विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

।। राजे लखुजीराव जाधवराव यांचे सिंहासनारुढ पेंटिंग ।।

।। राजे लखुजीराव जाधवराव यांचे सिंहासनारुढ पेंटिंग ।।
राजे लखुजीराव जाधवराव हे देवगिरीच्या यदुवंशी क्षत्रिय मराठा यादव राजांचे थेट वंशज आहेत . मध्ययुगीन कालखंडात शिवपुर्वकाळातील निजामशाहीत "वजीर" या पदापर्यंत पोहोचलेले व मोगलाकडे
" मीर-ए-समद/सामाण " या पदापर्यंत पोहोचलेले एक मातब्बर मराठा सरदार होते . ग्रँट डफने त्यांचा उल्लेख "मराठा सरदारांचे प्रमुख " असा केलेला आहे .
"वाकियत-जहांगिरी" या ग्रंथात
इ सन १६१३ मध्ये जहांगिराने अहमदनगरच्या लढ्यास "मराठ्यांचा, लढा " हे नाव दिलेले आहे आणि याच ग्रंथात इ सन १६१६ साली अहमदनगरच्या सलतनीतील मराठे मोठे काटक आणी शुर होते व राजे लखुजीराव जाधवराव हे समस्त "मराठ्यांचे सरदार" असा उल्लेख आहे.
इतिहास अभ्यासक मनोज दाणी सर यानी न्युयॉर्कमध्ये शोधलेल्या "बादशाही अल्बम" मधे राजे लखुजीराव जाधवराव यांचे चित्रकार हाशिम यानी इ सन १६२२ साली काढलेले चित्र आहे. त्या अल्बममध्ये त्यांचा "सिंदखेड प्रांताचा राजा" असा उल्लेख आहे . यावरुन राजे लखुजीराव जाधवराव यांची तत्कालीन महती व राजकिय वजन स्पष्ट अधोरेखित होते .
राजे लखुजीराव यानी निजामशाहीत पिता राजे विठोजीराव यांच्या मृत्युनंतर इ .सन १५७० साली ५००० च्या मनसबदारीपासुन आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली आणि
इ सन १६२० पर्यंत १५००० मनसबदारी पर्यंत पोहोचले .
त्यांच्या अधिकाराखाली ९ सरकार,
२८ महाल व ५६ चावड्या होत्या . जहागिरीतील सर्व देशमुख-देशपांडे यांचे अधिकारही त्यांच्याकडेच वंशपरंपरागत होते.
त्यांचे दक्षिणेतील राजकीय वर्चस्व पाहुन शहजादा खुर्रम उर्फ शहाजहाँन याने राजे लखुजीराव याना २४००० जात व १४००० स्वार अशी मनसब आणी त्याना व त्यांची मुले, नातवे व नातेवाईक मराठा सरदाराना जहागिरी-वतन व मनसबी दिल्या.
अशाप्रकारे शिवपुर्वकाळात मुस्लिम आमदनीत, मराठ्यांचे वर्चस्व व संघटन, निर्माण करण्याचे महत्तम कार्य खुद्द राजे लखुजीराव जाधवराव यानी सुरु केलेले दिसुन येते. हा शिवपुर्वकाळातील "स्वराज्याचा आद्य प्रेरणा स्त्रोत" होय .
इ सन १६१५ पासुन पुढे खुद्द राजे लखुजीराव जाधवराव व त्यांचे जावई शहाजीमहाराजसाहेब यांनी एकमेकांना पुरक भुमिका घेत हेच कार्य दृढ केले .
स्वराज्याच्या पायाभरणीची ही सुरुवात होती .
इ सन १६२८ साली राजे लखुजीराव हे मोगलांकडील उच्च मनसब व मानाचे पद सोडुन व शहाजीमहाराजसाहेब आदिलशाहीतील उच्च मनसब व मानाचे "वजीर" पद सोडुन निजामशाहीत दाखल झाले ते या भुमीची स्वतंत्रता जाहिर करण्यासाठीच. परंतु निजामशहास याचा सुगावा लागल्यामुळेच २५ जुलै १६२९ रोजी निजामशहाने भर दरबारात राजे लखुजीराव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजीराव आणी नातु राजे यशवंतराव(राजे दत्ताजीराव यांचे पुत्र) यांचा दगाफटका करून खुन केला.....त्यांची प्रेते दरबारातुन उचलुन आणण्याचे धाडसी कार्य त्यांच्या पत्नी म्हाळसाईसाहेब , बंधु राजे भुतजी, पुत्र राजे बहादुरजी व त्यांचे सर्व नातु यानी करुन सिंदखेडराजा येथे अंत्यसंस्कार केले.
राजे लखुजीराव जाधवराव यांच्या समाधीमंदिराचे बांधकाम बंधु राजे भुतजी यानी इ सन १६३० साली चालु केले आणी
इ सन १६४० साली राजे लखुजीराव यांच्या नातवांनी ते पुर्ण केले.
या समाधीची रचना पुर्णपणे मंदिरासम असुन प्रथम मध्यभागी एक घुमट बांधुन त्यात एक छोटा चौरस चौक काढलेला असुन त्याचे क्षेत्रफळ ३.५५×३.५५ मीटर आहे. या चौकात राजे लखुजीराव यांची समाधी आहे . त्यावर एक उत्तराभिमुख १.६० मीटर लांबीचे शिवलिंग स्थापन केले आहे. घुमटाच्या पश्चिम भित्तीत २.५०×१.५० मीटर क्षेत्रफळाची खोली काढलेली असुन तीत सुमारे एक मीटर उंचिचा "सिंहासनारुढ असलेल्या राजे लखुजीराव यांचा पुतळा" बसवलेला होता.
परंतु दुर्दैवाने आज तो पुतळा कोणी समाजकंटकाने ध्वस्त केलेला आहे.
सदरील सिंहासनारुढ पुतळ्याचे वर्णन इतिहास तज्ञ विजयराव देशमुख यानी पुरातत्व व वस्तुसंग्राहालय विभाग ,मुंबई यांच्या द्वारे प्रकाशित केलेल्या "सिंदखेडराजा" या पुस्तकात असुन याच पुतळ्याच्या वर्णनाचा आधार घेऊन सदरील राजे लखुजीराव यांचे सिंहासनारुढ पेंटिंग तयार केल आहे.
सिंहासनारुढ पुतळ्याचे वर्णन :-
समाधी मंदिराच्या एकुण दहा वर्षाच्या बांधकामातील ३ वर्षे या सिंहानारुढ पुतळ्यास लागली असुन रंगमहालाच्या लाकडी खांबांच्या दगडी बैठकीस वापरलेल्या "टोळंबी" दगडाचाच उपयोग "कृष्णा कारागिराने" या पुतळ्यासाठी केला.
"पिळदार दंड व मांड्या, रुंद भरदार छाती, विशाल ,पाणीदार नेत्र, सरळ नासिका व मोठे झुपकेदार कल्ले, पिळदार मिशा, भव्य मस्तक, डोक्यावर पीळदार महाराष्ट्री पगडी, मोठे कानचापे, मुखावर वीरतेज झळाळत असलेले, अंगात घोळदार अंगरखा
, कमरेच्या शेल्यात तलवार बांधलेली अशा थाटात डावा गुडघा सिंहासनावर टेकुन व डावा हात मांडीवर टेकुन, उजवा गुडघा उभा करुन ,उजव्या हाती जंबिया धारण करुन ऐटीत बसलेल्या राजे लखुजीराव यांचे मुर्तिमंत दर्शन या पुतळ्याच्या माध्यमातुन कृष्णा कारागिराने घडवले होते. " दुर्दैवाने एवढा महत्त्वाचा हा पुतळा अनेक वर्षापुर्वीच कोण्या समाजकंटकाने फोडला असुन याच पुतळ्याचे पुनर्जिवन सदरील पेंटिंग मधुन करण्याचा हा छोटासा प्रयत्न !!!!
वैशिष्ट्ये:- मध्ययुगीन काळात मराठा राजकुळातील, दगडातुन कोरलेला व सिंहासानारुढ पुतळा बनवण्याचा पहिला मान , "राजे लखुजीराव जाधवराव यांच्या सिंहासनारुढ पुतळ्यास " जातो.
तसेच सदरील समाधीमंदिरात चार कोपऱ्यात अनुक्रमे राजे दत्ताजीराव (म्रुत्यु १६२३ खंडागळे हत्तीप्रकरण), राजे अचलोजीराव, राजे राघोजीराव व राजे यशवंतराव यांच्या समाध्या शिवपिंडरुपातच आहेत.
संकल्पक :- गडवाट परिवार व अजयराव विरसेन जाधवराव, रवि राजेंद्र पवार.
चित्रकार :- प्रमोद मोर्ती.
सदरील "राजे लखुजीराव जाधवराव यांचे सिंहासनारुढ पेंटिगचे अनावरण खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते दिनांक ०४/०८/२०१८ रोजी झाले.
लेखन :- Rajenaresh jadhavrao

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...