु अखेरीस ते व त्यांचा वडील पुत्र  हे दोघे लढाईंत पडले. दुसरे दोन पुत्र महाराजांस शरण आले. तेव्हां त्यांनीं  क्षमा करून त्यांचें वचन पुढें चालविलें. कृष्णरावांनीं संस्कृतांत  लिहिलेली विष्णुसहस्त्रनामावली वरील द्वैतमती टीका उपलब्ध आहे. [भा. व; डफ;  म. रि; भा. इ. मं. अ.]. 

No comments:
Post a Comment