पोस्ट बाॅय :- मराठा पेज
#जंजिऱ्याच्या_तटाला_शिड्या_लावणारे_लायजी_पाटिल
#जंजिऱ्याच्या_तटाला_शिड्या_लावणारे_लायजी_पाटिल
कोकण किनारपट्टीवर फिरंग्यांसोबत मराठ्यांचा अजुन एक शत्रु अजगरा सारखा विळखा घालून बसला होता. अगदी महाराजांच्या शब्दात वर्णन करायचे तर "जैसा घरास उंदीर, तैसाच राज्यास सिद्दी." या सिद्दीचा अम्मल दंडाराजपुरीवर होता, तो स्वराज्यवर हल्ले करुन लूट घेउन पुन्हा आपल्या मुल्खात पसार होत असे.
शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , कान्होजी आंग्रे , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते.
त्यातीलच एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू.
महाराजांनी सिद्दीचा मुलुख तर काबिज केलि पण त्याचा बुलंद जंजिरा मात्र त्यांना प्रत्येक वेळेस हुलकावणी देत राहिला. १६५७ ते १६७८ पर्यंत किमान ८ वेळेस महाराजांनी जंजिरा काबिज करण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही.
अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ' आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. '
मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते. लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ? मरणच.
लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता.
किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही. पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ' प्रभात ' होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ' प्रभात ' हाच शब्द वापरलेला आहे.) अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी.
अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन् लायजीची करामत पाण्यात विरघळली.
लायजी सरपाटलाची अचाट धाडसी मोहीम न घडताच वाया गेली. शिवाजी महाराजांना जंजिऱ्याचा हा अफलातून पण वाया गेलेला डाव रायगडावर समजला. मोरोपंतांनी हा डाव आपल्या हातून का तडीला गेला नाही , याचे उत्तर महाराजांना काय दिले ते इतिहासात उपलब्ध नाही. पण महाराज मोरोपंतांवर नाराज झाले , यात शंकाच नाही. कदाचित मोरोपंतांची अगतिकता महाराजांच्या थोडीफार लक्षात आलीही असेल ; पण महाराज नाराज झाले हे अगदी सत्य. ते मोरोपंतांना म्हणाले , ' पंत , तुम्ही कोताई केली. मोहीम फसली. '
लायपाटलांच्या या प्रकरणाच्या बाबतीत अधिक माहिती संशोधनाने मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही.
पण याही प्रकरणात महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर एक सूर्यकिरण झळकन् झळकून गेला. महाराजांनी कुलाब्यास आज्ञा पाठवून लायजी सरपाटलास रायगडावर बोलावून घेतले.
या जंजिऱ्याच्या प्रकरणाची रायगडावर केवढी कुजबूज चालू असेल नाही यावेळी ?
महाराजांनी भर सदरेवर लायजीस बोलावले. तो आला. उभा राहिला. त्याला पाहून महाराज भरल्या आवाजात म्हणाले , ' शाबास! लायजी तू केवढी मोठी कामगिरी केली , शाबास. जंजिऱ्यास सिड्या लावल्या. '
लायजीला याचा अर्थच क्षणभर कळला नसेल. तो गोंधळलाही असेल. एका फसलेल्या करामतीचे महाराज कौतुक करतात ही गोष्ट मोठ्या नवलाचीच. महाराज आपल्या कारभारी अधिकाऱ्याला म्हणाले , ' लायजी सरपाटलांना पालखीचा मान द्या. ' हे ऐकून सारी राजसदर चपापली असेल नाही ? पण लायजी पाटील नक्कीच चपापला. तो म्हणाला , ' महाराज , मोहिम तर फते झालीच नाही. मग मला पालखीचा एवढा मोठा मान कशाकरिता ? मला नको ' त्यावर महाराज म्हणाले , ' नाही लायजी , हा तुझ्या बहाद्दुरीचा मान आहे. जंजिऱ्यासारख्या भयंकर अवघड लंकेस तू शिड्या लावल्यास ही गोष्ट सामान्य नव्हे. शाबास. म्हणून हा पालखीचा मान. '
तरीही लायजी म्हणत होता , मला पालखी नको. मान नको.
लायजीच्या या मनाच्या मोठेपणाची आणि खोलीची मोजमापं कशानं घ्यावीत ? हा त्याग आहे. ही स्वराज्यनिष्ठा आहे. यालाच आम्ही राष्ट्रीय चारित्र्य म्हणतो आहोत. यावर अधिक काही भाष्य करण्यासाठी आमच्या शिलकीत शब्द नाहीत.
महाराज लायजीचे हे मन पाहून लगेच आपल्या अधिकाऱ्यास म्हणाले , ' लायजी सरपाटलांस एक गलबत द्या आणि त्या गलबताचे नाव ' पालखी ' ठेवा. ' त्याप्रमाणे लायजीस एक गलबत बक्षीस देण्याची व्यवस्था झाली.
हे आणि असे शिवकाळातील प्रसंग पाहिले , की लक्षात येते की , हिंदवी स्वराज्य औरंगजेबाला पुरून कसे उभे राहिले. केल्या कामाचेच मोल घ्यावे ; समाजाचे आणि स्वदेशाचे
काम म्हणजे ईश्वरी काम आहे , हीच भावना मनांत ठेवावी. ही शिकवण अगदी नकळत शिवकाळात शिलेदारांच्या मनांत रुजत गेली
काम म्हणजे ईश्वरी काम आहे , हीच भावना मनांत ठेवावी. ही शिकवण अगदी नकळत शिवकाळात शिलेदारांच्या मनांत रुजत गेली
No comments:
Post a Comment